पुणेकरांसाठी खुला होणार दख्खनच्या पठारातील अनमोल खजिना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Underground wealth

पृथ्वीच्या उत्क्रांतीचे रहस्य उलगडणारे खडक, खनिजे, रत्ने आणि जिवाश्मांचा अनमोल खजिना पाहण्याची संधी आत पुणेकरांना उपलब्ध होणार आहे.

पुणेकरांसाठी खुला होणार दख्खनच्या पठारातील अनमोल खजिना

पुणे - पृथ्वीच्या उत्क्रांतीचे रहस्य उलगडणारे खडक, खनिजे, रत्ने आणि जिवाश्मांचा अनमोल खजिना पाहण्याची संधी आत पुणेकरांना उपलब्ध होणार आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (एकल विद्यापीठ) अर्थात सीओईपीच्या भूशास्राच्या प्राध्यापकांनी मागील अनेक दशकात वर्षात जमा केलेल्या या खजिन्याचे संग्रहालय नुकतेच उभारण्यात आले आहे.

१८९२ मध्ये बांधलेल्या सीओईपी कॅम्पसमधील जुन्या प्राचार्यांच्या बंगल्याचे भूशास्त्र संग्रहालयात रूपांतर करण्यात आले आहे. सीओईपीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. संदीप मेश्राम सांगतात, ‘विभागातील विद्यार्थ्यांबरोबरच इतर शैक्षणिक संस्थांमधील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना हे संग्रहालय संशोधनासाठी वापरता येणार आहे. तसेच नागरिकांनाही हा सर्व खजिना पाहता येईल. डॉ. एल.व्ही. आगाशे, डॉ. आर.बी. गुप्ते, डॉ. बी.एम. करमकर, डॉ. एस.एस. मराठे आदी संशोधकांनी ही संपदा जमा केली आहे.’ संग्रहालयात दुर्मिळ रोझी क्वार्ट्ज, स्मोकी क्वार्ट्ज, अॅमेथिस्ट, स्टिलबाइट आणि स्टिबनाइट सारखे क्रिस्टल्स आहेत. खडक, खनिजे आणि स्फटिक वेगवेगळ्या रंगांचे आणि पोतांची आहेत. शैक्षणिक संस्थेच्या सामाजिक दायित्वाच्या भावनेतून हे संग्रहालय सर्वांसाठी खुले असणार आहे, असे डॉ. मेश्राम यांनी सांगितले.

व्हर्च्युअल संग्रहालय -

संग्रहालयातील खनिजे, खडके, रत्ने आणि जिवाश्मांची वर्गवारी त्यांचा सविस्तर तपशील डिजिटल पद्धतीने उपलब्ध होत आहे. ही सर्व माहिती व्हर्च्युअल संग्राहलायाच्या रूपाने उपलब्ध करून देण्यात येणार असून, घरबसल्या नागरिकांना हे संग्राहलायाचा अनुभव घेता येईल. सीओईपीच्या संकेतस्थळावर लवकरच याची लिंक उपलब्ध करून देऊ, अशी माहिती डॉ. मेश्राम यांनी दिली. या सोबतच सोबतच या संग्राहालयात एक लाइट आणि म्युझिकल शो देखील असणार आहे. ज्यामुळे विद्यार्थी स्क्रीनवर या सगळ्या खडकांना बघू शकतील आणि खनिजांचा अभ्यास करू शकतील. उपलब्ध असलेल्या खडक आणि खनिजाचा वापर योग्य पद्धतीने संशोधकांना किंवा अभ्यासकांना कसा होईल, याकडे आम्ही विशेष लक्ष देणार असल्याचे डॉ. मेश्राम यांनी स्पष्ट केले.

संग्रहालयाचे वैशिष्ट्ये -

- दख्खनच्या पठारातील दुर्मिळ खनिजे आणि जिवाश्मांचा मोठा संग्रह

- संशोधनाबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही पाहण्यासाठी उपलब्ध

- डायनॉसॉरच्या अंडे, समुद्री जीव, झाडे आदींची लाखो वर्षांपूर्वीची जीवाश्म

- व्हर्च्युअल संग्रहालयामुळे सर्वांना घरबसल्या पाहता येणार

आकडे बोलतात..

  • खनिजांचे प्रकार - २००

  • अग्निजन्य खडकांचे प्रकार - १५०

  • स्तरीय खडकांचे प्रकार - ५०

  • रूपांतरित खडकांचे प्रकार - ५०

  • जीवाश्म - ६०

  • संग्रहालयातील एकूण खजिना - १२०० पेक्षा जास्त