व्हीएसआरची तेलुगू देसमकडून पाठराखण, राममोहन नायडूंनी राजीनामा द्यावा-आमदार रोहित पवार
राममोहन नायडूंनी राजीनामा द्यावा
आमदार रोहित पवार यांची मागणी; ‘व्हीएसआर’ची तेलुगू देसमकडून पाठराखण
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २१ : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या कुटुंबातील हेरिटेज फायनान्स कंपनी ही दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातास कारणीभूत ठरलेल्या व्हीएसआर कंपनीला वित्तपुरवठा आणि पाठराखण करीत असून या प्रकरणी तेलुगू देसम पक्षाचे केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री राममोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आज आमदार रोहित पवार यांनी येथे केली.
आमदार रोहित पवार हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ६, जनपथ या निवासस्थानी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणातील काही बडे नेते तसेच आंध्र प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशचे प्रभावशाली नेते व्हीएसआर कंपनीच्या पाठीशी आहेत. चंद्राबाबू नायडूंच्या कुटुंबातील सदस्य व्हीएसआरमध्ये पैसे गुंतवत असतील आणि व्हीएसआरचे संचालक रोहित सिंह यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहात असतील तर अजितदादांना न्याय कसा मिळेल, असा प्रश्न आमदार पवार यांनी यावेळी उपस्थित केला. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हेच अजितदादांना न्याय देऊ शकतात, असे ते म्हणाले. तेलुगू देसमच्या नेतृत्वाच्या अतिशय जवळ असलेल्या व्यावसायिकाचे विमान व्हीएसआरच्या सेवेत आहे. दुबईत व्हीएसआरकडे ठेवण्यात आलेले भारतातील सर्वात अत्याधुनिक लेगेसी-६५० या विमानाच्या ताराही तेलुगू देसम पक्षाशी जोडलेल्या आहेत. तेलुगू देसम आणि व्हीएसआर कंपनीशी इतके घनिष्ठ, वैयक्तिक, आर्थिक आणि व्यावसायिक संबंध असतील तर अजित पवार यांचा घात की अपघात याची चौकशी राममोहन नायडू यांच्या मंत्रालयाकडून पारदर्शक पद्धतीने कशी होईल ? असा प्रश्न असून राममोहन नायडू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आमदार पवार यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

