'वाघा बॉर्डरपेक्षा वाईट परिस्थिती आंदोलनस्थळी'; सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारवर ओढले ताशेरे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 February 2021

मी माझ्या आयुष्यात कधीच जगातल्या कुठल्याच सीमेवर अशी परिस्थिती पाहिली नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी या सगळ्याच परिस्थितीबाबत दुर्दैवी या शब्दात मत व्यक्त केले. 

बारामती (पुणे) : शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मी काही सहकारी खासदारांसह शेतकऱ्यांच्या भेटीला गेले होते, मात्र वाघा सीमेवरही जी परिस्थिती नाही त्यापेक्षा जास्त वाईट परिस्थिती आंदोलनाच्या ठिकाणी आहे. वाघा सीमेवर समोरचा माणूस दिसतो तरी येथे आम्हाला शेतकरी दिसलेच नाहीत, शेतकऱ्यांच्या दसपटीने फौजफाटा तैनात करण्यात आला आहे, जणू काही शेतकरी गोंधळ घालायलाच तेथे आले आहेत....ही सगळीच परिस्थिती दुर्दैवी आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकरी आंदोलनाबाबत माहिती दिली. 

धक्कादायक! हिमनद्या वितळण्याचा वेग झालाय दुप्पट; भारतासह इतर देशांनाही धोका

रविवारी बारामतीत आयोजित कार्यक्रमानंतर त्या बोलत होत्या. मी माझ्या आयुष्यात कधीच जगातल्या कुठल्याच सीमेवर अशी परिस्थिती पाहिली नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी या सगळ्याच परिस्थितीबाबत दुर्दैवी या शब्दात मत व्यक्त केले. 

इंधन दरवाढीमुळे सामान्य माणसाला कमालीचा त्रास होतो आहे, ही बाब विचारात घेत केंद्र सरकार या बाबत काहीतरी निर्णय घेईल, अशी आमची अपेक्षा आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी इंधनदरवाढीबाबत केंद्रावर निशाणा साधला. 

कॅम्पस प्लेसमेंटसाठी पात्र विद्यार्थ्यांनो, UGCची नवी नियमावली जाहीर!​

रविवारी बारामतीत केंद्राच्या वयोश्री योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना बॅटरीवर चालणा-या तीन चाकी सायकलींचे वाटप करण्यात आले, त्या नंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. वयोश्री योजनेत बारामती लोकसभा मतदारसंघ देशात आघाडीवर आहे, प्रशासकीय अधिकारी व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिका-यांचे सुळे यांनी कौतुक केले. पहिल्या टप्प्यात 150 तीन चाकी बॅटरीवर चालणा-या सायकलींचे वाटप आज केले गेले, या योजनेत जे निकषानुसार पात्र ठरतात त्या प्रत्येकाला तीन चाकी सायकल वाटप केले जाणार असल्याची ग्वाही सुळे यांनी दिली. एप्रिल महिन्यात या संदर्भातील मेगा कँप बारामतीत घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Role of modi government regarding farmers protest is unfortunate says Supriya Sule