अनेक हात एकत्र आल्यास समस्या सुटतात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

‘‘सामाजिक योगदान देणे हे कर्तव्य आहेच; परंतु यात सातत्य राखले की, आपले काम समाजापर्यंत नक्कीच पोचते. सकारात्मकपणे केलेल्या चांगल्या कामातून इतरांना प्रेरणा मिळते. हे सर्व करण्यासाठी अनेक हात एकत्र यावे लागतात व ते एकत्र आले की समस्या सुटतात,’’ असे प्रतिपादन ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले.

औंध - ‘‘सामाजिक योगदान देणे हे कर्तव्य आहेच; परंतु यात सातत्य राखले की, आपले काम समाजापर्यंत नक्कीच पोचते. सकारात्मकपणे केलेल्या चांगल्या कामातून इतरांना प्रेरणा मिळते. हे सर्व करण्यासाठी अनेक हात एकत्र यावे लागतात व ते एकत्र आले की समस्या सुटतात,’’ असे प्रतिपादन ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रोटरी क्‍लब ऑफ पुणे डिस्ट्रिक्‍टतर्फे (३१३१) रोटरी क्‍लब ऑफ पुणे प्रिस्टीन आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी रोटरीचे प्रांतपाल रवी धोत्रे, डॉ. सुधीर राशिंगकर, डॉ. महेश कोटबागी, डॉ. दीपक शिकारपूर, पीआय जिल्हा संचालक आदित्य देवधर, पुणे प्रिस्टीनचे अध्यक्ष नितीन मुळे, समन्वयक सुदीन आपटे, पीआय संचालक संदीप बेलवलकर आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले ‘रोटरी क्‍लबमधील सदस्यांच्या बुद्धीचा, अनुभवाचा फायदा समस्या सोडविण्यासाठी करून घेता येतो. विविध क्षेत्रातून आलेल्यांच्या सहभागातून सामाजिक कार्य पूर्ण होते. समाजातील घटक निधी देत असतोच. परंतु, निधीची उपयुक्तता व पारदर्शकता महत्त्वाची असते. चांगले काम केले की निधीची कमतरता भासत नाही. केवळ उपदेशच न देता एक सामाजिक जबाबदारी म्हणून समाजाच्या उन्नतीसाठी निरनिराळ्या क्षेत्रात ‘सकाळ’ माध्यम समूहाकडून सातत्याने भरीव कार्य केले जात आहे. समाजातील सकारात्मक घटनांना योग्य ती प्रसिद्धी देण्याचे तत्त्व ’सकाळ’ नेहमीच पाळत  आले आहे.’

रवी धोत्रे म्हणाले ‘अशक्‍य ते शक्‍य करण्यासाठी आम्ही झटत आहोत. सर्व क्‍लबचे प्रकल्प हे परिवर्तनाची भाषा बोलणारे आहेत. भविष्यात शंभर कोटीचे’ हॅप्पी व्हिलेज’ प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्नशील आहोत.’ या वेळी  डॉ. सुधीर राशिंगकर, डॉ. दीपक शिकारपूर, डॉ. महेश कोटबागी यांनीही रोटरी सदस्यांना मार्गदर्शन केले. प्रकल्प यशस्वीपणे राबविणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rotary Club of Pune District