गळाभेटीतून एकमेकांना शुभेच्छा 

गळाभेटीतून एकमेकांना शुभेच्छा 

पिंपरी - सायंकाळचे रम्य वातावरण. दरवळणारा अत्तराचा मंद सुगंध. "आइए जनाब' म्हणत गळाभेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा देणारे हिंदू-मुस्लिम बांधव. व्यासपीठावरील मान्यवरांचे शाल-श्रीफळ देऊन केलेले स्वागत. कुराण पठणातून अल्लाहचे नामस्मरण. फलाहार, चमचमीत भजी, बटाटेवडे आणि थंडगार दूध घेऊन सोडलेला रोजा. सामूदायिक नमाज पठण. वैयक्तिक गप्पा-टप्पा आणि ख्याली-खुशाली, असे वातावरण आकुर्डी येथील बीना इंग्लिश स्कूलच्या आवारात मंगळवारी (ता. 29) बघायला मिळाले. निमित्त होते बीना एज्युकेशनल सोसायटी आणि "सकाळ माध्यम समूह' यांच्यातर्फे आयोजित रोजा इप्तार कार्यक्रमाचे. 

रमजाननिमित्त सर्वधर्मीय सामूहिक रोजा इप्तार कार्यक्रमास उत्तर प्रदेशचे माजी पाटबंधारेमंत्री मेहराजुद्दीन अहमद, खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, ऍड. गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) प्रदेश सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे, नगरसेवक प्रमोद कुटे, जावेद शेख, भाऊसाहेब भोईर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती फजल शेख, सलीम शिकलगार, बशीर सुतार, अनुप मोरे, बीना एज्युकेशनल सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष इकबाल शेख, मानद सचिव रफीक अत्तार, मुख्याध्यापिका समीना मोमीन, "सकाळ'चे सहयोगी संपादक रमेश डोईफोडे, अविनाश चिलेकर, मुख्य व्यवस्थापक अब्दुल अजीज, वरिष्ठ व्यवस्थापक विनोद पाटील आदी उपस्थित होते. मौलाना अब्दुल गफार यांनी कुराण पठण केले. 

खासदार बारणे म्हणाले, ""पिंपरी-चिंचवडमध्ये देशातील सर्व जातीधर्मातील लोक राहतात. ते एकमेकांच्या कार्यक्रमात, सुख-दु-खात सहभागी होतात. त्यातून सामाजिक सलोखा राखला जातो. येथील नागरिक वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये असले तरी, धार्मिक कार्यक्रम, सण, उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येतात. यातूनच सामाजिक एकता दिसून येते.'' 

वाघेरे म्हणाले, ""बीना एज्युकेशनल सोसायटी शिक्षणाबरोबरच वैचारिक माध्यमातून सामाजिक क्षेत्रातही काम करीत आहे. त्यांचे काम कौतुकास्पद आहे. सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र आणण्याचा त्यांचा उपक्रम स्तुत्य आहे.'' 

आमदार चाबुकस्वार यांनी रमजान व ईदनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. 

कौमी एकताची गरज : इकबाल शेख 
रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. पुण्यकर्मासाठी अनेक जण दान-धर्म करतात. या पुण्यकर्मातून चांगले फळ मिळते. सर्व धर्म, जाती, समाज एकत्र येण्यासाठी इप्तारसारखे कार्यक्रम महत्त्वाचे ठरतात. शांतता राखण्यासाठी कौमी एकताची गरज आहे, असे मत बीना एज्युकेशनल सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष इकबाल शेख यांनी व्यक्त केले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com