आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 RTE 25% extension for admission to reserved seats


- येत्या रविवारपूर्वी प्रवेश घेण्याच्या सूचना
- प्रवेशासाठी पडताळणी समितीकडे जाण्याची सूचना

आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी मुदतवाढ

पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी शिक्षण विभागाने आणखी एकदा मुदतवाढ दिली आहे.  मूळ निवड यादीत निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांनी येत्या रविवारपूर्वी (ता.२७) पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेशासाठी अर्ज करावा आणि समितीने त्याबाबत कार्यवाही करावी, अशी सूचना शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा बंद असणे, शाळेने पालकांना प्रवेशासाठी न बोलाविणे, किंवा अन्य कारणांमुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता मूळ निवड यादीतील पात्र बालकांचा अद्याप प्रवेश झाला नसल्यास पालकांनी त्यासाठी येत्या रविवारपूर्वी (ता.२७) पडताळणी समितीकडे जाऊन अर्ज करावा. त्यानंतर पडताळणी समितीने कागदपत्रांची व वस्तुस्थितीची पडताळणी करून पुढील कार्यवाही करावी, अशी माहीती शिक्षण विभागाने दिली आहे.

आरटीईनुसार वंचित व आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमधील प्रवेशासाठी २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. या जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता पहिली सोडत मार्चमध्ये काढण्यात आली. मात्र त्यानंतर लॉकडाउन झाली झाल्याने या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली. चार-पाच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरु झाली. त्यातही पहिल्या सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष प्रवेश घेण्याचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने या प्रवेशासाठी सातत्याने मुदतवाढ देण्यात आली. आताही या  प्रवेशासाठी मुदतवाढ मिळाली आहे. पहिल्या सोडतीत निवड होऊनही अद्याप प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांना पडताळणी समितीकडे जावे लागणार आहे. तसेच या समित्यांची यादी प्रवेशाच्या 'https://student.maharashtra.gov.in/adm_portal" या  पोर्टलवर दिली आहे. त्यामुळे पालकांना आपल्या जवळच्या पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेता येणार आहे, असेही शिक्षण विभागाने सांगितले आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेशाचे 'प्रतीक्षा' कधी संपणार?
प्रतीक्षा यादीत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सप्टेंबर अखेरीस पावले उचलली जातील, असे आश्वासन शिक्षण विभागाने दिले होते. मात्र अद्याप त्यासाठी पावले उचलली न गेल्याने प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर टांगती तलवार आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांनी सध्या शाळेत जाऊ नये. त्यांच्यासाठी स्वतंत्र सूचना पोर्टलवर दिली जाईल, असेही शिक्षण विभागाने नमूद केले आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची आणि पालकांचीही शाळा प्रवेशाची प्रतीक्षा अखेर कधी संपणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.


केवळ ६७ टक्के प्रवेश आतापर्यंत निश्चित
राज्यातील ९,३३१ शाळांमधील एक लाख १५ हजार ४६० जागांसाठी एकूण दोन लाख ९१ हजार ३६८ विद्यार्थ्यांचे अर्ज आले. त्यातील एक लाख ९२६ विद्यार्थ्यांची पहिल्या सोडतीत प्रवेशासाठी निवड झाली. त्यापैकी केवळ ६७ टक्के  म्हणजेच ६७ हजार ६८९ विद्यार्थ्यांचे प्रवेश आतापर्यंत निश्चित झाले आहेत. पुणे जिल्ह्यात १६ हजार ९४९ जागांसाठी पहिल्या सोडतीत १६ हजार ६१७ विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यातील १० हजार २०६ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश निश्चित केले आहेत.
 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा