पुणेकरांनो, "आरटीओ'चे कामकाज आता सकाळी आठपासूनच ! 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

सकाळी आठ वाजताच आरटीओचे कामकाज सुरू होईल अन सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत ते चालेल, असे नियोजन प्रशासनाने केल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली. 

पुणे - वाहन चालविण्याच्या परवान्याचे नूतनीकरण करायचे आहे ? त्यासाठी आरटीओ कार्यालय जर सकाळी आठ वाजताच उघडले अन सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत कामकाज सुरू राहिले तर.... एरवी स्वप्नवत वाटणारा हा बदल आता पुण्यात होणार आहे. कारण, जास्तीत जास्त नागरिकांची कामे पूर्ण करण्यासाठी हा बदल होणार असून दोन दिवसांत त्याबाबतचा निर्णय होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनामुळे बदललेली परिस्थिती लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) दररोज ठराविक नागरिकांची कामे पूर्ण करण्यासाठी "कोटा' निश्‍चित केला आहे. त्यानुसार दररोज 860 जणांची ऑनलाइन अपॉईंटमेंटद्वारे कामे पूर्ण होत होती. त्यासाठी त्यांना parivahan.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते. परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी हा कोटा वाढविण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे दररोज 1430 नागरिकांची कामे होणार आहेत. वाढीव कोट्यामुळे वेळ पुरत नसल्याचे आरटीओचे निरीक्षण आहे. त्यामुळे सकाळी आठ वाजताच आरटीओचे कामकाज सुरू होईल अन सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत ते चालेल, असे नियोजन प्रशासनाने केल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरटीओमधील कामे करण्यासाठी नागरिक अनेकदा त्यांच्या कामाच्या ठिकाणी रजा काढून येतात. वेळ वाढविल्यावर त्यांना रजा काढण्याची गरज राहणार नाही. ऑनलाइन पद्धतीने कामे झपाट्याने पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 25 "टॅब'ही दिले आहेत. वाढीव वेळेबद्दलचा निर्णय सोमवारी जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

नागरिकांच्या कामांसाठी वाढलेला कोटा 
कामाचा प्रकार ------------ नवा कोटा ------- जुना कोटा 
शिकाऊ परवाना ------------650--------------400 
दुचाकी कायम परवाना ------240-------------160 
दुचाकी विदाऊट गिअर परवाना--200-----------100 
मोटार परवाना ------------240-------------160 
मोटार वाहतूक परवाना -----100--------------40 

(अन्य प्रकारच्या वाहनांचाही कोटा वाढला आहे) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RTO office in Pune is working from 8 am