विलीनीकरणाचा निर्णय "रिझर्व्ह'च्या हाती; रुपी बॅंकेचे प्रशासक सुधीर पंडित यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 December 2020

प्रशासकांनी रुपी बॅंकेच्या विलीनीकरणाबाबत काही बॅंकांकडे प्रस्ताव दिले असून, पाठपुरावा करण्यात येत आहे. काही ठेवीदार चुकीची माहिती देऊन इतर ठेवीदारांची दिशाभूल करीत आहेत.

पुणे - ""रुपी बॅंकेच्या विलिनीकरणाबाबतचा निर्णय हा रिझर्व्ह बॅंकेच्या अखत्यारीतील आहे. विलिनीकरणासाठी कोणत्याही बॅंकेचा प्रस्ताव प्रशासकांकडे आला नाही. त्यामुळे ते बॅंकेने अथवा प्रशासकांनी नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,'' असे स्पष्टीकरण रुपी बॅंकेच्या प्रशासकांकडून देण्यात आले आहे. 

रुपी बॅंकेचे प्रशासक गुंतवणूकदारांना विश्‍वासात न घेता परस्पर व्यवहार करीत असल्याचा आरोप "ग्रुप ऑफ पीपल वर्क' या संघटनेने गुरुवारी पत्रकार परिषदेत केला होता. त्यावर रुपी बॅंकेचे प्रशासक सुधीर पंडित यांनी हे स्पष्टीकरण दिले. प्रशासकांनी रुपी बॅंकेच्या विलीनीकरणाबाबत काही बॅंकांकडे प्रस्ताव दिले असून, पाठपुरावा करण्यात येत आहे. काही ठेवीदार चुकीची माहिती देऊन इतर ठेवीदारांची दिशाभूल करीत आहेत. या ठेवीदारांनी एखाद्या बॅंकेशी चर्चा केली असल्यास त्यांनी बॅंकेस कागदपत्रे सादर करावीत. जेणेकरून त्या बॅंकांबरोबरचा विषय पुढे नेता येईल, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रुपी बॅंकेने बहुतांश बॅंकांकडे विलिनीकरणाबाबत प्रस्ताव पाठविले होते. काही बॅंकांनी तयारी दर्शविली. परंतु ते फलद्रूप होऊ शकले नाहीत. रिझर्व्ह बॅंकेच्या सूचनेवर रुपी बॅंक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने विलीनीकरणाचा संयुक्त प्रस्ताव रिझर्व्ह बॅंकेकडे सादर केला होता. विलीनीकरणाचा फेरप्रस्ताव सहकार आयुक्त  कार्यालयातर्फे रिझर्व्ह बॅंक आणि "नाबार्ड'कडे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दाखल केला आहे. विलीनीकरणाच्या प्रस्तावाचे भवितव्य आणि स्वरूप नाबार्ड आणि रिझर्व्ह बॅंक यांच्या मान्यतेवर अवलंबून आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ठेवी सुरक्षित 
बॅंकेचे एकूण ठेवीदार 4 लाख 91 हजार 390 असून, त्यापैकी पाच लाखांपर्यंत ठेवी असणाऱ्या ठेवीदारांची संख्या 4 लाख 86 हजार 903 इतकी आहे. त्यांची ठेव रक्कम 724 कोटी 80 लाख रुपये इतकी आहे. तसेच पाच लाखांवरील ठेवीदार चार हजार 487 असून, त्यांची ठेवरक्कम सुमारे 570 कोटी आहे. ऑक्‍टोबरअखेर बॅंकेने हार्डशिप योजनेअंतर्गत 91 हजार 246 ठेवीदारांना सुमारे 360 कोटींच्या ठेवी परत केल्या आहेत, असे सुधीर पंडित यांनी सांगितले. 

चार वर्षांत 258 कोटींची वसुली 
गसुेल्या चार वर्षांमध्ये बॅंकेने सतत परिचालनात्मक नफा मिळविला आहे. मागील चार वर्षांतील हा नफा एकूण 53.19 कोटी रुपये असून, चालू आर्थिक वर्षात नोव्हेंबरपर्यंतचा नफा 16.08 कोटी इतका आहे. गेल्या चार वर्षांत सुमारे 258 कोटींची वसुली केली आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ruepee bank decision to merge is in the hands of the Reserve Bank