esakal | इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये करिअर करायचे आहे? ;या' आहेत करिअरच्या वाटा

बोलून बातमी शोधा

इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये करिअर करायचे आहे? ;या' आहेत करिअरच्या वाटा

मागील वर्षी अकरावीचा  अभ्यासक्रम नवीन होता.  हा नवीन अभ्यासक्रम नवीन तंत्रज्ञानावर आधारित व अद्ययावत आहे.  काय आहेत या नव्या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये जाणून घ्या या लेखातून... 

इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये करिअर करायचे आहे? ;या' आहेत करिअरच्या वाटा
sakal_logo
By
रूपाली समीर ब्रह्मे

इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अर्थात माहिती तंत्रज्ञान हा विषय 2002 मध्ये अकरावी व बारावीसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामध्ये सुरू करण्यात आला. यावर्षी इयत्ता बारावीसाठी त्याचा नवीन अभ्यासक्रम आहे. मागील वर्षी अकरावीचा अभ्यासक्रम नवीन होता. हा नवीन अभ्यासक्रम नवीन तंत्रज्ञानावर आधारित व अद्ययावत आहे. काय आहेत या नव्या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये जाणून घ्या या लेखातून...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रमाचा पाया म्हणून खूप उपयोग होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी शाखेकडे कल आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त आहे. तसेच इतर क्षेत्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीदेखील हा अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत हा विषय पात्रतेसाठी ग्राह्य धरण्यात येतो. या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सर्वच 'ओपन सोर्स सॉफ्टवेअर'चा वापर करण्यात आलेला आहे. 'ओपन सोर्स सॉफ्टवेअर' विद्यार्थ्यांना मोफत डाऊनलोड करता येतात आणि ते त्यांच्या संगणकाचा वापर करून शिकू शकतात. माहिती तंत्रज्ञान विषयाची सायन्स आणि आर्ट्स दोन्ही विभागाची वेगवेगळी पुस्तके प्रकाशित झाली आहेत, तर कॉमर्स विभागाचे पुस्तक अजून प्रकाशित होणार आहे. हा अभ्यासक्रम कृतीयुक्त अध्ययन पद्धतीला भर देत असून ज्ञानरचनावादावर आधारित आहे. दोन्ही विभागात प्रत्येकी सहा पाठ आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

या विषयामध्ये एचटीएमएल 5चा वापर करून वेबसाइट कशी बनवावी व ती लाँच कशी करावी, हे शिकता येते. तयार केलेल्या वेबसाईटला 'व्हिजिटर' कसे मिळवावेत, यासंबंधी देखील माहिती पाठ्यपुस्तकात मिळते. कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, थ्री डी प्रिंटिंग इत्यादी नवीन तंत्रज्ञान या विषयातून मुलांना अवगत होते. सर्च इंजिन ऑप्टमायझेशन, डिजिटल मार्केटिंग ही आजच्या युगात उद्योगांची निकड आहे. या संकल्पना शिकून विद्यार्थी भविष्यातील उद्योगांसाठी तयार होतात. 

ई-कॉमर्स, ई-गव्हर्नन्सचे प्रकार विद्यार्थ्यांना डिजिटायझेशन प्रक्रिया समजून घेण्यास मदत करतात. ई-कॉमर्स व ई-गव्हर्नन्स या पाठातून विद्यार्थ्यांना डिजिटल सिग्नेचर, ई वॉलेट, ई बँकिंग अशा अनेक नवीन संकल्पनाही सदेखील या धड्यातून होते. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या “डिजिटल इंडिया” संकल्पनेतील अनेक गोष्टी पाठ्यपुस्तकातून मुलांना ज्ञात होतात.

शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांना, प्रसिद्ध केलेल्या वेबसाईटचा डेटा सेव्ह करण्यासाठी पीएचपी कसे वापरावे हे शिकण्यास मिळते. जावा स्क्रिप्टमधून प्रोग्रामिंग ही शिकता येते. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान विषयात ॲनिमेशन, डिजिटल मार्केटिंग यासंबंधी अधिक ज्ञान मिळते. ऑग्मेन्टेड रिअॅलिटी (एआर) या संकल्पनेच्या आधाराने विद्यार्थी व्हर्च्युअल जगात जाऊ शकतात, तर व्हर्च्युअल रियालिटी आणि गेमिंग इंडस्ट्रीमध्ये कशी वापरली जाते, हेही समजून घेऊ शकतात. 5जी ही नवीन सेल्युलर नेटवर्क टेक्नॉलॉजीची ओळखही त्यांना कला शाखेच्या पाठ्यपुस्तकातून होते. ऑडासिटी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ऑडिओ फाईल एडिट करणे शिकता येते व व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मेडिया क्लिप व्हिडीओ क्लिप एडिट करणे, त्यात हवे तसे बदल करण्यात विद्यार्थी पारंगत होतील. ओपन स्ट्रीट मॅप या ओपन सोर्स सॉफ्टवेअर च्या आधाराने विद्यार्थी हवाई कोनातून दृश्य बघू शकतात.

या विषयाची परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने होते. विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका येते. ती त्यांना त्यांच्या महाविद्यालयाच्या संगणक प्रयोगशाळेमधून द्यावयाची असते. या विषयाचा सखोल अभ्यास केल्यास ऑनलाइन परीक्षेमध्ये उत्तम आणि पैकीच्या पैकी गुण मिळवणे शक्य असते. याचे कारण ही परीक्षा बहुतांशी वस्तुनिष्ठ प्रकारातील प्रश्नांवर आधारित असते. यामध्ये रिकाम्या जागा भरा, सत्य की असत्य ते सांगा, चार पर्यायांपैकी एक योग्य पर्याय निवडा, पाच पर्यायांपैकी दोन योग्य पर्याय निवडा, अशा पद्धतीचे प्रश्नपत्रिकेचे साधारण स्वरूप असते. विद्यार्थ्यांची परीक्षाही थेअरी व प्रॅक्टिकल अशा दोन्ही स्वरूपाची होते. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये प्रोग्राम लिहिण्यासाठी येतात. 

सध्या कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचे शिक्षण, ऑनलाइन पद्धतीची परीक्षा या गोष्टी अनिवार्य झालेले आहेत. माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग प्रत्येक व्यक्तीला अनिवार्य झालेला आहे. माहिती तंत्रज्ञानाची नसलेल्या व्यक्तीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हे ज्ञान असणे ही काळाची गरज झाली आहे. हा विषय तुम्हाला ती गरज पूर्ण करण्यासाठी मदत करतो. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात तुमचे करिअर केले तरीही तुम्हाला माहिती तंत्रज्ञानाची कास धरावीच लागते.

रूपाली समीर ब्रह्मे (फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालय, पुणे.)