पारनेर - पारनेर ग्रामीण रुग्णालयाची अवस्था

पारनेर - पारनेर ग्रामीण रुग्णालयाची अवस्था
Published on

ग्रामीण रुग्णालया व्हेंटिलेटरवर
तालुक्यात पारनेर अन् टाकळी ढोकेश्‍वर येथे रुग्णालये

मार्तंड बुचूडे ः सकाळ वृत्तसेवा
पारनेर, ता. २० : पारनेर तालुक्यात पारनेर आणि टाकळी ढोकेश्‍वर येथे दोन ग्रामीण रुग्णालये आहेत. मात्र, दोन्ही रुग्णालयांचा कारभार प्रभारी आरोग्य अधिकाऱ्यांकडे असल्याने या रुग्णालयांच्या आरोग्य व्यवस्थेलाच ‘व्हेंटिलेटर’ची गरज असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
पारनेर येथील नियमित आरोग्य अधिकारी डॉ. मृणालिनी पाटील यांची कोल्हापूर येथे प्रभारी आरोग्य अधिकारी म्हणून तात्पुरती नेमणूक करण्यात आली आहे. तर टाकळी ढोकेश्‍वर येथील आरोग्य अधिकारी सेवानिवृत्त झाल्याने त्या रुग्णालयाचाही कारभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रामीण रुग्णालयांचीच ‘शस्त्रक्रिया’ करणे गरजेचे असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
पारनेर ग्रामीण रुग्णालयात सध्या केवळ नैसर्गिक प्रसूतीची सुविधा उपलब्ध आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञ नसल्यामुळे येथे सिझरद्वारे प्रसूती केली जात नाही. तसेच, सिझरसाठी आवश्यक यंत्रणाही उपलब्ध नसल्याने केवळ नॉर्मल बाळंतपणे केली जात आहेत. या रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ नसल्यामुळे लहान मुलांवरील उपचारांमध्येही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे इतर डॉक्टरांकडून मुलांवर प्राथमिक स्वरूपाचे उपचार केले जात असल्याचे चित्र आहे.
-------------
करारावर दोन डॉक्टर
पारनेर ग्रामीण रुग्णालयात सध्या केवळ एकच नियमित डॉक्टर कार्यरत असून, दोन डॉक्टर करार पद्धतीवर नियुक्त आहेत. याशिवाय, आरोग्य अधिकाऱ्यांचा अतिरिक्त कार्यभार वांबोरी येथे कार्यरत असलेले डॉ. सतीश लोंढे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
--------------
कुटुंबनियोजन शस्त्रक्रियांवर भर
पारनेर ग्रामीण रुग्णालयात गतवर्षी ५७ नैसर्गिक बाळंतपणे करण्यात आली. तसेच, नुकत्याच १५ मे रोजी ३० महिलांच्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, २२ मे रोजी आणखी सुमारे ३० महिलांच्या शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
-------------
‘ग्रामीण रुग्णालयाचा प्रभारी कारभार माझ्याकडे आहे. तरीही रुग्णालयातील सुविधांकडे माझे लक्ष आहे. सिझरद्वारे प्रसूती करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध व्हावी, यासाठी वरिष्ठांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. मात्र, त्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञांची आवश्यकता आहे. लवकरच ही सुविधा सुरू होईल.
-डॉ. सतीश लोंढे,प्रभारी आरोग्य अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com