Rushiraj Sawant : व्यवसायाच्या निमित्ताने बँकॉकला निघालो होतो; ऋषिराज सावंत यांची पोलिसांना माहिती

ऋषिराज सावंत यांचे अपहरण झाल्याच्या बातमीने सोमवारी दुपारपासून तपास यंत्रणा कामाला लागल्या होत्या.
rushiraj sawant
rushiraj sawantsakal
Updated on

पुणे - ‘व्यवसायाच्या निमित्ताने बँकॉकला निघालो होतो,’ असे ऋषिराज सावंत यांनी चौकशीत म्हटल्याचे पुणे पोलिसांनी आज सांगितले. ऋषिराज माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुत्र आहेत.

ऋषिराज यांचे अपहरण झाल्याच्या बातमीने सोमवारी दुपारपासून तपास यंत्रणा कामाला लागल्या होत्या. मात्र, त्यांचे अपहरण झाले नसून खासगी विमानाने ते बँकॉकला निघाले असल्याचे रात्री स्पष्ट झाले होते. हे विमान पुण्याला परत फिरवण्यासाठी फार मोठी यंत्रणा वापरली गेली. ऋषिराज यांच्या कथित अपहरणनाट्याबद्दल पोलिसांनी त्यांच्यासह त्यांच्या दोन मित्रांकडे आज चौकशी सुरू केली आहे. ‘मी व्यवसायाच्या निमित्ताने बँकॉकला जात होतो.

मात्र मी नुकताच दुबईवरून परत आल्याने कुटुंबीय मला बँकॉकला जाऊ देणार नव्हते. त्यामुळे मी कोणाला न सांगता बँकॉकला निघालो होतो,’ असे ऋषिराज यांनी चौकशीत पोलिसांना सांगितले. या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी त्याच्याकडे पुन्हा चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

चार्टर्ड विमानाचे शुल्क ७८ लाख ५० हजार रुपये -

ऋषिराज हे गेल्याच आठवड्यात दुबईची सैर करून पुण्यात आले होते. त्यानंतर त्यांना व्यावसायिक कामासाठी बँकॉकला जायचे होते. त्यासाठी त्यांनी ‘ग्लोबल फ्लाइट हॅडलिंग सर्व्हिसेस’ कंपनीकडून रविवारी खासगी विमान आरक्षित करण्यात आले होते. त्यासाठी ७८ लाख ५० हजार रुपयांचे शुल्क भरले होते.

मात्र सोमवारी सावंत यांच्या घरात वाढदिवस सोहळा होता. त्यामुळे, ऋषिराज यांनी लगेच बँकॉकला जाऊ नये, असे सावंत कुटुंबीयांचे मत होते. त्यावरून कुटुंबीयांमध्ये वाद झाले. त्यामुळे, परिवारात कोणालाही न सांगता ऋषिराज व त्यांचे दोघे मित्र परस्पर विमानतळावर गेले. त्यांना तेथे सोडून आलेल्या वाहनचालकानेच ही बाब सावंत कुटुंबीयांना सांगितली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नियंत्रण कक्षात आला होता अपहरण झाल्याचा फोन -

ऋषिराज याचे अपहरण करण्यात आले आहे, असा फोन पोलिस नियंत्रण कक्षाला आला होता. त्यानंतर पोलिसांची एकच धावपळ उडाली. याबाबत सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले की, अपहरणाचा फोन आला होता. मात्र, हा फोन नेमका कोणी केला? हे अद्याप कळू शकले नाही.

परतीच्या प्रवासाची कल्पनाच नव्हती -

पुणे पोलिस आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या पाठपुराव्यामुळे ऋषिराज प्रवास करत असलेले विमान पुन्हा पुण्यात उतरविण्यात आले. त्यावेळी ‘आपण बँकॉकला पोचलो, या विचाराने सावंत यांचा मुलगा व त्याचे मित्र विमानातून उतरले. मात्र, काही क्षणातच त्यांना आपण पुन्हा पुण्यातच आलो आहोत, असे कळाले. आपण बँकॉक ऐवजी पुन्हा पुण्यात आल्याचे समजल्यानंतर तिघांनाही मोठा धक्का बसला. त्यांना परतीच्या प्रवासाची कल्पना देण्यात आली नव्हती. विमानात ऋषिराज, त्यांचे दोन मित्र तसेच महिला वैमानिकासह तीन कर्मचारी होते.

माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा खासगी विमानाने बँकाँककडे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर यंत्रणांशी समन्वय साधून हे विमान सोमवारी रात्री नऊच्या सुमारास लोहगाव विमानतळावर उतरविण्यात आले. सावंत यांचा मुलगा आणि त्याच्याबरोबर असलेल्या दोन मित्रांची चौकशी करण्यात आली आहे. त्यांना परत चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे.

- रंजनकुमार शर्मा, सहपोलिस आयुक्त

ऋषिराज यांचे अपहरण करण्यात आल्याचा गुन्हा सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात दाखल आहे. त्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे.

- संभाजी कदम, पोलिस उपायुक्त, परिमंडळ तीन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com