esakal | `उंट की सैर’ कर्मचारी सैरभैर

बोलून बातमी शोधा

panchanama}

आमच्या व्यक्तिमत्वाकडे बघून अनेकजण आम्हाला ‘उंटावरचा शहाणा’ समजतात. येनकेन प्रकारे त्यांचे म्हणणेही प्रत्यक्षात येईल.

`उंट की सैर’ कर्मचारी सैरभैर
sakal_logo
By
सु. ल. खुटवड

मा. महापौर व आयुक्त,
विषय : कार्यालयात उंट घेऊन येण्यास परवानगी मिळणेबाबत.
मेरेहबान साहेब, उपरोक्त विषयाला अनुसरून, मी संदीपराव दिनकरराव डासमारे, उम्र ४७, कद - ५ फूट सात इंच, सेवा- महापालिकेच्या मच्छर निर्मुलन विभागात १८ वर्षे. सध्या पेट्रोलचे भाव गगनाला भिडल्याने दुचाकी आम्हाला परवडत नाही. त्यामुळे उंटावरून महापालिकेत येण्यास परवानगी मिळावी, ही विनंती. नांदेडमधील एका शासकीय इसमाने घोड्याची परवानगी मागितली होती. मात्र, आम्हाला घोडाही परवडणार नसल्याने आम्ही उंटाची निवड केली आहे. मेहेरबान साहेब, आम्ही कात्रज परिसरात राहतो. तिथे दोन- दोन, तीन- तीन दिवस नळाला पाणीच येत नाही. या परिस्थितीत आम्हाला उंटाशिवाय दुसरा प्राणी उपयोगाचा नाही. उंटाला महिनाभर पाणी मिळाले नाही तर चालते, हे आपणास ज्ञात असेलच. आमच्या व्यक्तिमत्वाकडे बघून अनेकजण आम्हाला ‘उंटावरचा शहाणा’ समजतात. येनकेन प्रकारे त्यांचे म्हणणेही प्रत्यक्षात येईल.

आमच्या शेजारीच महापालिकेचे कात्रज प्राणिसंग्रहालय आहे. उंट सोडून तिथे सगळे प्राणी आहेत. त्यामुळे आमच्या सुटीच्या व रजेच्या काळात आम्ही प्राणिसंग्रहालयाला मोफत उंट पुरवू, याची आम्ही हमी देतो.रस्त्यावरून उंट रमत- गमत चालतो व रवंथ करत असतो. त्यामुळे आम्हाला कामावर येण्यास उशीर होईल, अशी भीती तुम्हाला वाटत असेल तर ती निराधार आहे. आम्ही मच्छर निर्मूलन विभागात नोकरीस असल्याने कामाचा फारसा ताण नसतो. त्यामुळे मोटारसायकलवरून आलो तरी आम्ही रमतगमतच येतो व आल्यानंतर लगेचच जेवणाची सुटी होत असल्याने तासभर तरी आम्ही ‘रवंथ’ करतो. नाहीतरी आमच्याकडे बघून इतर कर्मचारी ‘उंटावरून शेळ्या हाकतो’ असे म्हणतात. त्यामुळे उंटावरून आम्ही आल्यास त्यांचे म्हणणे शब्दशः खरे ठरेल. वरील बाबींना अनुसरून, महापालिकेत आम्हाला उंट घेऊन येण्यास परवानगी मिळावी, ही विनंती.
हेही वाचा - पुणे झेडपीतील अंतर्गत वादाची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली दखल; दोन्ही गटांची कानउघाडणी
मा. संदीपराव दिनकरराव डासमारे,
आपला विनंतीअर्ज (आवक क्र. ब १३ \२३४३ ) मिळाला. आपण उंट खरेदी केला असल्याचे समजले. मात्र, त्यासाठी कोणाची परवानगी घेतली? त्यासाठी आपल्या उत्पन्नाचा स्रोत काय? गेल्या पाच वर्षातील ज्ञात उत्पनाच्या स्त्रोतांची माहिती द्यावी, तसेच सोबत १६ नंबरचे पाच वर्षांचे फॉर्म जोडा. उंट खरेदी करताना वन्यजीव खात्याची परवानगी घेतली का? उंट चालविण्यासाठी शासकीय मान्यताप्राप्त संस्थेतून आपण प्रशिक्षण घेतले आहे का? असल्यास दाखला जोडावा, सध्या उंटाला पुरविण्यात येणाऱ्या खाद्याचा दर्जा अन्न व औषध खात्याकडून तपासला जात आहे का? सध्या तुम्ही राहत असलेल्या सोसायटीत उंट बांधत असाल तर सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ जोडा, तसेच सोसायटीचा सातबारा व इतर नकाशे द्या.
कात्रज ते महापालिका हा प्रवास करण्यासाठी पोलिसांचे व पीएमपीचे ‘ना हरकत प्रमात्रपत्र जोडावे. कामावर येताना मध्येच काहींना तुम्ही ‘उंट की सैर’ घडवून, अतिरिक्त पैसे कमावणार. हे उत्पन्न तुम्ही कोणत्या हेडखाली टाकणार, याचा सविस्तर तपशील द्यावा. तुम्ही दिलेल्या माहितीनुसार, तुम्हाला फारसे काम नसते. त्यामुळे गेली १८ वर्षे तुम्ही फुकटचा पगार घेत असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे तुमच्या कामाचे आॅडिट करण्याचे आदेश आम्ही देत आहोत. त्यात दोषी आढळल्यास तुम्हाला कायमस्वरूपी रस्त्यांवर वा मैदानात लहान मुलांना ‘उंट की सैर’ करता येईल. त्यातून तुमचा संसार व्यवस्थित चालला नाहीतर ती जबाबदारी सर्वस्वी तुमची असेल.
-कळावे, वरिष्ठ अधिकारी, महापालिका.
हे पत्र वाचून संदीपराव डासमारे यांनी उंट विकून टाकला असून, दुसऱ्या दिवशी ते कार्यालयीन वेळेच्या तासभर आधी महापालिकेत पोचले असल्याचे समजते.