esakal | #SaathChal तुकोबांच्या पालखीचे इंदापुरात रिंगण
sakal

बोलून बातमी शोधा

ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करताना टाळकरी महिला.

#SaathChal तुकोबांच्या पालखीचे इंदापुरात रिंगण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

इंदापूर - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण आज इंदापुरात झाले. विठुनामाच्या गजरात रंगलेला हा सोहळा पाहण्यासाठी शहरासह परिसरातील नागरिकांनी हजेरी लावली होती.  

दरम्यान, पालखीतळावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते अश्वांचे पूजन करण्यात आले.
पालखी सोहळ्याचे दुपारी बारा वाजता सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर आगमन झाले. नगराध्यक्षा अंकिता शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, जिल्हा परिषदेचे सभापती प्रवीण माने, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, काँग्रेसचे गटनेते कैलास कदम, नगरसेवक श्रीधर बाब्रस, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, तालुका कार्याध्यक्ष अमोल भिसे, शहराध्यक्ष अनिल राऊत, इंदापूर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष भरत शहा, शिवसेनेचे विशाल बोंद्रे, भाजपचे शहराध्यक्ष माऊली वाघमोडे, शेखर पाटील, सुनील अरगडे, मुन्ना बागवान, आरशद सय्यद यांनी सोहळ्याचे स्वागत केले. 

श्री नारायणदास रामदास हायस्कूल, तसेच मूकबधिर विद्यालयाची विठ्ठल-रुक्‍मिणी व वारकरी वेशातील मुलांची दिंडी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. त्यानंतर विठ्ठल ननवरे, धनंजय बाब्रस, बाळासाहेब मोरे, रमेश शिंदे, अमर गाडे, स्वप्नील राऊत, जगदीश मोहिते, पोपट पवार, राजू चौगुले, अजिंक्‍य वाघ, अजित महाराज गोसावी, गानबोटे यांनी रथातून पालखी कदम विद्यालयात आणली. बारामतीचे प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलिस निरीक्षक मधुकर पवार, बांधकाम विभागाचे उपअभियंता धनंजय वैद्य, कदम विद्यालयाचे मुख्याध्यापक रामचंद्र पाटील यांनी रिंगण सोहळ्याची चोख व्यवस्था ठेवली.   

आबालवृद्धांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या रिंगण सोहळ्यास दुपारी साडेबारा वाजता ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात सुनील मोरे महाराज यांनी सुरवात केली. प्रथम पताकावाले झेंडेकरी, नंतर तुळस व हंडा घेतलेल्या महिला, टाळकरी, विणेकरी यांनी रिंगण पूर्ण केल्यानंतर मानाच्या अश्वाने रिंगण पूर्ण केले. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात भाविकांनी झिम्मा, फुगड्या, मानवी मनोरे आदी खेळांचा आनंद लुटला. त्यानंतर पालखी सोहळा मुख्य बाजार पेठेतून मुक्कामासाठी श्री नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये गेला. 

तत्पूर्वी, नागवेलीच्या पानाच्या निमगाव केतकी येथून सकाळी सोहळ्याने प्रस्थान केल्यानंतर सोनमाथ्यावर सोनाई परिवार व मंगलसिद्धी दूध संघाने सोहळ्याचे स्वागत केले. त्यानंतर गोखळीच्या सरपंच कमल राऊत, तरंगवाडीच्या सरपंच मंदाकिनी तरंगे, तसेच सहकाऱ्यांनी पालखीचे स्वागत करून अल्पोपाहार दिला. रघुनाथ पन्हाळकर व रामभाऊ शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. 

loading image