esakal | #SaathChal रोटी घाटात फुलला भक्तीचा मळा
sakal

बोलून बातमी शोधा

रोटी घाट (ता. दौंड) - विठुनामाच्या गजरात तल्लीन होऊन नाचणारे वारकरी.

#SaathChal रोटी घाटात फुलला भक्तीचा मळा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वरवंड - ऊन-सावल्यांच्या खेळात मुखी विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन झालेले वैष्णव, अशा भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने दौंड तालुक्‍यातील रोटीच्या नागमोडी घाटाचा अवघड टप्पा पार केला. हिरवाईने नटलेल्या घाटात भगव्या पताका व वारकऱ्यांमुळे भक्तीचा मळा फुलला होता. 

संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा वरवंड येथील मुक्काम आटोपून विसाव्यासाठी गुरुवारी (ता. १२) पाटस येथे सकाळी नऊ वाजता दाखल झाला. पाटस येथे पालखीचे ग्रामस्थांनी जंगी स्वागत केले. आरती व पूजन करून पालखी नागेश्‍वर मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली. या वेळी सरपंच वैजयंता म्हस्के, उपसरपंच आशा शितोळे, जिल्हा परिषद सदस्य सारिका पानसरे, माजी सरपंच शीतल भागवत, साहेबराव वाबळे, अरुण भागवत, डॉ. मधुकर आव्हाड, योगेंद्र शितोळे, सत्वशील शितोळे, संभाजी चव्हाण, मिलिंद दोशी, लता खारतुडे, संभाजी देशमुख, मंडल अधिकारी प्रकाश भोंडवे आदी उपस्थित होते.

पालखीच्या दर्शनासाठी दौंडसह, शिरूर, श्रीगोंदा, कर्जत आदी तालुक्‍यातून मोठ्या संख्येने नागरिक दर्शनासाठी आले होते. अकरा वाजता पालखी रोटीकडे मार्गस्थ झाली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पालखीचे रोटीच्या नागमोडी घाटात आगमन झाले. पहिला अवघड टप्पा पार करून पालखी सोहळा दुसऱ्या टप्प्यातील अवघड वळणावर आला. वातावरणातील बदलामुळे वारकऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. विठू नामाचा गजर करत कधी फुगडी; तर कधी उड्या मारीत वारकरी बेभान झाले होते. दुसऱ्या टप्प्यातील अवघड वळणाचा घाट पार करण्यासाठी पालखी रथाला अतिरिक्त तब्बल पाच बैल जोड्या लावण्यात आल्या होत्या. घाटातील विलोभनीय दृश्‍य पाहण्यासाठी घाटात भक्तीचा मळा फुलला गेला होता.

अंदाजे दीड किलोमीटरचा घाटाचा नागमोडी टप्पा पार करीत पालखी सोहळा रोटी गावाकडे मार्गस्थ झाला. दुपारी रोटी ग्रामस्थांच्या वतीने पालखीची पूजा, अभंग व आरती करण्यात आली. तालुक्‍यातील शेवटच्या टप्प्यात वासुंदे येथे काही वेळ पालखी विसाव्यासाठी ठेवण्यात आली. दरम्यान, पाटस येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वतीने भाविकांसाठी आरोग्य तपासणी करून मोफत औषध उपचार करण्यात आले. तसेच, अनेक सामाजिक व सेवाभावी संस्थेच्या वतीने भाविकांना पाणी, फराळ, चहा, नाष्टा व भोजनाची व्यवस्था केली होती.

loading image