उद्योगनगरीचिये भाळी साहित्य संमेलनांची मांदियाळी

- पीतांबर लोहार
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

पिंपरी - ‘न भूतो न भविष्यती’ असे ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गेल्या वर्षी शहरात झाले. मात्र, त्यापूर्वीपासूनच साहित्याची सेवा उद्योगनगरीत होत आहे. गेल्या दहा-बारा वर्षांत अनेक संस्थांची साहित्य संमेलने झाली आहेत. त्यांची संख्या पाहता, ‘उद्योगनगरीचिये भाळी साहित्य संमेलनांची मांदियाळी,’ असेच म्हणावे लागेल. ८९ व्या संमेलनाच्या ‘कवी कट्टा’मधील निवडक ८९ सर्वोत्कृष्ट कवितांच्या ‘एकोणनव्वद’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मंगळवारी (ता. २८) पिंपरीत होत आहे.

पिंपरी - ‘न भूतो न भविष्यती’ असे ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गेल्या वर्षी शहरात झाले. मात्र, त्यापूर्वीपासूनच साहित्याची सेवा उद्योगनगरीत होत आहे. गेल्या दहा-बारा वर्षांत अनेक संस्थांची साहित्य संमेलने झाली आहेत. त्यांची संख्या पाहता, ‘उद्योगनगरीचिये भाळी साहित्य संमेलनांची मांदियाळी,’ असेच म्हणावे लागेल. ८९ व्या संमेलनाच्या ‘कवी कट्टा’मधील निवडक ८९ सर्वोत्कृष्ट कवितांच्या ‘एकोणनव्वद’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मंगळवारी (ता. २८) पिंपरीत होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर विविध संस्थांनी पूर्वी शहरात भरविलेल्या साहित्य संमेलनांचा आढावा घेतला असता, उद्योगनगरीची वाटचाल साहित्यनगरीकडे सुरू असल्याचे दिसून आले.

‘बंधुता’ची १८ संमेलने
बंधुता प्रतिष्ठान आणि बंधुता साहित्य परिषदेची १८ राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलने, १२ विचारवेध संमेलने, विद्यार्थी व शिक्षकांची तीन साहित्य संमेलने आणि कामगार व महिलांची प्रत्येकी दोन संमेलने झाली आहेत. त्याबाबत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे म्हणाले, ‘‘विचाराशिवाय गती नाही, गतीशिवाय प्रगती नाही, ही वैचारिकता स्वीकारून राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलने सुरू केली. या विचारांचेच अध्यक्ष संमेलनाला दिले असून भविष्यात उगवत्या साहित्यिकांना संधी देणार आहे.’’

ग्रामजागर अन्‌ कामगार संमेलने
शहरातील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाच ग्रामजागर साहित्य संमेलने राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झाली आहेत. प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले म्हणाले, ‘‘महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या माध्यमातून १६ कामगार साहित्य संमेलने आणि २२ कामगार प्रबोधन संमेलने घेण्यात आली आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखा व नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी यांच्या वतीने संमेलन भरविले होते. कामगारांतील लेखक, कवींना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी कामगार साहित्य संमेलनांची सुरवात पद्मश्री नारायण सुर्वे यांनी केलेली आहे’

स्त्री साहित्य कला संमेलने
स्वानंद महिला संस्थेने शहरात अखिल भारतीय स्तरावरील १२ स्त्री साहित्य कला संमेलने घेतली आहेत. संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष प्रा. सुरेखा कटारिया म्हणाल्या, ‘‘महिलांमधील सुप्त गुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांना लिहिते करावे, यासाठी संस्थेच्या माध्यमातून स्त्री संमेलने भरविली जात आहेत. महिला स्वावलंबनासाठी साहित्य व कला याबरोबरच कौशल्यविकास उपक्रमही राबवीत आहोत.’’

समरसता साहित्य व कवी संमेलने
समरसता साहित्य परिषदेने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंत आठ विद्यार्थी साहित्य संमेलने घेतली आहेत. परिषदेचे पिंपरी- चिंचवड शाखाध्यक्ष रमेश वाकनीस म्हणाले, ‘‘गेल्या तीन वर्षांपासून काव्य मैफील करंडक स्पर्धाही घेत आहोत. ‘कवितेकडून कवितेकडे’ हे संमेलन भरविले जात आहे. यात नामवंत कवींच्या कवितांचा रसास्वाद घेतला जातो. विद्यार्थ्यांसाठी अभिवाचन कार्यशाळाही घेतली जात आहे.’’ 

संमेलनपूर्व संमेलन अन्‌ कवी कट्टा
८९ व्या साहित्य संमेलनाची नांदी म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी- चिंचवड शाखेने घेतलेले ‘संमेलनपूर्व संमेलन’. यात शहरातील सर्व संस्थांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न झाला. याबाबत शाखाध्यक्ष व मसाप जिल्हा प्रतिनिधी राजन लाखे म्हणाले, ‘‘मसापने २०१३ मध्ये प्राधिकरणात एक दिवसीय साहित्य संमेलन घेतले होते. त्यातील ‘कवी कट्टा’ ही संकल्पना सर्वांच्या पसंतीस पडली.’’

अन्य संमेलनेही उल्लेखनीय
सांगवीतील सरदार वल्लभभाई पटेल संस्थाही पटेलांच्या नावे साहित्य संमेलने घेते.  
शब्दधन काव्य मंचानेही एक दिवसीय साहित्य संमेलन भरविले होते. 
अहिराणी कस्तुरी परिवाराने अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन घेतले.
आमदार लक्ष्मण जगताप सांस्कृतिक कला मंचाने सांगवीत वारकरी साहित्य संमेलन घेतले होते. 
कामगार कल्याण मंडळाने गुणवंत कामगारांचे साहित्य संमेलन भरवून कामगारांमधील लेखक- कवींना प्रोत्साहन दिले होते. 
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आकुर्डीत एक दिवसीय संमेलन घेतले होते.

Web Title: sahitya sammelan pimpri