Sahyadri Forest Antibiotics : सह्याद्रीत प्रतिजैविकांचा खजिना; ‘एनसीएल’चे संशोधन

सह्याद्रीच्या निबिड जंगलांमध्ये केवळ पशू-पक्ष्यांचे वैविध्य नाही, तर प्रतिजैविकांचा (अँटिबायोटिक) अनमोल खजिनाही दडला आहे.
Sahyadri Forest Antibiotics
Sahyadri Forest Antibioticssakal

पुणे - सह्याद्रीच्या निबिड जंगलांमध्ये केवळ पशू-पक्ष्यांचे वैविध्य नाही, तर प्रतिजैविकांचा (अँटिबायोटिक) अनमोल खजिनाही दडला आहे. सध्या संपूर्ण जग ज्या ‘ॲँटिमायक्रोबियल रेजिस्टन्स’च्या सावटाखाली वावरत आहे. त्याच्या विरोधात लढण्यासाठी सह्याद्रीच्या डोंगररांगानी नवे हत्यार दिले आहे.

देशाच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने (एनसीएल) तब्बल ५०० नव्या जैवसक्रिय सूक्ष्मजीवांचा (बायोॲक्टिव्ह) शोध घेतला असून, प्रथमच त्यांचे अस्तित्व सिद्ध झाले आहे.

पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सय्यद दस्तगीर यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद कांबळे, अबू जुनैद खान, प्रियांका बनकर आणि प्रदीप एस. या संशोधकांनी ही कामगिरी केली आहे. ‘जर्नल ऑफ नॅचरल प्रॉडक्ट’ या शोधपत्रिकेत यासंबंधीचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. जानेवारी २०१५ ते २०२० या कालावधीत पश्चिम घाटातील दुर्गम अभयारण्यामध्ये संशोधकांनी ५० ठिकाणांची निवड केली होती.

त्यातील २० ठिकाणी मिळालेल्या जैवसक्रिय सूक्ष्मजीवांचे अध्ययन केल्यानंतर नव्या प्रजातींचा शोध लागला आहे. त्यातील एका प्रतिजैविकाने रुग्णालयातील संसर्गाला कारणीभूत जिवाणूरोधी गुणधर्म दाखविला आहे. ‘एनसीएल’च्या नावावरून ‘एनसीलियामायसीन’ असे त्याचे नामकरण केले आहे.

संशोधनाची गरज

मागील ३० वर्षांपासून प्रतिजैविकांवरील संशोधन नसल्यात जमा आहे. तसेच सातत्याने प्रतिजैविकांच्या सेवनामुळे मानवी शरीरही त्यांना दाद देत नाही. त्यामुळे जगभरातच ॲँटिमायक्रोबियल रेजिस्टन्सविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. असेच चालू राहिल्यास नवनवीन जिवाणूजन्य आजारांची वैश्विक साथ येण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जगभरात यासंबंधीच्या संशोधनाला चालना दिली असून, स्ट्रेप्टोमायसीस प्रजातीव्यतिरिक्त नवे जिवाणू शोधण्यात येत आहेत.

..असे झाले संशोधन

पश्चिम घाटातील (सह्याद्री) सूक्ष्मजीवांबद्दल अजूनही पुरेशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे शास्त्रज्ञांनी ॲँटिमायक्रोबियल रेजिस्टन्स रोखणाऱ्या नव्या प्रतिजैविकांच्या शोधासाठी सह्याद्रीची निवड केली. मानवी हस्तक्षेपापासून दूर असलेल्या ५० पैकी २० ठिकाणांतील माती आणि वनस्पतीच्या जिवाणूंचे प्रयोगशाळेत संवर्धन करण्यात आले. त्यातील प्रतिजैविक गुणधर्माची पडताळणी करण्यात आली.

शोधाचे महत्त्व

  • जैवसक्रिय सूक्ष्मजीवांच्या पूर्णतः नव्या ५०० प्रजातींचा शोध

  • एनसीलियामायसीन प्रजाती रुग्णालयातील जिवाणू संसर्गरोधी (मिथीसीलीन रेजिस्टन्स)

  • ॲँटिमायक्रोबियल रेजिस्टन्स रोखण्यासाठी नव्या प्रतिजैविकांची मोठी मदत होणार आहे

  • बहुतेक प्रतिजैविके ग्राम-निगेटिव्ह सूक्ष्मजीवरोधी

  • भविष्यात अजून नव्या प्रजातींचा शोध शक्य

आम्ही शोधलेल्या ५०० जैवसक्रिय सूक्ष्मजीवांपैकी एकाचे विश्लेषण पूर्ण झाले आहे. एनसीलियामायसीन नावाचे हे प्रतिजैविक रुग्णालयातील संसर्गाला कारणीभूत सूक्ष्मजीव विरोधी गुणधर्म दाखविते. या सूक्ष्मजीवांच्या विश्लेषणातून नक्कीच मानवजातीच्या कल्याणासाठी नव्या औषधांचा शोध लागेल.

- डॉ. सय्यद दस्तगीर, वरिष्ठ शास्त्रज्ञ, एनसीएल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com