

Sahyadri Sports Weightlifters Shine at Pune District Championship
esakal
लोणी काळभोर: वेटलिफ्टिंग संघटना पुणे यांच्या वतीने पुण्यातील हरीभाई देसाई कॉलेज येथे रविवारी (दि. १५) आयोजित भव्य जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत लोणी काळभोर येथील सह्याद्री स्पोर्ट अँड फिटनेस सेंटरच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत केंद्राच्या १८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यापैकी आठ खेळाडूंनी सुवर्णपदकांची कमाई केली असून, त्यांची सांगली येथे २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या जिल्हास्तरीय स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील एकूण १३५ खेळाडूंनी १२, १४ आणि १७ वर्षांखालील वयोगटांत सहभाग घेतला होता. सह्याद्री स्पोर्ट अँड फिटनेस सेंटरच्या खेळाडूंनी आठ सुवर्ण, पाच रौप्य आणि तीन कांस्यपदकांची कमाई करत आपल्या गुणवत्तेची छाप पाडली.