

पुणे, ता. १५ : ग्रामीण भागातील विकासकामांसाठी उद्योगांकडून मिळणाऱ्या औद्योगिक क्षेत्राच्या सामाजिक जबाबदारी निधीचा (सीएसआर) अधिक प्रभावी वापर करण्यासाठी जिल्हा परिषदेने ‘सहयोग’ हे पोर्टल सुरू केले आहे. या माध्यमातून कंपन्या, स्वयंसेवी संस्था आणि जिल्हा परिषद एकाच डिजिटल व्यासपीठावर येणार आहे. त्याद्वारे शाळा, अंगणवाडी, आरोग्य, पाणी, पर्यावरण, क्रीडा आणि कौशल्य विकासाशी संबंधित प्रकल्पांची माहिती कंपन्यांना उपलब्ध होणार आहे.
‘सीएसआर’च्या माध्यमातून ग्रामीण भागात विविध विकासकामे केली जातात. मात्र, कंपन्यांना गरजेनुसार योग्य प्रकल्पाची निवड करणे आणि प्रशासनाशी समन्वय साधणे यासाठी स्वतंत्र प्रक्रिया करावी लागते. ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने ‘सहयोग’ पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलवर जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्प, त्यांच्या गरजा आणि प्राधान्यक्रमाची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कंपन्यांना त्यांच्या सीएसआर धोरणानुसार प्रकल्प निवडता येईल. त्यानंतर प्रशासनाशी थेट संपर्क साधून प्रकल्पासाठी सहकार्य करता येणार आहे. स्वयंसेवी संस्थांनाही अंमलबजावणी भागीदार म्हणून नोंदणी करता येणार आहे.
प्रक्रिया वेगाने होणे अपेक्षित
सीएसआर कंपन्या, स्वयंसेवी संस्था आणि जिल्हा परिषदेला एकाच व्यासपीठावर आणल्यामुळे प्रकल्पांची माहिती, गरजा आणि प्राधान्यक्रम एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे योग्य प्रकल्पाची निवड आणि सहकार्याची प्रक्रिया अधिक जलद होण्याची अपेक्षा आहे. सीएसआर निधीचा गरजाधारित आणि परिणामकारक वापर करण्यासाठीही या पोर्टलचा उपयोग होणार आहे.
दृष्टीक्षेपात
- उद्देश : सीएसआर निधीतून ग्रामीण विकासाला चालना
- भागीदार : कंपन्या, स्वयंसेवी संस्था आणि जिल्हा परिषद
- क्षेत्रे : शिक्षण, आरोग्य, पाणी, अंगणवाडी, पर्यावरण, क्रीडा, कौशल्य विकास व पायाभूत सुविधा
- कंपन्यांसाठी सुविधा : प्रकल्प पाहणे, निवडणे आणि प्रशासनाशी संपर्क
- स्वयंसेवी संस्थांसाठी सुविधा : अंमलबजावणी भागीदार म्हणून नोंदणी
ग्रामीण भागातील प्रत्येक घटकापर्यंत विकासाच्या संधी पोहोचवणे, हे आमचे मुख्य ध्येय आहे. ‘सहयोग’च्या माध्यमातून शासकीय यंत्रणा आणि उद्योगांचा सीएसआर निधी एकत्रितपणे विकासकामांसाठी वापरता येईल. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, पाणी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळेल.
- वीरधवल जगदाळे, अध्यक्ष, जिल्हा परिषद
प्रशासन आणि सीएसआर भागीदार यांच्यातील सहकार्य अधिक जलद, पारदर्शक आणि उत्तरदायी करणे हा ‘सहयोग’ पोर्टलचा उद्देश आहे. पोर्टलमुळे उपलब्ध प्रकल्पांची गरज आणि प्राधान्यक्रम स्पष्टपणे समोर येतील. त्यामुळे सीएसआर निधीचा योग्य ठिकाणी आणि गरजू घटकांसाठी प्रभावी वापर करता येईल.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.