
Sakal Chitrakala Spardha 2023 : भव्य, विश्वविक्रमी सकाळ चित्रकला स्पर्धा येत्या २२ रोजी
पुणे : ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी १९८५ पासून आयोजित केली जाणारी राज्यव्यापी ‘सकाळ - चित्रकला स्पर्धा -२०२३’ यंदा रविवारी (ता. २२ जानेवारी) सुमारे २००० पेक्षा जास्त केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे.
एकाच दिवशी, एकाच वेळी आयोजित केली जाणारी स्पर्धा म्हणून ‘सकाळ - चित्रकला स्पर्धे’ची सर्वत्र ख्याती आहे. गेली ३७ वर्षे सातत्याने ही स्पर्धा होत असून यंदा स्पर्धेचे हे ३८ वे वर्ष आहे. कोरोना काळात सुद्धा ऑनलाइन स्वरूपात ही स्पर्धा घेण्यात आली होती.
आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला असून, सर्वात मोठी चित्रकला स्पर्धा म्हणून या स्पर्धेची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. याशिवाय २०१८ साली आयोजित केलेल्या स्पर्धेतील लक्षणीय सहभागाची नोंद ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ या जागतिक स्तरावरील प्रमाणित संस्थांनी घेतली आहे.
मुलांना आपले विचार मुक्तपणे आणि कलात्मक पद्धतीने मांडता यावेत, यासाठी स्पर्धेची सुरुवात झाली. दरवर्षी लाखो शालेय विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत आहेत. सकाळ मराठी डिजि माध्यम हे या स्पर्धेचे शैक्षणिक पार्टनर आहे. विजेत्या विद्यार्थ्यांना विविध पातळ्यांवर लाखो रूपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.
स्पर्धेत सहभागासाठी वयाचे बंधन नाही. ही स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचे विद्यार्थी, विविध विद्या शाखांच्या महाविद्यालयीन युवक-युवती, तसेच पालक व आजी आजोबांसाठी खुली व विनामूल्य असेल. ही स्पर्धा एकूण सहा गटांत घेण्यात येईल. शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा निवडलेल्या स्पर्धा केंद्रावर प्रत्यक्ष होणार असून, फक्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची स्पर्धा ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही स्वरूपात असेल. तसेच, पालक आणि आजी-आजोबांसाठी ही स्पर्धा फक्त ऑनलाइन असेल.
स्पर्धेचे स्वरुप
विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग (ऑफलाइन)
इयत्ता पहिली ते दहावी विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र व गोवा राज्यात, प्रत्यक्ष स्पर्धा केंद्रांवर उपस्थित राहून घेण्यात येईल. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना चित्रकलेचा कागद सकाळच्या वतीने स्पर्धा केंद्रांवर पुरविला जाईल. रंग साहित्य विद्यार्थ्यांनी आणावयाचे आहे. जिल्हावार स्पर्धा केंद्रांची यादी सकाळमधून लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.
इयत्ता ११ वी ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी स्पर्धा, ऑफलाइन व ऑनलाइन अशा दोन्ही स्वरुपात असेल. ऑफलाइन स्पर्धा ही निवडक महाविद्यालयीन स्पर्धा केंद्रांवर होईल.
‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेचे हे ३८ वे वर्ष असून, तीन पिढ्यांना जोडलेली ही एकमेव स्पर्धा आहे. यामुळे यंदाची स्पर्धा पालक व आजी-आजोबांसाठी सुद्धा आयोजित करण्यात येत आहे. फक्त त्यांच्यासाठी ही स्पर्धा ऑनलाइन स्वरूपात असेल.
गरजू विद्यार्थी व दिव्यांग विद्यार्थ्यांना संधी
राज्यभरातील प्रमुख शहरातील आश्रम शाळांमधील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांद्वारे संचालित वसतिगृहांमधील विद्यार्थी व विशेष आणि दिव्यांग विद्यार्थी सुद्धा स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी प्रमुख शहरातील आश्रम शाळा, विशेष आणि दिव्यांग शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी स्पर्धेसाठी खालील व्हाट्सॲप क्रमांकावर शाळांची नोंदणी करावी. एका शाळेतील सर्व विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी फक्त व्हॉट्सॲप क्रमांक - ८६०५०१७३६६/९९२२४१९१५०
स्पर्धेसाठीचे गट
अ - गट (पहिली ते दुसरी)
ब - गट (तिसरी ते चौथी)
क - गट (पाचवी ते सातवी)
ड - गट (आठवी ते दहावी)
इ - गट (११ वी ते महाविद्यालयीन सर्व शाखांचे विद्यार्थी)
फ - गट (पालक, आजी-आजोबा)
गटानुसार स्पर्धेची वेळ ः ‘अ’ व ‘ब’ गटांसाठी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३०, ‘क’ व ‘ड’ गटांसाठी सकाळी ९ ते १०.३०
ऑनलाइन सहभागी कसे व्हाल
ऑनलाइन स्पर्धेची वेळ ही सकाळी ९.०० ते सायं. ७.०० अशी राहील. या कालावधीत स्पर्धकांनी www.chitrakala.esakal.com या वेबसाईटवर नोंदणी करून, त्यांना आपले चित्र अपलोड करता येईल.
स्पर्धेचा अधिक तपशील, स्पर्धा केंद्रांची यादी व ऑनलाइन सहभागाचा तपशील, लवकरच सकाळमधून प्रसिद्ध केला जाईल. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ९८८१५९८८१५ या क्रमांकावर संपर्क साधावा.