युवकांसाठी ‘सकाळ’ची ई-लेखन स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

E-Writing

फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरसारख्या सोशल मीडियावर लाखो युवक-युवती रोज व्यक्त होताना दिसतात. मिम्सच्या माध्यमातून काहीजण खमंग, इंटरेस्टिंग पोस्टही सातत्याने करतात.

युवकांसाठी ‘सकाळ’ची ई-लेखन स्पर्धा

पुणे - फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरसारख्या सोशल मीडियावर लाखो युवक-युवती रोज व्यक्त होताना दिसतात. मिम्सच्या माध्यमातून काहीजण खमंग, इंटरेस्टिंग पोस्टही सातत्याने करतात. सखोल अभ्यास करून लेखन करणारे अनेकजण आहेत. या वर्गासाठी आता ‘सकाळ माध्यम समूहाने’ ई-लेखन स्पर्धा आयोजित केली आहे. यातील निवडक युवक-युवतींना ए. पी. ग्लोबाले आणि ‘सकाळ समूहा’तील कंपन्यांतही इंटर्नशीपचीही संधी मिळणार आहे.

स्पर्धेत युवा लेखकांना आपल्यातील प्रतिभा दाखवण्याची पुरेपूर संधी मिळणार आहे. विविध प्रकारच्या जाहिरातीसाठीचे लेखन (कॉपी रायटिंग : ५०-१०० शब्द), समाजमाध्यमांवरील लेखन (कंटेंट फॉर सोशल मीडिया, पोस्ट-हॅशटॅग आणि कमाल ५० शब्द) असे कौशल्य दाखविता येईल. शोधनिबंध (आकडेवारी, कोट आदींसह सुमारे २००० शब्द) स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. तिन्ही प्रकारच्या स्पर्धांत युवक-युवती सहभागी होऊ शकतात.

या स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या तसेच गुणवंत युवकांना सकाळ माध्यम समूहाच्या सकाळ वृत्तपत्र, फॉक्सबेरी टेक्नॉलॉजीज, साम टिव्ही, ई-सकाळ, ‘एपी ग्लोबाले समूह’ आदी विविध कंपन्यांत बातम्या, ऑनलाइन न्यूज, नागरिक-प्रशासन संवाद, ॲंकर-न्यूज रीडर आदी ठिकाणी इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धकांना ‘सकाळ डिजिटल लेखन फेस्ट’मध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. या फेस्टमध्ये पत्रकारिता व लेखन क्षेत्रातील दिग्गज मान्यवर स्पर्धकांना मार्गदर्शन करणार असून त्यांच्याशी संवादही साधता येईल. या फेस्टमधून तीन विजेते निवडले जाणार असून त्यांना आकर्षक पारितोषिके दिली जातील. सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र मिळणार आहे. स्पर्धेला १६ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धकांच्या लेखनाचे परीक्षण सकाळचे संपादक सम्राट फडणीस, फॉक्सबेरी टेक्नॉलॉजीचे ‘सीईओ’ अंकित भार्गव, साम टीव्हीचे संपादक प्रसन्न जोशी करणार आहेत.

स्पर्धेत सहभागी होण्याचे निकष

- या स्पर्धेत १६ ते २५ वयोगटातील युवक, युवती सहभागी होऊ शकतील.

- इंग्रजी, हिंदी, मराठी भाषेत ही स्पर्धा होईल

- लेखनाची, समाज माध्यमांद्वारे व्यक्त होण्याची आवड असावी.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रक्रिया -

- सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून गुगल फॉर्म भरावा

- स्पर्धेच्या कोणत्या प्रकारात सहभागी होणार आहात, त्याचा तपशील नमूद करायचा आहे

- या फॉर्ममधील सर्व तपशील अचूक भरायचा आहे.

स्पर्धेचे नियम

- लेखन स्वतःचे असावे

- वैयक्तिकरित्या स्पर्धेत सहभागी होता येईल

- परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल

- शोधनिबंधांसाठी आवश्यक तो तपशील (माहिती, आकडेवारी, संबंधितांच्या मुलाखती) स्पर्धकाने गोळा करायचा आहे.

टॅग्स :puneYouthSakalCompetition