ओढा म्हणतो... मी कसं वाहायचं?

ओढा म्हणतो... मी कसं वाहायचं?

आंबिल ओढ्याच्या जलप्रलयाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. ओढ्याचे पाणलोट क्षेत्र एखाद्या छोट्या धरणाइतके आहे. तीस चौरस किलोमीटरच्या परिसरात जमा होणारे पावसाचे पाणी तीव्र उताराने चिंचोळ्या नाल्यातून वाहून जाऊ शकते का, या प्रश्‍नाच्या उत्तराकडे सर्व स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी अन् प्रशासनानेही डोळेझाक केली. जलप्रलयातून कोणीही बोध घेतलेला नाही. ओढ्यात बेसुमार अतिक्रमणे झाली आहेत. प्रवाहात बिनधास्त भिंती उभ्या राहिल्या आहेत. पुण्याचे कारभारी या जलप्रलयाच्या मुळाशी जाऊन भिडणार का, हा कळीचा प्रश्न आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आंबिल ओढ्याच्या उगमापासून  मुठा नदीला येऊन मिळणाऱ्या प्रवाहाची प्रत्यक्ष पाहणी ‘सकाळ’च्या टीमने केली. या ओढ्याचे पाणलोट क्षेत्र, प्रवाहाच्या बदललेल्या दिशा, गेल्या वीस वर्षांत ओढा आणि त्याच्या बाजूला झालेली बांधकामे, त्यातील अतिक्रमणे आदींच्या सखोल शास्त्रशुद्ध नोंदी भूपृष्ठ विज्ञानतज्ज्ञ डॉ. श्रीकांत गबाले यांच्या मदतीने केल्या. ओढ्याला महापूर का आला, ते सगळं कसं घडलं, आणि आज नेमकी काय स्थिती आहे, यातून आपण काही बोध घेतला आहे का याचा वेध यात घेतला. त्यातूनच पुण्याचे कारभारी आणि प्रशासन यांच्याबद्दलचे प्रश्नचिन्ह उभे राहिलंय. पुण्यात गेल्या वर्षी २५ सप्टेंबरला ओढ्याने अचानक रौद्र रुप धारण केलं. त्याचं नेमकं कारण म्हणजे विकासाच्या नावाखाली आपण निसर्गाची अक्षरशः लचके तोड केली आहे. कोणी डोंगर पोखरले, तर कोणी ओढ्यात भर टाकली, काही ठिकाणी प्रवाह वळवला. या पार्श्वभूमीवर त्या दिवशी रात्री दोन-तीन तासांमध्ये धुवाधार पाऊस कोसळला. विकासाची सूज आलेल्या शहरातून हे पावसाचे पाणी वाहून जायला जागा होती तरी कुठे, भविष्यात असाच पाऊस पुन्हा झाल्यावर शहरानं पुन्हा बुडायचंच का हे प्रश्‍न पुणेकरांना आज पडलेच पाहिजेत. 

तब्बल ८४ जलस्रोत नष्ट
पावसाचे पाणी जमिनीवर पडल्यानंतर छोटा प्रवाह तयार होतो. असे पाच प्रवाह एकत्र वाहू लागले की, त्याला ओढा म्हटले जाते. पाणलोट क्षेत्रात हे प्रवाह सक्रिय असतात. पण, आंबिल ओढ्याच्या पाणलोट क्षेत्रातील डोंगर पोखरले गेलेत. प्रवाहांमध्ये बांधकामे झालीत. प्लॉट काढलेत. त्यातून पाण्याचे हे नैसर्गिक स्रोत उद्‌ध्वस्त झालेत. अशा वेळी पावसाचे पाणी वाहून जाणार तरी कसे? मग जशी वाट मिळेल तसे ते वाहू लागते. आंबिल ओढ्याच्या पाणलोट क्षेत्रात १९९१ मध्ये छोटे झरे आणि प्रवाहांचे प्रभावी जाळे होते, अशा नोंदी आहेत. हे जलस्रोत एकत्र केल्यानंतर त्यांची लांबी ६७.३८ किलोमीटरपर्यंत होई. पण, पुढील चोवीस वर्षांमध्ये दरवर्षी दोन या प्रमाणे ८४ जलस्रोत नष्ट झाले. त्यांची लांबी ५३ किलोमीटरपर्यंत कमी झाली. १९९१ ते २०२० या २९ वर्षांमध्ये जलस्त्रोतांची एकूण संख्या २८४ वरून २०० पर्यंत खाली आली. नष्ट केलेले जलप्रवाह जागे झाले, तर काय होते याचा प्रत्यय गेल्यावर्षी आला. 

...म्हणून ‘ती’ रात्र काळरात्र झाली! 
आं बिल ओढा शहरातील अन्य ओढ्यांप्रमाणेच एक. परंतु या ओढ्याला गेल्या वर्षी महापूर आला. त्या पुराने ओढ्यालगतच्या दोन्ही बाजूस असलेल्या आठ ते दहा किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या सोसायटीधारकांची दाणादाण उडविली. नागरिक त्या घटनेच्या कटू आठवणी आणि थरकाप वर्षभर विसरु शकलेले नाहीत. एवढेच नव्हे, तर आजही शहरात मुसळधार पावसाला सुरवात झाल्यावर या ओढ्याकाठच्या नागरिकांना जीव मुठीत धरून बसावे लागते, कारण हा ओढा फक्त कागदावर आहे. प्रत्यक्षात, मात्र जागोजागी झालेली अतिक्रमणे, टाकण्यात आलेला राडारोडा, ओढ्याच्या मध्यावर उभारण्यात आलेले होर्डिंग अशा अनेक कारणांमुळे त्याला नाल्याचे स्वरूप आले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कमी झालेली वहनक्षमता 
ओढ्याची वहनक्षमता कमी होत गेली आहे. पूर्वी महापालिकेच्या हद्दीबाहेर (म्हणजे आताचा काही भाग महापालिकेच्या तर काही भाग पीएमआरडीएच्या हद्दीत) असलेल्या मांगडेवाडी, गुजर- निंबाळकरवाडी आणि भिलारेवाडीबरोबरच कात्रज घाटाच्या पायथ्यापर्यंत बेसुमार बांधकामे झाली. 

संरक्षक भिंतींचे काम अद्याप अपूर्ण 
गेल्या वर्षी ओढ्याला आलेल्या महापुरात सोसायट्यांच्या भिंती फोडून पहिल्या मजल्यापर्यंत पाणी शिरले. त्याच्या खुणा आज वर्षानंतरही या सोसायट्यांना भेट दिल्यानंतर दिसून आल्या. लेक टाऊन सोसायटीची भिंत बांधली असली, तरी त्याच्या दुसऱ्या बाजूची भिंत बांधण्यासाठी अद्यापही प्रशासनाला मुहूर्त मिळाला नाही. तीच अवस्था ट्रेझर पार्क सोसायटीच्या परिसरात आहे. सर्वांत मोठा फटका बसलेल्या गुरुराज सोसायटीतील भिंतीची अवस्थाही वेगळी नाही. 

ढिम्म प्रशासन 
गेल्या वर्षीच्या घटनेनंतरही पीएमआरडीए आणि महापालिका प्रशासन जागे झालेले नाही. आजही या ओढ्यावरील अतिक्रमणे तशीच आहेत. एवढेच नव्हे, तर ओढ्यात वाहून आलेला राडारोडा, गाळदेखील काढण्यात आलेला नसल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. त्यामुळे २५ सप्टेंबरच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची वाट प्रशासन पाहत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वी वगळण्यात आलेली अकरा गावे महापालिकेच्या हदीत पुन्हा समाविष्ट केली. त्यामध्ये मांगडेवाडी, गुजर निबांळकरवाडी, भिलारेवाडी या गावांतील काही भागाचा समावेश आहे, तर उर्वरित भाग पीएमआरडीएच्या हद्दीत समाविष्ट झाला. मात्र, ओढ्याच्या परिस्थितीकडे कुणाचेही लक्ष नाही. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कायदा काय सांगतो? 
शहरांचा सुनियोजित विकास व्हावा, नैसर्गिक जलस्रोतांचे जतन व्हावे, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना विकास आराखडा तयार करण्याचे अधिकार महाराष्ट्र नगर नियोजन कायद्याने दिले आहेत. हद्दी लगतच्या भागासाठी प्रादेशिक आराखडा तयार करण्याचे अधिकार नगररचना विभागाला दिले आहेत. कायद्यातील या तरतुदीनुसार अांबिल ओढ्यासारख्या मोठ्या ओढ्यांच्या कडेने महापालिका आणि हद्दीलागतच्या भागात दोन्ही बाजूस ९ मीटर रुंदीचा ग्रीनबेल्ट ठेवणे बंधनकारक केले आहे. मात्र, ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत अांबिल ओढ्याच्या कडेने नऊ मीटर ग्रीनबेल्ट सोडाच, ओढ्यातच भर टाकून अनेक ठिकाणी बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे ओढ्याची मूळ वहनक्षमता जवळपास साठ टक्क्यांनी कमी झाली आहे. 

ओढ्याचा इतिहास काय सांगतो...
आंबिल ओढ्याच्या इतिहासात डोकावल्यास रंजक माहिती मिळते. ओढ्याचे पूर्वी दोन प्रवाह पुण्यातून वाहत असावेत, असा अंदाज इतिहासकार बांधतात. त्यापैकी एक प्रवाह पुण्याच्या दक्षिण अंगाने नागझरीला मिळत असे. दुसरा मुख्य प्रवाह जिलब्या मारुतीच्या व जोगेश्‍वरीच्या मंदिराजवळून वाहत शनिवारवाड्याच्या पश्‍चिमेने जात अमृतेश्वराच्या मंदिराजवळ मुठेला मिळत असे. आंबिल ओढा व नागझरीव्यतिरिक्त पुण्याच्या पश्‍चिमेकडून माणिक नालादेखील दक्षिणोत्तर वाहत असे. हे सर्व ओढे पावसाचे पाणी मुठा नदीपर्यंत वाहून नेण्याचे काम करत असत.

अतिवृष्टीमुळे आंबिल ओढ्याला अनेकदा पूर आल्याच्या नोंदी आहेत. १७५२ मध्ये नानासाहेब पेशव्यांच्या काळात आंबिल ओढ्याला पूर आला व ४० ते ५० माणसे पुरात वाहून गेली. यावर नानासाहेबांनी त्वरित तोडगा काढण्याचे ठरवले. त्यानुसार १७५३ ते ५५ च्या काळात आंबिल ओढ्याचा मूळ प्रवाह पर्वतीजवळ वळवण्यात आला व भल्यामोठ्या तळ्याची निर्मिती केली गेली. सुमारे २५ एकर क्षेत्रफळ असलेले हे पर्वती पायथ्याजवळील तळे म्हणजे आजची सारसबागेची जागा. या पर्वती तळ्यामुळे आंबिल ओढा पुण्यातून वाहण्याचा थांबला व पेठांचा विकास झाला. सध्या आंबिल ओढा पर्वतीजवळ वळून नीलायम टॉकीजच्या कडेने वाहत वैकुंठ स्मशानभूमीजवळ मुठेला मिळतो.

१८४२ मध्ये एका इंग्रज अधिकाऱ्याच्या नोंदीनुसार त्या वेळी कात्रज तलावातून सुमारे ३ लाख ३५ हजार घनफूट गाळ काढला होता.

१९५२ च्या विकास योजनेत तर चक्क नागझरी, आंबिल ओढ्यावर फरशा बसवून त्यांचा प्रवाह दिसणार नाही अशी शिफारस केली गेली. १९६८ मध्ये पर्वती तळे बुजविले गेले व तेथे आजची सारसबाग अस्तित्वात आली.

उगमाच्या मुखाशी...
आंबिल ओढ्याचा उगम सिंहगड-भुलेश्वरच्या डोंगर रांगांमधील कात्रजच्या बोगद्याजवळ आहे. समुद्र सपाटीपासून ११०० मीटर उंचीवर निर्माण होणारे जलस्रोत हे ओढ्याचे मूळ. हा सगळा भाग म्हणजे आंबिल ओढ्याचे पाणलोट क्षेत्र. टेमघर धरणाचे पाणलोट क्षेत्र (कॅचमेंट एरिया) सुमारे ४० चौरस किलोमीटर आहे. तर, आंबिल ओढ्याचे हे क्षेत्र ३० चौरस किलोमीटरचे आहे. एका ओढ्याच्या पाणलोट क्षेत्रात कमी वेळेत प्रचंड पाऊस झाल्यास काय प्रलय येऊ शकतो, हे गेल्या वर्षी २५ सप्टेंबरला साऱ्या पुण्याला कळले. एखाद्या छोट्या धरणाइतके मोठे पाणलोट क्षेत्र या ओढ्याचे आहे. त्यामुळे आंबिल ओढ्यातून वाहणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन किती गांभीर्याने घेतले पाहिजे, हे यावरून कळते.

आजही स्थिती तशीच
ओढ्याच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस पडल्यास आजही पुन्हा तीच काळरात्र पुणेकरांवर ओढावेल, यात शंका नाही. कारण, वर्षभरात ओढ्याच्या स्थितीत कुठेच, कोणताच बदल झालेला नाही. उगमापासून नदीला मिळेपर्यंतच्या सोळापैकी जेमतेम पाच किलोमीटरचा भाग पावसाचे पडलेले पाणी वाहून जाण्यासाठी आदर्श असा आहे. तोही कात्रजच्या दुसऱ्या तलावाच्या जवळच्या भागात. ओढा शहर हद्दीच्या जवळ येऊ लागतो तसतसा त्याची पाणी वाहून जाण्याची क्षमता कमी होते. मांगडेवाडी ही आता शहराची नवीन हद्द झाली आहे. त्या भागातील कात्रज घाटाच्या रस्त्याला लागून वाहणाऱ्या ओढ्यात बेसुमार अतिक्रमणे, प्रवाहात भिंती उभ्या केल्या आहेत. 

अशी वाढली बांधकामे 
पुणे महापालिकेच्या हद्दीत ३४ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय युती सरकारच्या काळात घेण्यात आला. वाद, कोर्टकचेऱ्या झाल्यानंतर काही गावे पूर्ण, तर काही गावे अंशत: वगळण्याच्या निर्णय घेऊन १९९७ मध्ये २३ गावे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आली. परंतु त्या आधीच गावे हद्दीत जाणार या एका गोष्टीने हद्दीलगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामांचे पेव फुटले. तेथूनच या ओढ्यावरील अतिक्रमण करण्याच्या, नैसर्गिक जलस्रोत बुजविण्याच्या आणि डोंगरफोडीच्या कामाला वेग आला. 

तलाव ओसंडून वाहिल्यानंतर...
आंबिल ओढ्यावर तीन तलाव आहेत. ओढ्याच्या पाणलोट क्षेत्रातील भिलारेवाडी हा पहिला तलाव. भिलारेवाडी, मांगडेवाडीतून येणारा आणि गुजर-निंबाळकरवाडीतून येणारा असे ओढ्याचे दोन स्रोत कात्रजचा नवीन तलावात एकत्र येतात. हे तीनही तलाव पावसाच्या पाण्याने २५ सप्टेंबरला रात्री ओसंडून वाहू लागले. ओढ्याचं पाणी साठवण्याची सर्व व्यवस्था कोलमडली. अशा वेळी ओढ्याच्या उगमापासून ते नदीला मिळेपर्यंतच्या सोळा किलोमीटरमध्ये जलप्रलय नाही तर आणखी काय होणार? अतिक्रमणे, बदललेले ओढ्याचे प्रवाह, राडारोडा यातून भीषण काळरात्र पुण्याने अनुभवली. 

ना सीमाभिंती, ना भरपाई
 अांबिल ओढा भागांत पूरस्थिती आल्यानंतर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तात्पुरती डागडुजी केली. 
 पुरग्रस्तांचे पुनर्वसन अजूनही झालेले नाही. या लोकांना कुठे घरे द्यायची यावरून वाद सुरूच आहे. 
 महापालिकेच्या ताब्यात त्याच भागात घरे नसल्याने पुनर्वसन करण्यात अडचणी. 
 महापालिका आणि ‘एसआरए’चा वाद असल्याने ही प्रक्रिया ठप्प. 
 ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे, अशा रहिवाशांना १५ हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली. 
 मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही.
 ही मदत कोणी करायची यावरून राज्य सरकार व महापालिकेत मतभेद. 
 पडलेल्या सीमाभिंती महापालिकेने बांधून द्याव्यात असा सोसायट्यांमधील रहिवाशांचा आग्रह. 
 सीमाभिंतीसाठी निधी पुरविणे शक्‍य नसल्याची महापालिकेची भूमिका. 
 राज्य सरकारकडे आर्थिक मदतीची अपेक्षा केली. मात्र आजतागायत सीमाभिंती बांधलेल्या नाहीत.

प्रशासनाने काय धडा घेतला?
बरोबर ३६५ दिवसांपूर्वी घडलेल्या या भयंकर घटनेतून लोकप्रतिनिधी, प्रशासनाने काही धडा घेतला का, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न ‘सकाळ’ने या पाहणीतून केला. हा ओढा शहराच्या हद्दीतून १३ किलोमीटर वाहतो. ओढ्याचा श्‍वास आजही कोंडलेलाच आहे. त्यामुळे भविष्यात असा जलप्रलय शहरावर पुन्हा ओढवणार नाही, याची खात्री नाही. प्रशासनाने कोणताच धडा यातून घेतलेला नाही. 

‘पीएमआरडीए’ने काय करायला हवे?
 हद्दीच्या विकास आराखड्याला तातडीने मंजुरी देणे. 
 आराखड्यात ओढ्याच्या कडेने ९ मीटर ग्रीनबेल्ट दर्शविणे. 
 महापालिकेच्या मदतीने हद्दीतील ओढ्यावरील अतिक्रमणांवर कठोर कारवाई करणे. 
 ओढ्यातील राडारोडा तातडीने काढणे. 
 कात्रज परिसरातील टेकडीफोड तातडीने थांबविणे. 
 टेकड्यांवरील बांधकामांवर कारवाई करणे.  

पुणे महापालिकेने काय करायला हवे?
 पीएमआरडीएच्या समन्वयाने कृती आराखडा तयार करणे. 
 नाल्याच्या हद्दीतील राडारोडा उचलणे. 
 वळविण्यात आलेला मार्ग सुरळीत करणे. 
 अतिक्रमणांवर कठोर कारवाई करणे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com