पुण्यात रेमडेसिव्हिर मिळेना; "सकाळ'च्या तपासणीत वस्तुस्थिती उघड 

योगिराज प्रभुणे - सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 23 September 2020

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या वितरकांच्या यादीतील प्रत्येक वितरकाशी "सकाळ'ने प्रत्यक्ष संपर्क साधून रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन मिळेल का?, याची चौकशी केली. बारापैकी सहा वितरकांनी "इंजेक्‍शन उपलब्ध नाही', असे स्पष्टपणे सांगितले.

पुणे - शहरात रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा प्रचंड तुटवडा आहे. वणवण करूनही ते मिळत नाही. त्याचा काळाबाजार सुरू आहे. अशी वस्तुस्थिती असताना मात्र, बाजारात या इंजेक्‍शनचा पुरेसा साठा असल्याचा अजब दावा मंगळवारी खुद्द जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केला आहे. 

कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन डॉक्‍टर आता रुग्णाच्या नातेवाइकांना लिहून देत आहेत. हे इंजेक्‍शन मिळविण्यासाठी नातेवाईक अक्षरशः दिवस-रात्र न पाहता धावपळ करत आहेत. त्यानंतरही त्यांना इंजेक्‍शनची एकही वायल मिळत नाही. काही ठिकाणांहून ती एमआरपीपेक्षा जास्त दराने विकून त्याचा काळाबाजार होत आहे. ही वस्तुस्थिती असताना जिल्हाधिकाऱ्यांनी या इंजेक्‍शनचा पुरेसा साठा असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. इतकेच नव्हे तर या इंजेक्‍शनच्या बारा वितरकांचे नाव, दूरध्वनी व मोबाईल नंबरसह यादी प्रसिद्ध केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यादीची गौडबंगाल काय? 
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या वितरकांच्या यादीतील प्रत्येक वितरकाशी "सकाळ'ने प्रत्यक्ष संपर्क साधून रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन मिळेल का?, याची चौकशी केली. बारापैकी सहा वितरकांनी "इंजेक्‍शन उपलब्ध नाही', असे स्पष्टपणे सांगितले. "आम्ही हे इंजेक्‍शन आतापर्यंत कधीच खरेदी केले नाही', अशी माहिती दोन वितरकांनी दिली. तर, उर्वरित चारपैकी तिघांनी फोन उचलला नाही आणि एका वितरकाचा फोन बंद होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे इंजेक्‍शनच्या उपलब्धतेसाठी प्रसिद्ध केलेल्या यादीचे गौडबंगाल काय, कोणत्या आधारावर ही यादी प्रसिद्ध केली, असा सवाल या वितरकांनी केला. अन्न व औषध विभागाने एप्रिलमध्ये तयार केलेली ही यादी आहे, ती अद्ययावत न करताच "एफडीए'ने जिल्हा प्रशासनाला दिली असल्याचा दावाही यापैकी काहींनी केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

""रेमडेसिव्हिरचा सोमवारी आठ हजार वायलचा पुरवठा झाला. मंगळवारी चार हजार 500 आला आहे. हा वितरित केला जातो. त्यामुळे हा साठा रुग्णालयांमध्ये आहे,'' अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्‍त सुरेश पाटील यांनी दिली. 

येथे संपर्क साधा 
या औषधांच्या गैरप्रकाराबाबत काही माहिती असल्यास अन्न व औषध प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक 1800222365 वर द्यावी, असे आवाहन सुरेश पाटील यांनी केले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

"सकाळ'ने केली तपासणी 

वितरक  मिळालेला प्रतिसाद  नाव  दूरध्वनी आणि मोबाईल क्रमांक
कुंदन डिस्ट्रिब्युटर  उपलब्ध नाही राहुल दर्डा ... 020-67642525, 9923940000 
रोहित एंटरप्रायझेस उपलब्ध नाही रोहित करपे 020-24481222, 9822192558
पूना हॉस्पिटल मेडिकल स्टोअर उपलब्ध नाही रेशन जैन 020-24338768, 9822061118
अरिहंत केमिस्ट फोन उपलब्ध नाही राजेश जैन 020-24454320, 9595440000 
साईराज डिस्ट्रिब्युटर्स . उपलब्ध नाही दीपक कासार 7709114172, 8208004190 
जीवन मेडिसेल्स उपलब्ध नाही जगदीश मुंदडा 020-24465561, 020-24491994, 9822036732
प्रकाश मेडिकल सेंटर खरेदीही नाही गिरीश लुणावत 020-26122264, 9890680696 
मॉडर्न डिस्ट्रिब्युटर खरेदी केली नाही प्रदीप कावेडिया 020-24450057, 020-24450539, 9822010035 
तापडीने डिस्ट्रिब्युटर फोन बंद तापडिया 9822490756 
श्री फार्मा  फोन लागत नाही प्रतीक 9139963601 
कुंदन एजन्सी, चिंचवड फोन उचलला नाही अजय दर्डा 020-27470078, 9890023634 
एमएम फार्मा, चिंचवड फोन लागला नाही विनय गुप्ता 020-27473746, 9823116736 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal exclusive news shortage of remdesivir injection in the city