

पुणे, ता. १९ : सकाळ माध्यम समूहाच्या वतीने पहिला ‘सकाळ लिट फेस्ट’ १२ ते १५ नोव्हेंबर या काळात भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या परिसरात होणार आहे. साहित्यातून परिवर्तनाकडे - या ध्येयविचारातून साकारलेला ‘सकाळ लिट फेस्ट’ म्हणजे साहित्य, विचार आणि कलांच्या माध्यमातून नव्या कल्पनांना चालना देत समाजाच्या वैचारिक आणि सांस्कृतिक प्रगतीला दिशा देणारा एक सर्जनशील उत्सव.
या महोत्सवात चार दिवसांत चार व्यासपीठांवर ११० हून अधिक सत्रे होतील. ही सत्रे मराठी, इंग्रजी आणि हिंदी तीनही भाषांमध्ये असतील. देश-विदेशातील शंभरहून अधिक लेखक, विचारवंत आणि कलावंत यात सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांचे व्याख्यान हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असेल. लेखक अमीश त्रिपाठी, लेखिका मीना कंदसामी, लेखिका मेघना पेठे, अभिनेते-कवी किशोर कदम आणि लेखक अक्षत गुप्ता हेदेखील महोत्सवात सहभागी होणार आहेत. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारविजेत्या कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
पहिल्याच दिवशी, १२ नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता अभिनेते-दिग्दर्शक मकरंद देशपांडे आणि विचारवंत संदीप वासलेकर यांच्याशी साहित्यिक अरुण शेवते ‘माणूस’ या विषयावर संवाद साधतील. शाह अब्दुल लतीफ, सचल सरमस्त आणि सामी या सिंधी संतकवींची ओळख करून देणारा कार्यक्रम साज अगरवाल आणि गिरीश सधवानी सादर करतील.
मुलांसाठी स्वतंत्र साहित्य महोत्सव होणार आहे. ‘सकाळ एनआयई’च्या माध्यमातून शाळांमध्ये स्पर्धा घेतल्या जात आहेत. त्यांच्या अंतिम फेरीतील विद्यार्थी महोत्सवात सहभागी होतील आणि विजेते तिथेच जाहीर होतील. वास्तुकला आणि डिझाइन महाविद्यालयांचे विद्यार्थी पर्यावरणपूरक साहित्यापासून विचारप्रवर्तक कलाकृती उभारणार आहेत. पुस्तकदालन, खाद्यदालन आणि गप्पांचे कट्टे हीदेखील महोत्सवाची आकर्षणे असतील.
‘साहित्य ही केवळ वाचण्याची गोष्ट नाही, तर समाजाला प्रश्न विचारण्याची ताकद आहे. मतभेदांसह या, संवादासाठी या,’ असे आवाहन महोत्सवाच्या आयोजकांनी केले आहे.
विविध विषयांची पर्वणी
या साहित्य महोत्सवात लोकशाही, समाजसुधारणा, अनुवाद, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रकाशनविश्व, पुस्तकांवरून बनलेले चित्रपट आणि मालिका, पर्यावरण, गुन्हेकथा, इतिहास, खाद्यसंस्कृती, बालसाहित्य, विनोद अशा अनेक विषयांवर चर्चासत्रे होतील. केवळ भाषणे ऐकणारा नव्हे, तर प्रश्न विचारणारा आणि संवाद साधणारा श्रोता हा या महोत्सवाचा केंद्रबिंदू आहे.
कसे सहभागी व्हाल?
‘सकाळ लिट फेस्ट’मध्ये उपस्थित राहण्यासाठी पास (प्रवेशिका) आवश्यक आहे. एका दिवसाचा किंवा चारही दिवसांचा महोत्सव पास, विद्यार्थ्यांसाठी सवलतीचा पास उपलब्ध आहे. सायंकाळच्या विशेष कार्यक्रमांसाठी स्वतंत्र तिकिटे विकत घ्यावी लागतील. तिकिटांसाठी आणि संपूर्ण कार्यक्रमपत्रिकेसाठी sakallitfest.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.