पुणे - कोणी शिक्षणात, तर कोणी आरोग्य, बांधकाम क्षेत्रात...अशा विविध क्षेत्रांत कष्ट करून स्वत:चा ‘महाब्रँड’ निर्माण करणारे रथी-महारथी एकीकडे, तर त्यांच्या स्वप्नांना आणखी बळ देण्यासाठी उपस्थितीत राहिलेले राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार दुसरीकडे. अशा उद्योगस्नेही वातावरणात ‘सकाळ’चा ‘महाब्रँड’ सोहळा शुक्रवारी (ता. १८) पुण्यात रंगला.
उद्योग, व्यवसायातून महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देत असलेल्या उद्यमशील अशा ३८ नामवंतांचा अजित पवार यांच्या हस्ते ‘ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र’ हा किताब देऊन या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. या वेळी प्रत्येक उद्योजकाच्या ‘ब्रँड’ होण्याच्या वाटचाली उलगडत गेल्या.
या उद्योजकांना विस्तारण्यासाठी राज्य सरकारकडून काय पावले उचलली जात आहे, याबाबत पवार यांनी आश्वासक माहिती दिली. गौरवाच्या वेळी प्रत्येक उद्योजकाची पवार यांनी आस्थेने विचारपूस करत शाब्बासकीची थाप दिली. यातून उद्योजकांना आणखी भरारी घेण्याची ऊर्जा मिळाली. त्यामुळे भारावलेल्या उद्योजक, व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते.
स्पष्टवक्तेपणा आणि वेळ पाळणारा नेता म्हणून अजित पवार यांची ख्याती आहे. आजही या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थितांना त्याची अनुभूती मिळाली. राज्यातील उद्योगाला अनुकूल वातावरणासाठी राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजना, त्या दृष्टीने अर्थसंकल्पात उचलण्यात आलेली पावले, कारभारात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर याची सविस्तर माहिती अजित पवार यांनी गौरव सोहळ्यानंतर झालेल्या मुलाखतीमध्ये दिली.
प्रास्ताविकात ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस यांनी या सोहळ्यामागची पार्श्वभूमी सांगितली. मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सोहळ्याच्या सांगतेनंतर पवार आणि उद्योजकांमध्ये संवाद रंगला होता.
हृदयातील आनंद चेहऱ्यावर झळकला
यशाला गवसणी घालणाऱ्या उद्योजकांचा दिग्गजांच्या हस्ते शुक्रवारी ‘महाब्रँड्स’ने सन्मान करण्यात आला. या आनंदाच्या उत्कट क्षणी त्यांना खंबीरपणे साथ देणारे कुटुंब व त्या सर्वांचे लाडके ‘दादा’ म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः या सोहळ्याचे साक्षीदार ठरले.
दादांनी त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली. इतकेच नव्हे, तर आत्मविश्वासाने भारलेल्या शब्दांनी त्यांच्या पंखांमध्ये बळ भरले. या सोहळ्याने भारावलेल्या उद्योजक, व्यावसायिकांच्या हृदयातील आनंद अक्षरशः चेहऱ्यावर झळकत होता.
गुलामगिरीची मानसिकता सोडा : सिद्धार्थ मयूर
पुणे - ‘आपल्याकडे प्रतिभा खूप आहे. परंतु आपलाच आपल्यावर विश्वास नाही. अजूनही आपल्यातील गुलामगिरीची मानसिकता गेलेली नाही,’ असे सांगत ध्येय ठेवून काम करा. केवळ पेटंटसाठी नाही, तर तळागाळातील जनतेपर्यंत ते काम न्या,’ असा मंत्र उद्योजक सिद्धार्थ मयूर यांनी शुक्रवारी दिला.
‘सकाळ’च्या वतीने आयोजित ‘महाब्रँड’ या कार्यक्रमात ते बोलत होते. मयूर हे एच-२ ई पॉवर सिस्टीम या कंपनीचे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. २००९ मध्ये त्यांनी या कंपनीची स्थापना केली. ही क्लिनटेक कंपनी असून, ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रोलायझर्स आणि फ्युएल सेल तंत्रज्ञानावर काम करते.
कंपनी भारत, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि अमेरिकेत कार्यरत आहे. शेती, तेल आणि वायू, स्टील आणि सिमेंट उद्योगांसाठी उपाय विकसित करते. स्टार्टअप असलेल्या या कंपनीने गेल्या पंधरा वर्षांत उद्योग क्षेत्रात घेतलेल्या भरारीची यशोगाथा मयूर यांनी आपल्या भाषणातून मांडली.
ग्रीन हायड्रोजन या क्षेत्रात मी २००२ मध्ये कामाला सुरुवात केली. तेव्हा आपल्या देशात याबाबत फारशी कल्पना नव्हती, असे सांगून मयूर म्हणाले, ‘या क्षेत्रात जगात जी उत्तम प्रकारे टेक्नॉलॉजी आहे, ती आम्ही पुण्यात विकसित केली.
त्यामुळे यापुढील काळात पुणे हे हायड्रोजन सिटी म्हणून देशात नावारूपाला येईल. आज आपला देश २० हजार कोटी रुपयांची ऊर्जा आयात करतो. ते कमी करण्यासाठी आणि स्वदेशी ऊर्जेचे ध्येय ठेवून आम्ही कंपनी स्थापन केली.’
२०४७ पर्यंत एक कोटी उद्योजक
मयूर म्हणाले, ‘आता आम्ही तेल आणि ऊर्जा या क्षेत्रात काम करीत आहोत. साखर कारखान्यांमध्ये निर्माण होणाऱ्या वेस्टमधून ऊर्जा आणि तेलनिर्मिती करणारी टेक्नॉलॉजी शोधत आहोत. ज्यातून आयात कमी होईल. शेतीचे उत्पन्नही वाढेल.
आम्ही जी टेक्नॉलॉजी तयार करीत आहोत, त्यासाठी कुशल कामगारांची गरज आहे. आम्ही गाम्रीण भागातील तरुणांना प्रशिक्षण देत आहोत. जेणेकरून २०३० पर्यंत १ लाख, तर २०४७ पर्यंत एक कोटी उद्योजक आणि रोजगार निर्माण होतील. ते ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबीदेखील होतील, असे आमचे उद्दिष्ट आहे.
आम्ही केवळ पेटंटवर न थांबता ते तंत्रज्ञान सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचवता येईल आणि त्यांना स्वावलंबी कसे करता येईल, यावर भर देत आहोत.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.