‘सकाळ सोबत बोलूया’ हेल्पलाईन उद्यापासून सुरू

Sakal-Sobat-Boluya
Sakal-Sobat-Boluya

पुणे - सकाळ माध्यम समूहातील सकाळ सोशल फाउंडेशनच्यावतीने ‘We are in this together‘ या उपक्रमांतर्गत व पुनीत बालन ग्रुप यांच्या सौजन्याने आणि कर्वे समाज सेवा संस्थेच्या सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डीसअँबीलीटीजच्या सहकार्याने सर्व वयोगटातील नागरिकांसाठी ‘मानसिक ताण - तणाव व्यवस्थापन व एकूणच मानसिक स्वास्थ्य, मानसिक आरोग्याच्या समस्यांवर सल्ला व मार्गदर्शनासाठी  ‘सकाळ सोबत बोलूया‘  ही हेल्पलाइन ३ ऑगस्टपासून सुरू करण्यात येत आहे. 

मानसिक आरोग्या संबंधी काम करणाऱ्या हेल्पलाईनला फोन करून मिळालेल्या अमूल्य मार्गदर्शनामुळे एखाद्याचे जीवन कसे बदलले ? त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हेल्पलाइनमुळे कसा सकारात्मक झाला व हेल्पलाइन त्याच्या आयुष्यासाठी कशी नवसंजीवनी ठरली, याविषयी काही सत्यघटनेवर आधारित काही समुपदेशकांचे अनुभव प्रसिद्ध करत आहोत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रसंग १ - आयुष्याला मिळालं वेगळं वळण
‘अ’हा एका सुखवस्तू कुटुंबातील मुलगा. तो तसा अभ्यासात हुशार पण दहावीमध्ये गेल्यापासून अभ्यासातील त्याचे लक्षच उडलेलं. आई, बाबा नोकरीला आणि दुपारी घरी फक्त आज्जी मग तर त्याला मोकळं रानच मिळालं. याचा परिणाम म्हणजे दहावीत त्याला फक्त ४९ टक्के मिळाले. गुणपत्रिका बघून भविष्यातील अंधार त्याला जाणवला. शाळेतून घरी येतानाच त्याच्या मनात वाईट विचार येत होते आणि घरी रिझल्ट कळल्यावर सगळ्यांचा झालेला अपेक्षाभंग त्याने पाहिला. आई- वडिलांना आपण फसवत राहिलो, ही बोच त्याला लागली आणि मग त्याच्या मनात तो विचार पक्का झाला, की आपल्या जगण्यात आता काही अर्थ नाही. बाथरूममधली बाबांची दाढीची ब्लेड घ्यायची आणि ...

मात्र, त्याचं खाण्या- पिण्यावर नसलेलं लक्ष, न झोपणं, सतत अस्वस्थ असणं हे घरच्यांनी टिपलं होतं. मग त्यांनी समुपदेशनासाठी हेल्पलाइनला फोन लावला आणि ‘अ’ ला हेल्पलाईनच्या समुपदेशक मॅडमशी बोलायला लावलं. त्याने इच्छेविरुद्ध तो फोन कानाला लावला खरा पण या एका गोष्टीमुळे त्याचं आयुष्य बदललं. तो खूप- खूप बोलला, व्यक्त झाला. समुपदेशक मॅडमनी सगळं ऐकून घेतलं आणि त्याला काही गोष्टी समजावून सांगितल्या. त्याच्या आई - बाबांशी सुद्धा बोलल्या. सर्वांनी नीट विचार करून त्याच्या आवडीचे कोर्सेस निवडले. सरधोपट पदवीच्या मार्गाने न जाता त्याने त्याचा वेगळा मार्ग निवडला. आज त्याचा स्वतःचा छोटा व्यवसाय आहे. त्याला मागे वळून पाहताना वाटतं की, ती हेल्पलाइन नसती तर तो फोन त्याने घेतला नसता तर, समुपदेशक मॅडमशी बोललाच नसता तर... या ‘तरचं’ उत्तर फार भयंकर असतं...
- अमृता बोकील,  क्‍लिनिकल सायकॉलॉजिस्ट 

प्रसंग २ - सकारात्मक दृष्टिकोन 
कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका मुलीच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे घरी ती आणि तिची आई दोघेच राहत असे. वडिलांच्या पेन्शनवर घराचा उदरनिर्वाह चालत असे. आर्थिक परिस्थिती बेताची होती. पण त्या मुलीला कुठेतरी असुरक्षितता वाटत होती. तिला सारखे वाटे की, आपल्या शेजारी - पाजारी यांनी आपल्याला व आईला मान द्यावा पण तसे होत नव्हते. तसेच कॉलेजमध्ये आपल्याला खूप मित्र-मैत्रिणी असावेत, आपल्या जिवाभावाचे कोणीतरी आपल्या सोबत कायम असावे, असे तिला वाटत होते. पण कॉलेजमध्येही मित्र-मैत्रिणी तिची टिंगल करत असत. त्यामुळे तिचे अभ्यासातही लक्ष लागत नसे. या मुलीला एका हेल्पलाइनबाबत कुठून तरी माहिती मिळाली आणि तिने हेल्पलाईनला फोन केला. सुरवातीला त्या मुलीला काही सेकंद बोलताच आले नाही. हेल्पलाइनवरील समुपदेशक मॅडम यांनी त्या मुलीला बोलतं केलं. तेव्हा तिने आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल , एकटेपणाबद्दल व सतत वाटणाऱ्या असुरक्षिततेबद्दल सांगितले. या परिस्थितीतून जात असताना तिने दोन वेळा जीवन संपविण्याचा विचार केला होता, हे ही सांगितलं. त्या मुलीचे सर्व काही ऐकून घेतल्यानंतर हेल्पलाइनवरील समुपदेशक मॅडम यांनी तिला तिच्यामध्ये असणाऱ्या गुणांची व कौशल्याची आठवण करून दिली. तिला तिचा वेळ गुंतून राहण्यासाठी तिला काही असाईनमेंट पूर्ण करण्यास दिल्या. सलग चार- पाच वेळेस तिच्याशी फोनवर बोलल्यानंतर तिचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला आणि तिचा नकारात्मक दृष्टिकोन हा सकारात्मक झाला.
- मेधा पुजारी, समुपदेशक 

असे अनेक अनुभव आहेत की, हेल्पलाइनमुळे बऱ्याच लोकांच्या आयुष्याला नवसंजीवनी मिळालेली आहे. 
‘सकाळ सोबत बोलूया’ या हेल्पलाइनसाठी पुण्यातील टेक्‍नो कन्सल्टिंगचे मंदार जोशी यांचे तांत्रिक सहकार्य लाभले आहे. 

मानसिक आरोग्य व स्वास्थ्य जपणे ही आज काळाची गरज आहे. बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये अनेक विचार आपल्याला अस्वस्थ करत असतात. या विचारांना मोकळीक देण्यासाठी ते कोणाकडे मांडावे, हा एक अवघड प्रश्न निर्माण होतो. कसं बोलावं, कोणाकडे बोलावं कळत नाही. अशा वेळी मनमोकळेपणाने बोलण्यासाठी व आपली व्यथा मांडण्यासाठी आणि त्यावर योग्य लोकांकडून सल्ला मिळवण्यासाठी या हेल्पलाइनच्या माध्यमातून एक सुंदर संधी आहे .
- डॉ. योगेश पोकळे, मनोविकार तज्ज्ञ

सध्या कोरोनाच्या काळात विचारांचा, भावनांचा फार कोंडमारा होतो आहे. त्यातून असुरक्षितता निर्माण होत आहे. मनातलं कोणाशीतरी शेअर करायला हवं, जमेल तेवढं-तसं मन मोकळं करायला हवं, पण असं सगळं आपण नेमकं कोणाशी बोलणार? मित्र-मैत्रिणी, नातेवाईक मदत करू शकतात का? माझं मन मोकळं करण्याच्या गरजेचा कुठे दुरुपयोग तर होणार नाही ना? या शंकेने अनेक लोक आपले मन मोकळं करत नाहीत. हीच काळाची व समाजाची गरज लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू होत आहे. त्याचा गरजूंनी जरूर लाभ घ्यावा. 
- मेधा कुमठेकर, समुपदेशक

We are in this together या मोहिमेच्या खालील इन्स्टाग्राम व फेसबुक पेजला भेट देऊ शकता.

आपण ही हेल्पलाइनवर फोन करून बोलू शकता. चला तर मग 
‘सकाळ सोबत बोलूया’ ०२०- ७११७१६६९ या क्रमांकावर फोन करून आमच्याशी बोला. आपली व्यक्तिगत माहिती गोपनीय ठेवण्यात येईल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com