
भुकेल्यांना जेवण देणाऱ्या तरुणाला हवी साथ
पुणे‘ सकाळ माध्यम समूहा’तील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’तर्फे सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ या अभियानाच्या माध्यमातून दर आठवड्याला एका स्वयंसेवी संस्थेची माहिती प्रसिद्ध केली जाते. भुकेल्या जीवांच्या मुखात अन्नाचे दोन घास जावेत, भुकेने व अन्न-पाण्यावाचून कोणाचाही जीव जाऊ नये म्हणून कायम प्रयत्नशील असलेल्या आणि जयहिंद फूड बँक उपक्रमाच्या माध्यमातून गरजूंपर्यंत जेवण पोहोचविणाऱ्या तरुणाविषयी...
भूकबळींच्या बाबतीत आपल्या देशाची स्थिती गंभीर आहे. अन्नाचा अपव्यय हे भारतातल्या भूकबळीचं मुख्य कारण आहे. जगातील भूकपीडित नागरिकांपैकी पंचवीस टक्के लोक भारतात आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार भारतात अन्नधान्याचं पुरेसं उत्पादन होतं, मात्र हे गरजूंपर्यंत पोचतच नाही.
तसेच, भारतात चाळीस टक्के अन्न वाया जातं. यामध्ये लग्नसोहळे, हॉटेल, कौटुंबिक तसंच सामाजिक कार्यक्रम आणि घरीही प्रचंड प्रमाणावर अन्न टाकलं जातं. हे अन्न वाचवून गरजूंना दिलं तर अनेकांना पोटभर जेवण मिळेल या उद्देशाने सोलापूर जिल्ह्यातील सतीश तमशेट्टी या तरुणाने २०१३मध्ये अन्नपूर्णा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करून, जयहिंद फूड बँक उपक्रमाची सोलापूर शहर परिसरात सुरुवात केली.
संस्थेचे उपक्रम...
१. गरजू निराधार व बेघर लोकांना अन्नवाटप : संस्थेमार्फत लग्नसोहळे, हॉटेल, कौटुंबिक तसंच सामाजिक कार्यक्रमांमध्ये शिल्लक राहिलेले अन्न संकलित करून, अन्नाचे व्यवस्थित पॅकिंग करून रस्त्यांवरील निराधार, बेघर व वयोवृद्ध नागरिकांना मोफत वाटप केले जाते. आजपर्यंत संस्थेमार्फत जवळपास वीस लाख लोकांचे अन्न वाया जाऊ न देता त्याचे संकलन करून ते अन्न गरजूंपर्यंत पोहोचविले आहे. याचबरोबर पंचवीस निराधार लोकांना दररोज दोन वेळेचे जेवण तयार करून वाटप केले जाते. मागील तीन वर्षांपासून साठ हजारांहून अधिक जेवणाचे डब्बे गरजूंना वितरित केले आहेत.
२. गरजू रुग्णांच्या नातेवाइकांना मोफत जेवण : सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयात दररोज परराज्यातून, जिल्ह्यातून व मराठवाड्यातील शेकडो गरजू रुग्ण विविध आजारांवरील उपचारांकरिता येतात. अशा रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईकसुद्धा असतात. बरेचसे रुग्ण शहराबाहेरचे असल्याने त्यांच्या नातेवाइकांच्या जेवणाची मोठी गैरसोय होते. बहुतेकवेळा रुग्णाच्या उपचारांपेक्षा नातेवाइकांच्या जेवणाचा खर्च जास्त असतो. त्यामुळे नातेवाइकांना दररोज दोन वेळचे जेवण मिळावे म्हणून जयहिंद फूड बँक उपक्रमाच्या माध्यमातून संस्थेमार्फत दररोज १५० लोकांना मोफत जेवण वाटप केले जाते. गेल्या वर्षापासून या उपक्रमांतर्गत ५१ हजार लोकांना जेवण दिले.
३. अन्नधान्याचे किटवाटप : कोरोना व लॉकडाउन काळात संस्थेमार्फत असंघटित घटकातील पाच हजारांहून अधिक कुटुंबांना अन्नधान्याचे किट वितरित केले. तसेच अन्नधान्याचे संकलन करून एका कुटुंबाला किमान पंधरा दिवस उपयोगी पडेल असे व्यवस्थित किट करून गरजूंना वितरित केले जाते.
आयुष्याला मिळाली उभारी
सोलापूर शहरात पती, पत्नी व त्यांची तीन मुले (दोन मुले व एक मुलगी) असे पाच जणांचे कुटुंब राहत होते. कुटुंबाचा प्रमुख नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असे. पती आणि पत्नीस एकावेळी कोरोनाची लागण होऊन, दोघांचाही मृत्यू झाला. एकावेळी आई-वडिलांच्या मृत्यूचा आघात मुलांना सहन झाला नाही.
या धक्क्याने मोठा मुलगा व मुलगी यांनी घराबाहेर पडणे बंद केले. सततच्या विचाराने ते नैराश्यात गेले आणि काही दिवसांनी मनोरुग्णांसारखे वर्तन करू लागले. त्या बहीण-भावाला त्यांचा लहान भाऊ सांभाळत होता. बाहेर काम करून जे मिळेल, ते तो त्यांना खाऊ घालत होता. संस्थेला या बहीण-भावाची माहिती मिळाल्यानंतर संस्थेमार्फत त्यांना जेवण दिले जाऊ लागले. तसेच, त्यांच्यावर संस्थेच्या पुढाकाराने मोफत मानसिक उपचार सुरू केले. काही दिवसांनी ते पूर्णतः बरे झाले. आता ते तिघेही बहीण भाऊ आनंदाने जीवन जगत आहेत.
संस्थेला मदतीची गरज
अन्नपूर्णा फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था असून, पूर्णपणे समाजातील देणगीदारांवर अवलंबून आहे. संस्थेला अन्नधान्य संकलित करण्यासाठी वाहनांची गरज आहे. तसेच, रुग्णांचे नातेवाईक, निराधार व बेघर लोकांना दररोज दोन वेळेचे जेवण उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असून, संस्थेला समाजातून सामूहिक मदतीची गरज आहे.
... अशी करा मदत
‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर ‘अन्नपूर्णा फाउंडेशन’ संचालित जयहिंद फूड बँक उपक्रमाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाइटला भेट देऊन अन्नपूर्णा फाउंडेशन या संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या जयहिंद फूड बँक या उपक्रमाची माहिती घेऊन ‘डोनेट नाऊ’ या बटनवर क्लिक करून थेट वेबसाईटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल. किंवा खालील बँक खात्यात ऑनलाइन देणगी पाठवू शकता. ऑनलाइन देणगी बँक खात्यात ट्रान्स्फर केल्यानंतर ८६०५०१७३६६ या व्हॉट्सॲप क्रमांकावर ट्रान्सॅक्शन तपशील पाठवावेत.
नाव : सकाळ सोशल फाउंडेशन, बँक खाते क्र. : ४५९१०४००००२१२५२
बँकेचे नाव : आयडीबीआय बँक, लक्ष्मी रस्ता, पुणे. आयएफएससी कोड : IBKL००००४५९
तसेच, मदतीचे धनादेश ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ किंवा ‘सोशल फॉर अॅक्शन’ या नावाने काढून सकाळ कार्यालय, नरवीर तानाजीवाडी, पीएमपीएल बस डेपोजवळ, शिवाजीनगर पुणे-५ या पत्यावर पोस्ट किंवा कुरिअर करावेत.
अधिक माहितीसाठी संपर्क : ८६०५०१७३६६, support@socialforaction.com