स्वप्नातील घर साकारण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मे 2019

दोन दिवसीय ‘सकाळ-वास्तू’ या गृहप्रकल्प विषयक प्रदर्शनाला पिंपरी-चिंचवडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेकांनी सहकुटुंब भेट देत ‘स्वप्नातील घरा’बद्दल माहिती घेत सदनिकांची नोंदणी केली. तसेच काही कुटुंबांनी ‘साइट व्हिजिट’ देऊन नवीन घर घेण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले.

पिंपरी - दोन दिवसीय ‘सकाळ-वास्तू’ या गृहप्रकल्प विषयक प्रदर्शनाला पिंपरी-चिंचवडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेकांनी सहकुटुंब भेट देत ‘स्वप्नातील घरा’बद्दल माहिती घेत सदनिकांची नोंदणी केली. तसेच काही कुटुंबांनी ‘साइट व्हिजिट’ देऊन नवीन घर घेण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले.

अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून ओळखला जातो. या दिवशी गृहखरेदीही केली जाते. सकाळ माध्यम समूहातर्फे त्यानिमित्त ऑटो क्‍लस्टर येथे प्रदर्शन आयोजित केले होते. एकाच छताखाली या प्रदर्शनात ५० हून अधिक नामवंत बांधकाम व्यावसायिकांच्या १२५ पेक्षा जास्त गृहप्रकल्पांची माहिती ग्राहकांना उपलब्ध करून दिली होती. ‘सकाळ’च्या या उपक्रमाबद्दल अनेक नागरिकांनी पसंती व्यक्त केली.

कडक उन्हाळा असतानाही रविवारी सुटीचा दिवस साधत सकाळपासूनच नागरिकांनी भेट देण्यास सुरवात केली. रावेत, मोशी, डुडुळगाव, पुनावळेसह इतर भागांनाही नागरिकांची पसंती राहिली. प्रदर्शनातील निरनिराळ्या स्टॉल्सला भेट देऊन तेथील गृह प्रकल्पांची माहिती नागरिकांनी घेतली. घर आपल्या ‘बजेट’मध्ये आहे काय? याची चाचपणी केली जात होती.

व्यावसायिकांकडून कोणत्या ऑफर, किती ‘ॲमेनिटीज’ आहेत ? याचीही आवर्जून चौकशी केली जात होती. प्रत्येक बांधकाम व्यावसायिक आणि त्यांचे प्रतिनिधीही ग्राहकांना योग्य ती माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करत होते. अनेक कुटुंबांनी लगेचच ‘साइट व्हिजिट’ करून आवडते घर घेण्याच्या दृष्टीने पहिले पाऊलही टाकले. काही स्टॉल्समधून शहरालगतच्या एनए प्लॉट्‌स बद्दलही नागरिकांनी माहिती देण्यात येत होती. भविष्यातील गुंतवणूक म्हणूनही नागरिक या स्टॉल्सला भेट देत होते. 

नागरिक प्रतिक्रिया 
जयंत मांडवकर, यमुनानगर (आयटीयन्स) -
 रावेत येथे १/२ बीएचके घर पाहतोय. आमचे बजेट ६५ लाख रुपये आहे. काही साइट आम्ही निश्‍चित केल्या आहेत. शनिवार-रविवारच्या दिवशी त्या पाहून घर घेऊ. ‘सकाळ’ची वास्तू प्रदर्शनाची संकल्पना चांगली वाटली. खास घर पाहण्यासाठी मला वेळ होत नव्हता. परंतु, या प्रदर्शनामुळे ते आम्हाला शक्‍य झाले.

सोनल भगत, अजमेरा कॉलनी (नोकरदार महिला) - पिंपरी-चिंचवडकरांसाठी हे प्रदर्शन चांगले ठरले आहे. प्रदर्शनात व्यावसायिकांकडून चांगल्या ऑफर्सही दिल्याचे पाहायला मिळाले. गृहप्रकल्पांचे लोकेशन्सही चांगले वाटले. नामवंत व्यावसायिकांमुळे प्रदर्शनही दर्जेदार राहिले.

अभिजित कानडे, नवी सांगवी (व्यावसायिक) - वाकड, ताथवडे, हिंजवडी भागात टूबीएचके घेणार आहे. प्रदर्शनात त्यादृष्टीने काही पर्यायांची निवड केली आहे. पुढील आठवडाभरात आम्ही साइट व्हिजिट करणार आहोत. ‘ऑनलाइन’पेक्षा प्रदर्शनात प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेणे अधिक योग्य ठरले. हे प्रदर्शन ‘सकाळ’ने वरचेवर नियमितपणे भरवावे.

नीलम दरेकर, दिघी (गृहिणी) - आम्ही रावेत भागांत २/३ बीएचके पाहतोय. बजेटनुसार आम्हाला भरपूर पर्याय पाहता आले. वास्तू प्रदर्शनामुळे आम्हाला सगळीकडे फिरावे लागले नाही. वेळेचीही बचत झाली. प्रत्येक फर्मशी समक्ष बोलून चौकशी करता आली. तुलनात्मकदृष्ट्या चांगली माहिती मिळाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Vastu Exhibition Home