esakal | दोन खत विक्रेत्यांचे विक्री परवाने निलंबित | Pune
sakal

बोलून बातमी शोधा

दोन खत विक्रेत्यांचे विक्री परवाने निलंबित

दोन खत विक्रेत्यांचे विक्री परवाने निलंबित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : जुन्नर येथील कृषी अधिकारी यांच्यामार्फत दोन खत विक्रेत्यांची खत विक्री परवाना तपासणी करण्यात आली. त्यात युरिया खताचा पॉस मशिनवरील साठा आणि प्रत्यक्षात गोदामातील शिल्लक साठा यामध्ये तफावत आढळून आली. त्यामुळे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी संबंधित खत विक्री केंद्रांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

केंद्र सरकारने ‘डीबीटी’ योजनेअंतर्गत अनुदानित खत विक्रीसाठी पॉस मशिनचा वापर अनिवार्य केला आहे. युरिया आणि इतर अनुदानित खते ही पॉस मशिनमधून विक्री न झाल्यास ती मशिनवर शिल्लक दिसतात. त्यामुळे पुढील हंगामामध्ये केंद्र सरकारकडून मिळणारे खताचे आवंटन कमी होते. यासाठी हंगामामध्ये आवश्यक युरिया आणि इतर अनुदानित खत मिळण्यास अडचणी येत आहेत. या संदर्भात गुणवत्ता नियंत्रण निरिक्षकांना सूचित करण्यात आले आहे. तसेच, अनुदानित खत विक्रेत्यांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ज्या विक्रेत्यांचा मशिनवरील आणि प्रत्यक्षातील गोदामातील साठा जुळणार नाही, त्यांच्या विक्री परवान्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल.

सर्व विक्रेत्यांनी विक्री केंद्राच्या दर्शनी भागात अनुदानित खत खरेदी करताना शेतकऱ्यांनी आधार कार्डसोबत आणण्याबाबत फलक लावावेत. कोणत्याही परिस्थितीत अनुदानित खतांची विक्री ही पॉस मशिनशिवाय होणार नाही, याची सर्व विक्रेत्यांनी नोंद घ्यावी. तसेच, सर्व अनुदानित खत खरेदीला जाताना सोबत आधार कार्ड न्यावे. तसेच, विक्रेत्यांकडून खरेदीच्या वेळी मशिनवरुनच खत विक्रीचा आग्रह करा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बोटे यांनी केले आहे.

loading image
go to top