esakal | लाडक्या 'आमदाराची' बांधली समाधी; मृत्यूनंतर पार पाडले सर्व धार्मिक विधी
sakal

बोलून बातमी शोधा

pune

लाडक्या 'आमदाराची' बांधली समाधी; मृत्यूनंतर पार पाडले सर्व धार्मिक विधी

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी: ज्याला परिवारातील सदस्याप्रमाणे जीव लावला, जो त्याची उंची, आकर्षक शरीर यष्टी आणि पांढरा शुभ्र रंग यामुळे बघणाणाऱ्याच्या नजरेत भरत होता अशा लाडक्या 'आमदार' नावाच्या बैलाच्या निधनानंतर खडकवासला येथील बैलप्रेमी निखिल कोरडे व शंभू-बाजी गृपच्या सदस्यांनी त्याची खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला सिंहगड सृष्टी येथे असलेल्या गोठ्याच्या आवारात समाधी उभारली आहे. बैलाविषयी कृतज्ञता म्हणून अंत्यविधी, दशक्रिया विधी व तेराव्याचा विधीही करण्यात आला. यावेळी सर्व सदस्यांनी मुंडन देखील केले.

खडकवासला येथील शंभू-बाजी गृप मधील सदस्य आपली नोकरी-व्यवसाय सांभाळत बैलांचे संगोपन करतात. त्यासाठी खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला त्यांच्या जागेत भव्य गोठा उभारण्यात आलेला आहे. सध्याही तब्बल वीस लाख रुपये किंमतीचे चार बैल त्यांच्या गोठ्यात आहेत. दररोज स्वच्छ आंघोळ घालणे, उत्तम दर्जाचा हिरवा व वाळलेला चारा खाऊ घालणे, दिवसातून दोन वेळा खुराक चारणे आणि गोठ्याची स्वच्छता ठेवणे अशा गोष्टींमुळे शंभू-बाजी गृपचे बैल पाहणाऱ्यांच्या नजरेत भरतात.

आमदार' हा बैल या गृपने पाच वर्षांपूर्वी धायरी येथील एका शेतकऱ्याकडून पाच लाख एकावन्न हजार रुपयांना खरेदी केला होता. अत्यंत गरीब व देखण्या 'आमदाराला' लहान मुलेही धरुन फिरवायची. आमदाराचे सौंदर्य व इतर गुणांमुळे त्याला 2016 साली जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी ओढण्याचा तर 2018 आणि 2019 साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा रथ ओढण्याचा मान मिळाला होता. महाराष्ट्रासह इतर राज्यांतील बैल प्रेमी या 'आमदाराला' दहा लाखांपेक्षा जास्त किमतीला खरेदी करण्यासाठी इच्छुक होते; परंतु परिवारातील सदस्याप्रमाणे आपुलकीचे नाते जडलेल्या लाडक्या आमदाराला कोणी कितीही किंमत दिली तरी विकायचे नाही असा निर्णय शंभू-बाजी गृपच्या सदस्यांनी घेतला होता.

दुर्दैवाने 21 ऑगस्ट रोजी या आमदाराचे अचानक निधन झाले. अकाली सोडून गेलेल्या लाडक्या बैलाला गोठ्यातच पुरुन त्या जागी त्याची समाधी उभारण्यात आली व त्यावर त्याचा आकर्षक पुतळा उभारण्यात आला. एवढेच नाही तर दशक्रिया व तेराव्याचा विधी करुन सर्व गृप सदस्यांनी मुंडन केले.

loading image
go to top