पुणे : भाऊ रंगारी गणपतीची प्रतिष्ठापना होणार संभाजी भिडे यांच्या हस्ते

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टने यंदा 'श्रीं'ची प्रतिष्ठापना करण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या हस्ते करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळक यांनी नाही तर, श्रीमंत भाऊ रंगारी यांनी केली आहे, असा दावा करून पुण्याच्या गणेशोत्सवात खळबळ उडवून दिली होती. याच श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टने यंदा 'श्रीं'ची प्रतिष्ठापना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या हस्ते करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक यांनी समाजाला एक करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू केली, असा इतिहास शिकवला जातो. मात्र, यावर भाऊ रंगारी गणपती ट्रस्टने आक्षेप घेत भारतातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळक यांनी नाही तर, भाऊ रंगारी यांनी सुरू केला आहे, असे सांगितले. त्याची कागदपत्रे समोर आणून पुरावेही दिले. यावरून बराच वाद निर्माण झाला होता. या वादाला ब्राह्मण-ब्राह्मणेतर स्वरूपही आले होते. पुणे महापालिकेसह राज्य सरकारपर्यंत हा वाद पोहोचला होता. त्याचवेळी भाऊ रंगारी गणपती ट्रस्टला धमकीचे पत्र आल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

गेल्या अनेक वर्षांपासून संभाजी भिडे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचा हिंदुत्ववादी विचार आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचा प्रचार-प्रसार करत आहेत. तसेच शिववरायांचे 32 मण सुवर्णजडीत सिंहासन पुन्हा तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोरेगाव भीमा येथे घडलेल्या दंगलीनंतर त्यांच्यावर आरोप झाले. तसेच गुन्हा दाखल झाल्याने ते वादात सापडले होते. भिडे यांच्यावर भाऊ रंगारी गणपती ट्रस्टशी जवळीक असलेल्या काही पुरोगामी संघटनांनी कायमच टीका केली आहे. तर, हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. भाऊ रंगारी गणपती ट्रस्टच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी भूमिका घेतलेली असताना यंदा संभाजी भिडे प्रतिष्ठापनेसाठी येणार आहेत, हे विशेष. ट्रस्टचे सचिव दिलीप आडकर यांनीही भिडे यांच्या हस्ते पूजा होणार असल्याचे सांगितले.

प्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी काढण्यात येणाऱ्या मिरवणूक रथाचे सारथ्य संभाजी भिडे यांच्यासह महापौर मुक्‍ता टिळक, पुनीत बालन हे करणार आहेत.
तसेच यंदा भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांच्या साने गुरूजी तरुण मंडळाच्या गणपतीचीही प्रतिष्ठापणा संभाजी भिडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी या मंडळाने अयोध्येतील नियोजित श्रीराम मंदिराचा देखावा साकारला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Bhide will start Bhau Rangari Ganesh festival of this year