esakal | हे बाप्पा, वेळीच सुबुद्धी दे!
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

हे बाप्पा, वेळीच सुबुद्धी दे!

sakal_logo
By
संभाजी पाटील @psambhajisakal

कोरोनामुळे एकट्या पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत १८ हजार ६६८ जणांचा मृत्यू झाला. काही कुटुंबातील दोन किंवा तीन सदस्यांचा मृत्यू झाला. हजारो कुटुंब उध्वस्त झाली आहेत. ज्यांना कोरोना होऊन गेला, ते सध्या पोस्ट कोविडचे अनेक दुष्परिणाम भोगत आहेत. त्यामुळे अशी परिस्थिती पुन्हा येऊ द्यायची नसेल तर आपण योग्य ती खबरदारी नक्कीच घेऊ शकतो.

गणेशोत्सवाची सुरवातच मुळी समाजभान निर्माण करण्यासाठी झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांना अपेक्षित असणारी समाजजागृती आणि सार्वजनिक हित जपण्याची संकल्पना या उत्सवातून पुरेपूर साध्य झाली. हीच परंपरा जपत पुण्यातील गणेशोत्सवाची वाटचाल समाजकेंद्री राहिली. दोन वर्षांपासून कोरोनाने जीवनाच्या सर्वच पैलूंमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले, त्यात गणेशोत्सवाचे स्वरूपही बदलले. बाप्पांचा उत्सव साधेपणाने, मिरवणुकांविना पार पाडून गणेश मंडळांनी आपली जबाबदारी पार पाडली. पण, गणपती-दिवाळी अशा उत्सव-सणाच्या नादात गेल्या वर्षी आपण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला आमंत्रण दिले. यंदा गेल्या वर्षी सारखाच कोरोना थंड, काहीसा निद्रिस्त आहे‌. पण, अनावश्यक गर्दी करून, मास्क न घालून आपण तो जागा करीत नाही ना? याचे भान आता रस्त्यावर उतरणाऱ्या प्रत्येकाला ठेवावे लागेल.

‘आम्ही लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत किंवा आता भरपूर लोकांनी लस घेतली आहे, त्यामुळे मला कोरोनाची भीती बाळगण्याचे मुळीच कारण नाही,’’ अशी काहीशी बेफिकीरी आपल्यामध्ये आलेली दिसते. गेल्या वर्षीही आपल्याकडे दुसरी लाट येऊच शकत नाही, अशीच आपली धारणा होती. त्या निष्काळजीपणातून पुढे काय घडले याचा अनुभव जवळजवळ प्रत्येक कुटुंबातील एकातरी सदस्याने घेतला आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर लागण होण्याचे किंवा जिवाला धोका होण्याचे प्रमाण निश्चितच कमी झाले आहे. मात्र, लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या अद्यापही खूपच कमी आहे. त्यातही दोन्हीही डोस पूर्ण झालेल्यांची संख्या आणखीच अल्प आहे. त्यामुळे कोरोनाला किरकोळीत काढण्याची चूक पुन्हा करता कामा नये.

गणेश चतुर्थीच्या आधी एक-दोन दिवस आणि नंतरचे दोन दिवस शहरात झालेली गर्दी पाहता आपण कोरोनाला विसरलो आहोत का?, अशी शंका नक्कीच येते. खरेदीसाठी आणि गणेश मंडळांच्या मंडपासमोरही मास्क न घालता लोक, कार्यकर्ते फिरताना दिसतात. दर्शनासाठी काही मंडळांसमोर गर्दी झालेली दिसते.

नागरिकांची श्रद्धा, भावना या गोष्टी विचारात घेतल्या तरीही कोरोनाचे संकट त्यापेक्षाही भयंकर आहे, याचा अनुभव आपण घेतला आहे, त्यामुळे या गोष्टींना वेळीच मुरड घालायला हवी.

प्रशासनाने देखील बघ्याची भूमिका न घेता गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी किंवा कुठेही गर्दीच होणार नाही यासाठीच्या उपाययोजना करायला हव्यात. लोकांना घरीच थांबविण्यासाठीचे विशेष प्रयत्न पोलिस आणि महापालिका-जिल्हा प्रशासनानेही करायला हवेत. गणेश मंडळांनीही गर्दी होणार नाही, याकडे लक्ष द्यायला हवे. पुण्यातील अनेक गणेश मंडळांनी कोविड काळात फार मोठे काम केले आहे. त्यामुळे त्यांना गांभीर्याची जाणीव आहे. गणेशोत्सवाने सार्वजनिक हित जोपासण्याचे संस्कार केले आहेत. सध्या तरी कोरोनापासून दूर राहणे, त्याच्यासाठी नियमांचे पालन करणे यातच सर्वांचे हित आहे. त्यासाठी बाप्पा सर्वांना सुबुद्धी देईल, अशी अपेक्षा आहे.

हे वेळीच करा

  • गणपती पाहण्यासाठी गर्दी होणार नाही, याची कडक अंमलबजावणी

  • गर्दीच्या संभाव्य ठिकाणांचे आधीच व्यवस्थापन

  • विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई

  • बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांची चाचणी

loading image
go to top