Vidhan Sabha 2019 : कसं काय पुणेकर ते 'चंपा'ची चंपी; भर पावसात तापला प्रचार 

Modi-V-sharad-pawar.jpg
Modi-V-sharad-pawar.jpg

Vidhan Sabha 2019 :  'कसं काय पुणेकर' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलेली साद आणि पुणेकरांचे तोंडभरून केलेले कौतुक, 'तुम्हाला गृहीत धरले जातेय, आमदार घरचा हवा की बाहेरचा' असा कोथरूडच्या मतदारांना केलेला राज ठाकरे यांचा सवाल, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा 'चंपा' म्हणून झालेला उल्लेख, सभा आणि बैठकांनी भाजप विरोधात प्रचाराची राळ उठविणाऱ्या शरद पवार यांना मतदारांकडून मिळालेला प्रतिसाद, शहरातील अडचणीच्या मतदारसंघात भाजपने केलेली 'मेगाभरती' यामुळे पुण्यातील प्रचार चांगलाच गाजला. 

भाजप-शिवसेनेच्याविरोधात उभे करण्यात आलेले तुल्यबळ उमेदवार आणि त्यांच्या प्रचारासाठी सर्व शक्तीनिशी उतरलेली काँग्रेस-आघाडी हे 2019 च्या विधानसभा निवडणूक प्रचाराचे वैशिष्ट्य ठरले. आज दिवसभर पुणे आणि परिसरात पाऊस पडत होता. या पडत्या पावसात सर्वच मतदारसंघात उमेदवारांनी रॅली काढून मतदारांशी संपर्क साधला आणि भर पावसात पेटलेल्या प्रचाराची सांगता झाली.



पुणे शहर व जिल्ह्यातील 21 मतदारसंघात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीने कोथरूड मतदारसंघ राज्यभर चर्चेत आला. भाजपच्या या सुरक्षित मतदारसंघात सर्व विरोधी पक्ष एकत्र झाले. त्यांनी मनसेचे किशोर शिंदे यांना पाठिंबा देऊन पाटील यांच्यासमोर आव्हान निर्माण केले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात भाजपने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली, पण लोकसभेच्या तुलनेत भाजपने हा मतदारसंघ काहीसा 'लूज' च सोडला.



इंदापूरमध्ये भाजपमध्ये गेलेले माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांना प्रचारात आमदार दत्तात्रेय भरणे यांनी चांगली टक्कर दिली. दौंडचा प्रचार पवार कुटुंबीयांनी भावनिक बनविला. पुण्यात भाजपने चार नवे चेहरे देऊन भाकरी फिरवली. त्यांचा सामना करण्यासाठी काँग्रेस आघाडीकडूनही नवे दमदार चेहरे आले. संपूर्ण प्रचारात पुण्यातील विषयांपेक्षाही स्थानिक विषयांवरच भर राहिला. 



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा एस. पी. कॉलेजमधील झाडे तोडल्याने चर्चेत आली. काही कोटी रुपये खर्च करून उभा करण्यात आलेल्या वॉटरप्रूफ मंडपाची तुलना शरद पवारांच्या पावसात झालेल्या साताऱ्याच्या सभेशी झाली. मोदी यांनी अत्यंत जोशपूर्ण भाषण करून पुण्याचे तोंडभरून कौतुक केले. स्थानिक विषयांपासून देशाच्या सुरक्षेपर्यंत त्यांनी मुद्दे उपस्थित करीत लुटारुंकडून पैसा वसूल करणार असल्याचे सांगत, पुणेकरांच्या टाळ्या मिळवल्या. मोदींच्या सभेने पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये "जोश' आणला हे नक्की! 



या संपूर्ण निवडणूक प्रचारात केंद्रबिंदू राहिले ते शरद पवार. शरद पवार यांनी शेवटच्या दिवशी आठही मतदारसंघात सभा घेण्याऐवजी व्यापारी मेळावा आणि हडपसरमध्ये सभा घेतली. मोदी आणि शहा यांच्यावर जोरदार टीका करीत "अभी तो मै जवान हूँ'चा प्रत्यय दिला. यावेळी 'लाव रे व्हिडिओ' या ऐवजी राज ठाकरे यांनी स्थानिक मुद्‌द्‌यांना हात घातला. आपल्या ठाकरी शैलीत चंद्रकांत पाटील यांच्यावर तोफ डागली. तर चंद्रकांत पाटील यांनी मी पुणेकरच असल्याचे सांगत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. प्रदेशाध्यक्ष उमेदवार असल्याने या मतदारसंघात भाजपची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. 



भाजपच्यावतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, रामदास आठवले, चित्रपट अभिनेता सनी देओल यांच्यासह परराज्यातील मोठी फौज पुणे शहर व जिल्ह्यात प्रचारात उतरली होती. सभा, रॅली या शिवाय भाजपची पन्ना प्रमुखांची यंत्रणाही कार्यरत राहिली. काँग्रेसच्यावतीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात प्रचारात सहभागी झाले पण पक्षाचे मोठे नेते मात्र फिरकले नाहीत.



वंचित आघाडीच्यावतीने प्रकाश आंबेडकर, 'एमआयएम'चे खासदार ओवेसी यांनी सभा घेऊन प्रचारात तिसरा आवाज काढला. पुण्यात शिवसेना उमेदवार नव्हता त्यामुळे सेनेचे कार्यकर्ते जिल्ह्यात कार्यरत राहिले. जिल्ह्यात आदित्य ठाकरे, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सभा झाल्या. अजित पवार यांनी शेवटच्या दिवशी रॅलीत सहभागी होऊन कार्यकर्ते चार्ज केले. 


राज्यभरातून मेगाभरती करणाऱ्या भाजपने पुण्यातही शिवाजीनगर, पुणे कॅन्टोंमेंट, पर्वती मतदारसंघात भरती करून आपली ताकद वाढविली. शिवाजीनगर मतदारसंघात सनी निम्हण, माजी महापौर दत्ता गायकवाड, कॅन्टोंमेंट मध्ये सदानंद शेट्टी, वडगावशेरी मध्ये माजी आमदार बापू पठारे अशी नावांची मोठी यादी भाजपमध्ये सहभागी झाली. त्यामुळे अडचणीच्या मतदारसंघात भाजपला बूस्टर मिळाला. 
पुण्यातल्या प्रचारात नेत्यांनी पुण्याच्या प्रश्‍नांवर अपवादानेच लक्षवेध केले. संपूर्ण प्रचारात चंद्रकांत पाटील केंद्रस्थानी राहिले. 'आप'चा पुणेकरांसाठीचा जाहीरनामा वेगळा ठरला. प्रचार तर दणक्‍यात झाला आता खरे आव्हान राहणार आहे ते मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याचे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com