
मेट्रोचा विस्तार ही पुण्याची गरज आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू होतानाच पुढच्या टप्प्यांचे काम वेळेत होण्यासाठी ‘पुमटा’नेही वेगाने निर्णय घ्यायला हवेत.
विस्तारित मेट्रोला पुणेरी चर्चेचा ब्रेक नको!
मेट्रोचा विस्तार ही पुण्याची गरज आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू होतानाच पुढच्या टप्प्यांचे काम वेळेत होण्यासाठी ‘पुमटा’नेही वेगाने निर्णय घ्यायला हवेत. मेट्रोसोबतच बस, मोनोरेल यांसारख्या इतर पर्यायांवरही भर द्यायला हवा.
पंतप्रधानांच्या उपस्थितीत पुण्यातील मेट्रोचा एक छोटा टप्पा सुरू झाला. त्यामुळे मेट्रो पुण्यात वेळेवर आणि सुरक्षित धावू शकते हा विश्वास पुणेकरांना आला आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो आवश्यक आहे. सध्या काम सुरू असलेले वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट हे मार्ग २०२३ मध्ये पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता असून त्यानंतर खासगी वाहने चालविणारे प्रवासी मेट्रोकडे वळतील. पण हे मार्ग विस्तारलेल्या पुण्यासाठी पुरेसे नाहीत. त्यामुळे विस्तारित मार्गांसाठी तातडीने निर्णय घेऊन खर्च वाढण्यापूर्वी ते पूर्ण करायला हवेत.
पुण्याचा विस्तार पाहता वाहतुकीचे नियोजन एकात्मिकरित्या करण्यासाठी ‘पुणे युनिफाईड अर्बन ट्रान्स्पोर्ट अॅथॉरिटी’ची (पुमटा) स्थापना केली आहे. ‘पुमटा’कडून शहराच्या वाहतुकीचे नियोजन सुरू झाले आहे. ही समिती अशीच कार्यरत
राहून काम करेल आणि निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे पुणे आणि पीएमआरडीए क्षेत्रातील वाहतूक सुधारणा वेळीच करणे शक्य होणार आहे.
‘पुमटा’च्या बैठकीत नुकतीच मेट्रोच्या विस्तारित मार्गावर चर्चा झाली. शिवाजीनगर न्यायालय ते लोणी काळभोर दरम्यानच्या २१ किलोमीटरच्या मेट्रो मार्गाचा प्रकल्प अहवाल ‘दिल्ली मेट्रो’ने तयार करून तो मार्च २०२१ मध्ये पीएमआरडीएला दिला होता. त्यावर ‘पुमटा’च्या बैठकीत तब्बल वर्षभरानंतर चर्चा झाली. ‘पुमटा’ने विस्तारीकरणाच्या ‘डीपीआर’मध्ये काही बदल सुचवले आहेत. यात खडकवासला ते स्वारगेट आणि एसएनडीटी ते खडकवासला दरम्यानच्या मेट्रो मार्गांचा समावेश करण्याची सूचना केली आहे. दिल्लीत मेट्रोचा जेव्हा विस्तार झाला आणि ती दिल्लीबाहेर पोहोचली तेव्हा तिचा वापर अधिक प्रमाणावर वाढला. पुण्यातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी भविष्यातील विस्तार लक्षात घेऊन मेट्रोचे जाळे उभारणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे खडकवासला किंवा कात्रज आणि त्यापुढेही मेट्रो जाणे आवश्यकच आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे काम ‘पीएमआरडीए’ने हाती घेतले आहे. हे काम सध्या सुरू झाले आहे. आता हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्ग लोणी काळभोरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा संपूर्ण मार्ग एलिव्हेटेड असून त्यासाठी अंदाजे सात हजार दोनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुलगेटपासून पुढे याच मार्गाचा विस्तार सासवडपर्यंत करण्याची ही योजना आहे. हाच मार्ग पुढे हडपसर ते खराडी, असा जोडल्यास अधिक उपयुक्त होईल.
शहराचा सध्याचा विस्तार हा नव्याने महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये तसेच ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत होत आहे. मेट्रोचे विस्तारित मार्ग या भागात पोहोचले, तर विकासाला गती मिळणार आहे. या सर्वांमुळे पुण्यातील वाहतूक आणि पायाभूत सुविधांचा ताण कमी होईल. त्यामुळे मेट्रोचा विस्तार पुण्याची गरज बनली आहे. त्यासाठी चर्चेत वेळ न घालवता तातडीने निर्णय घ्यावेत. निर्णय घेण्यास विलंब झाला, तर प्रकल्पाचा खर्च वाढतो. हे टाळण्यासाठी ‘पुमटा’ने पुढाकार घ्यावा.
‘पुमटा’ने मेट्रो विस्तारीकरणासोबत सार्वजनिक वाहतुकीच्या इतर पर्यायांवर देखील आताच तयारी करायला हवी. कारण केवळ मेट्रोमुळे पुण्यातील वाहतुकीचा ताण कमी होईल, असे नाही. वाहतुकीचे विविध पर्याय आणि त्यांचे जाळे उभे राहिले तरच मेट्रोच्या उभारणीला अर्थ राहील.
हे नक्की करा
मेट्रोचे चारही दिशांना विस्तारीकरण
विस्तारीकरणाच्या प्रकल्पांना तातडीने मंजुरी
रेल्वेच्या लोकल सेवेचे ‘पीएमआरडीए’हद्दीत विस्तारीकरण
पीएमपीच्या बससंख्येत दरवर्षी वाढ
Web Title: Sambhaji Patil Writes Pune Extended Metro Discussion
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..