कोणी ट्रॅफिक सुधारता का ट्रॅफिक !

कोणत्याही कारणासाठी पुण्यातील रस्ते बंद केले, तर त्या रस्त्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
Traffic Police
Traffic PoliceSakal
Summary

कोणत्याही कारणासाठी पुण्यातील रस्ते बंद केले, तर त्या रस्त्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.

कोणत्याही कारणासाठी पुण्यातील रस्ते बंद केले, तर त्या रस्त्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पालख्या पुण्यात असताना वाहनचालक, स्थानिक नागरिकांची जी फरफट झाली ती टाळण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक नियोजन व्हायला हवे.

पुणे हे महानगर तर आहेच; पण सांस्कृतिक राजधानीही आहे. दरवर्षी येणारा गणेशोत्सव, दोन दिवस मुक्कामी असणाऱ्या संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या पालख्या, विविध महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी, राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची ये-जा, विविध धर्मीयांचे उत्सव, मिरवणुका अशा अनेक कारणांनी पुण्यातील काही महत्त्वाच्या रस्त्यांवरील वाहतूक पोलिसांना बंद करावी लागते. सुमारे २० ते २२ लाख वाहने सतत रस्त्यावर असणाऱ्या पुण्यात एक जरी रस्ता बंद झाला तरी वाहतूक व्यवस्था कोलमडण्यास वेळ लागत नाही. शहर वाढत आहे. दररोज नव्या ३५० ते ४०० वाहनांची भर रस्त्यावर पडते. अशावेळी उपलब्ध रस्त्यांचा वापर योग्य पद्धतीने आणि अतिशय योजनापूर्वक करण्याशिवाय गत्यंतर नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीचे नियोजन म्हणजे रस्ते बंद करणे, असा काहीसा समज पोलिस खात्याने केलेला दिसतो. यातून वाहतूक सुरळीत होण्यापेक्षा कोंडीत अधिकच भर घातली जात आहे. यातून पुणेकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. हे टाळण्यासाठी पोलिसांना त्यांच्या नियोजनात निश्चित बदल करावे लागतील.

संपूर्ण शहरातील रस्त्यांचा अभ्यास करून बंद केलेल्या रस्त्यांना दिलेल्या पर्यायी रस्त्यांवर वाहतूक सुरळीत राहील आणि प्रत्येकाला थोडा अधिक वेळ लागेना का पण सुरक्षित घरी पोहोचता येईल, अशी यंत्रणा उभी करावी लागेल. कारण शहरातील वाहतूक कोंडी आता असह्य होऊ लागली आहे.

पुण्यात दरवर्षी पालख्या येणार, गणेशोत्सव असणार, मिरवणुका निघणार अशावेळी काही रस्ते बंद करावे लागतील. अशा वेळी दिल्या जाणाऱ्या पर्यायांचा सूक्ष्म अभ्यास करायला हवा. मेट्रो, उड्डाणपूल यांच्या कामामुळे काही रस्ते बाधित होणार आहेत. त्यामुळे केवळ रस्ते बंद करून चालणार नाही. कोणता रस्ता किती वेळ बंद करायला हवा. तो टप्प्याटप्प्याने कधी चालू करता येईल, याचा शास्त्रीय अभ्यास करण्याची वेळ आली आहे. एखाद्या स्थानिक पोलिस अधिकाऱ्याला वाटले किंवा एखाद्या धार्मिक स्थळाला अडथळा नको म्हणून रस्ते बंद करण्याची पद्धत बंद करायला हवी. गेल्या आठवड्यात काही कारणाने वाहतूक पोलिस थंडावले होते. त्यावेळी चतुर्थी असतानाही शिवाजी रस्ता बंद केला नव्हता मात्र त्यादिवशी वाहतुकीची कोंडी न होता वाहतूक सुरळीत होती. याचाच अर्थ उठसूट रस्ता बंद करण्याची गरज नाही. पालखी मुक्कामी असताना बाजीराव रोड बंद केल्याने टिळक रोड सह पेठांच्या भागात एकच कोंडी झाली. यावेळी कोणताही पर्याय व्यवस्थित देण्यात आला नाही. पोलिस जे पर्याय देतात ते परिपूर्ण नसतात. त्यांचे फलक लावलेले नसतात. पोलिसांच्या सोशल मीडिया हँडलवर कोणतेही नकाशे किंवा अपडेट दिले जात नाहीत. पर्यायी रस्त्यांवरील अतिक्रमणे, पार्किंग केलेली वाहने कायम असतात. वाहतूक पोलिस तेथे नसतात. या अडचणी सीसीटीव्ही, गुगल, ड्रोन अशा साधनांचा वापर करून दूर करणे शक्य आहे.

वाहतूक पोलिस ही शिक्षा देण्याची शाखा ही दृष्टी बदलून तेथे टेक्नोसॅव्ही, स्मार्ट आणि पुण्याची माहिती असणारे अधिकारी, पोलिस नेमण्याची गरज आहे. वाहतूक शाखा साइड ब्रांच न होता सर्वात कार्यक्षम शाखा कशी होईल, या दृष्टीने त्याचे सक्षमीकरण व्हायला हवे. कारण पुण्यासारख्या शहरात वाहतूक हीच मुख्य समस्या आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी दंडात्मक कारवाई आवश्यक असली तरी केवळ पावत्या फाडणे हे वाहतूक शाखेचे काम नाही, तर वाहतूक नियमन करणे ही मुख्य जबाबदारी आहे, हे सतत बिंबवणे आवश्यक आहे. अर्थातच वाहतुकीचे पालन करणे, नियम पाळणे ही शिस्त ही पुणेकरांनी लावून घ्यायला हवी.

हे नक्की करा

  • शहरातील रस्त्यांच्या पर्यायी मार्गांचा शास्त्रशुद्ध अभ्यास

  • रस्ते कमीत कमी काळ बंद राहतील अशी व्यवस्था

  • वाहतूक नियमनावर अधिक भर

अशी आहे स्‍थिती

  • पुण्यातील एकूण रस्त्यांची लांबी : १४०० किमी.

  • एकूण वाहनांची संख्या: ३३ लाख

  • वाहतूक शाखेचे पोलिस : ९६५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com