Sambhaji Patil Writes special article on Pune Lockdown situation
Sambhaji Patil Writes special article on Pune Lockdown situation

पुणे : अंमलबजावणीतील गोंधळ आवराच!

शास्त्रीय पद्धतीने लॉकडाउन केला नाही तर त्याचा काहीही उपयोग होत नाही, उलट आर्थिक चक्र थांबवून संकटे वाढतात याचा अनुभव पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांनी घेतला. लॉकडाउनच्या दहा दिवसात कोरोनाची साखळी तोडणे सोडाच पण रूग्णसंख्येत आपण आणखीच भर टाकली. त्यामुळे कोरोनाचा मुकाबला करताना आपण आणखी मागे खेचलो गेलो. यापुढे लॉकडाउनसारख्या सोप्या मार्गापेक्षा सर्व व्यवहार सुरळीत ठेवून स्वतःची काळजी स्वतःच घेण्याच्या व्यवहार्य मार्गावर भर द्यावा लागेल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एप्रिलमध्ये इटलीमधील कोरोनाची स्थिती पाहून एवढे रुग्ण आपल्याकडे वाढणे शक्‍यच नाही असे आपण ठामपणे सांगत होतो. महापालिकेने आपल्याकडे किती रूग्णसंख्या वाढेल याचे जे आकडे प्रसिद्ध केले होते, त्याला गांभीर्याने न घेता उलट दुर्लक्षच केले. पण आजचा फक्त पुण्यातील 45 हजार रूग्णसंख्येचा आकडा पाहिला की, आपण खरोखरच निष्काळजीपणे वावरलो याची जाणीव होते. जगाच्या तुलनेत आपल्याला काळजी घ्यायला, उपाययोजना करण्यासाठी दीड महिन्यांचा जादा कालावधी मिळाला होता, पण तो आपण वाया घालवला. पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा पहिल्या तीन महिन्यांच्या काळातही कमी करता आला नाही. पहिल्या "अनलॉक'नंतर ज्या भागात रुग्ण नव्हते, त्या भागात आपण संसर्ग झपाट्याने पसरवला. त्यामुळे आजची स्थिती हाताबाहेर जातेय की काय अशा अवस्थेला आली आहे, ही वस्तुस्थिती स्वीकारायलाच हवी.



पुण्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 65 टक्‍क्‍यांवर होते. ते आता 45 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आले आहे. रूग्णसंख्या वाढल्याने हे प्रमाण कमी झाल्याचे तात्पुरते समाधान आपण करूनही घेऊ पण महापालिकेचे आकडे आणि प्रत्यक्ष जमिनीवरील स्थिती वेगळी आहे. उपचारासाठी आता गंभीर रुग्णांनाही धावाधाव करावी लागत आहे. ससून किंवा इतर सरकारी दवाखान्यात बेड मिळविणे जिकरीचे झाले आहे. एका बाजूला रुग्णालयात प्रवेश मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत असून, दुसरीकडे सरकारने किती बिल आकारावे याचे आदेश काढल्यानंतरही खासगी, "धर्मादाय' रुग्णालये रुग्णांकडून भरमसाट बिल आकारून लूट करीत आहेत.

त्यामुळे कोरोनाशी लढाई लढताना तीन पातळीवर लक्ष द्यावे लागेल. एक म्हणजे लॉकडाऊनसारखा मूर्खपणाचा निर्णय यापुढे न घेता अधिकाधिक व्यवहार सुरळीत होण्यावर भर देणे.चाचण्यांची संख्या वाढवून "कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग'च्या विविध पर्यायांचा अवलंब करणे. दुसरे ज्यांना रुग्णालयात दाखल होऊनच उपचार घ्यावे लागणार आहेत, अशा रुग्णांना विनाअडथळा रुग्णालयात प्रवेश मिळेल अशी व्यवस्था करणे आणि त्यांच्या बिलाच्या तक्रारी येणार नाहीत याकडे लक्ष देणे. तिसरी बाब कोरोना योग्य काळजी घेतल्याने, घरी उपचार घेऊनही बरा होतो, हा विश्‍वास नागरिकांना देणे. हे केले तरी सध्याची गुंतागुंत निश्‍चित कमी होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com