वाहतुकीचे नियोजन करून हवे ‘उड्डाण’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Transport
वाहतुकीचे नियोजन करून हवे ‘उड्डाण’!

वाहतुकीचे नियोजन करून हवे ‘उड्डाण’!

उड्डाणपूल बांधले तरी वाहतूक कोंडीतून सुटका होईलच याची खात्री देता येत नाही. त्यातही उभारणीतच दोष राहिले तर काय होते याचा अनुभव नळ स्टॉप, हडपसर, विद्यापीठ चौक आदी ठिकाणी पुणेकर घेत आहेत. त्यामुळे उड्डाणपूल उभारण्याचा अट्टाहास सोडून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे, रस्त्यावरील वाहने कमी करणे यालाच नियोजनात प्राधान्य द्यायला हवे.

शहरात एखाद्या चौकात वाहतुकीची कोंडी होऊ लागली की, त्यावर लगेच उड्डाणपूल बांधा हा सरधोपट मार्ग सुचवला जातो. उड्डाणपूल बांधला की, आपल्या मतदारसंघात मोठा प्रकल्प आणला याचे श्रेय घेता येते शिवाय मोठे प्रकल्प उभारण्यातील आर्थिक फायदेही मोठे असतात. त्यामुळे त्या ठिकाणची गरज, वाहनांची सोय, शहराच्या एकात्मिक वाहतुकीवर त्याचे होणारे परिणाम, त्यासाठी लागणारा मोठा खर्च या गोष्टींना महत्त्व न देता पूल उभारणीसाठी लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या होत हो मिळविणारे अधिकारी आग्रह धरतात. दहा कोटींच्या कामावर पंचवीस-तीस कोटी रुपये खर्च होतात. प्रकल्प सल्लागार कोट्यवधी रुपये घेऊन चुकीचा सल्ला देतो. पुलाचे काम सुरू असताना त्या मार्गावर प्रवास करणारे वेठीस धरले जातात आणि पूल सुरू झाल्यानंतर लक्षात येते वाहतूक कोंडी कायम आहे.

पुणेकरांनी याचा पुरेपूर अनुभव घेत आहेत. विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर लक्षात आले या पुलाचे डिझाईन चुकले आहे. हडपसरच्या पुलाला तर चक्क तडे गेले, उड्डाणपुलावर सिग्नल बसविण्याचा जागतिक विक्रमही येथेच झाला. ज्या पुलाचे उद्घाटन कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले, त्याच पुलाखाली महिनाभरात वाहतूक कोंडी पाहणीचा दौरा पाटील यांनाच करावा लागला. याचाच अर्थ उड्डाणपूल हे वाहतूक कोंडी वरील पूर्ण उत्तर नाही. एक मोठा पूल करायचा आणि पूल संपताच पुन्हा कोंडी करायची, त्या भागातील गल्ली बोळ पॅक करायचे, स्थानिक नागरिकांना प्रचंड मनस्ताप द्यायचा आणि ज्यासाठी सर्व अट्टहास करायचा ती वाहतूक जैसे थे राहत असेल तर निश्चितच वेगळे पर्याय शोधावे लागणार आहेत.

जगभरात उड्डाणपूल काढून टाकले जात असताना आयटी सिटी, विद्वानांच्या पुण्यात ते बांधण्याचा आग्रह धरणे कितपत योग्य आहे. विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडल्यानंतर उड्डाणपूल असतानापेक्षा सध्याची परिस्थिती बरी म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच सिंहगड रस्त्यावर, कात्रज चौकात उभारले जात असणारे किंवा कर्वे रस्त्यावर प्रस्तावित असलेल्या उड्डाणपुलाबाबत सर्व बाबींचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून ते बांधले जावेत. पुण्यात अनेक इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. आयटीतील तज्ज्ञ, वाहतुकीवर काम करणाऱ्या स्वयंसेवी, शासकीय संशोधन संस्था आहेत त्यांच्या सूचना, कल्पना प्रकल्प राबविताना घेतल्या तर प्रकल्प बिनचूक, अधिकाधिक लोकोपयोगी ठरतील.

मुळात शहर नियोजनाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. केवळ रस्ते रुंद करून, उड्डाणपूल, भुयारी मार्ग काढून वाहतूक कोंडी सुटणार नाही. त्यासाठी दर्जेदार सार्वजनिक वाहतूकच लागेल. मेट्रोचे काम सध्या सुरू आहे, पण ती शहराच्या सर्व भागात पोचण्यास बराच काळ आणि पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे पीएमपीला अधिक बळकट करण्याशिवाय पर्याय नाही. आजही १५ ते १६ लाख प्रवासी पीएमपीवरच अवलंबून आहेत. त्यामुळे पीएमपी गाड्यांची संख्या, त्यांची वारंवारता वाढविणे, दस मे बस सारखे नवनवे प्रयोग करणे, एसी गाड्या वाढविणे, गाड्यांची स्वच्छता ठेवणे या सर्वांवर भर द्यावाच लागेल. सतत फक्त मेट्रोचा ढोल वाजवून रस्त्यावरील वाहने कमी होणार नाहीत, त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतील. खात्रीशीर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी केली तरच कोंडी कमी होईल हे डोक्यात पक्के ठेवायला हवे. मी उभ्या असणाऱ्या जागेपासून पाचशे मीटर अंतरावर बससेवा आणि अंतर्गत प्रवासासाठी सायकल हीच पुण्याची गरज आहे. नियोजन त्यादृष्टीने व्हायला हवे, तरच पुणे आणि रस्ते वाहते राहतील.

याची आहे गरज...

  • प्रकल्प उभारणीत नागरिकांचा सहभाग

  • उड्डाणपूल बांधण्यापूर्वीच वाहतुकीच्या सर्व बाजूंचा विचार

  • ‘पीएमपी’चा दर्जा, संख्या आणि वारंवारिता सुधारणे

Web Title: Sambhaji Patil Writes Transport Management Flyover Traffic Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top