कऱ्हेकाठी अवतरले विष्णू अवतार

कऱ्हेकाठी अवतरले विष्णू अवतार
Published on

सासवड शहर, ता. २२ : विष्णूच्या दशावतारांमागील वैज्ञानिक आणि सामाजिक दृष्टिकोन मांडणाऱ्या ‘संभवामि युगे युगे’ या बहु-कलाविष्काराने सासवडकर रसिकांची मने जिंकली. पुणे येथील ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या पालक-अभिव्यक्ती गटाने रविवारी (ता. २१) आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात हा कार्यक्रम सादर केला.
कार्यक्रमाचे उद्‍घाटन नगराध्यक्ष आनंदीकाकी जगताप आणि सरदार आप्पासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या प्रयोगात विष्णूच्या दहा अवतारांमागील उत्क्रांतीवादी आणि आधुनिक संदर्भ प्रभावीपणे मांडण्यात आले होते. गायन, वादन, नृत्य, नाट्य, चित्रकला आणि शिल्पकला अशा विविध कलांच्या माध्यमातून हा आविष्कार सादर झाला.
भव्य नेपथ्य, आकर्षक वेशभूषा आणि उत्तम प्रकाशयोजनेमुळे नरसिंह अवतारासारखे प्रसंग जिवंत झाले होते. ‘यदा यदा हि धर्मस्य’ या श्‍लोकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तांत्रिक युगात पौराणिक वारशाची ओळख नव्या पिढीला करून देण्याच्या या प्रयत्नाचे सासवडकर प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. शेवटपर्यंत सभागृह रसिकांच्या उपस्थितीने भरगच्च होते.
पालकांनी गाजविले व्यासपीठ
मंचावर सादरीकरण करणारे कलाकार हे कोणतेही व्यावसायिक नर्तक किंवा अभिनेते नसून, ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचे पालक होते. व्यावसायिकता नसतानाही त्यांचा अभिनय, संवादफेक आणि नृत्यातील समन्वय वाखाणण्याजोगा होता.
‘वाचू आनंदे’ वाचनकट्टाच्या प्रमुख स्नेहल देशपांडे व त्यांच्या सर्व सहकारी मैत्रिणी. पुरंदर कलामंचाचे प्रमुख संजय काटकर, मोहन बागडे, अनिल गद्रे, सुनील हेंद्रे, अनिल कदम, संतोष जगताप, नीलेश शिंदे, हेमंत ताकवले, जगदीश शिंदे, राजेश काकडे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. स्नेहल देशपांडे यांनी प्रास्ताविक तर संजय काटकर व मोहन बागडे यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक होते अमित जोशी आणि स्मिता कुलकर्णी. लेखन होते स्मिता कुलकर्णी, केदार जांभेकर यांचे. गायन सायली जोशी, अमेय गोखले यांनी केले. वादन सुचेता परांजपे, ओंकार साठे यांनी केले. संगीत संयोजन प्रांजल अक्कलकोटकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com