नव्या पुलाचे काम पाच टक्केच

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला जोडणारा आणखी एक पूल सांगवी ते बोपोडी या दरम्यान उभारणार आहे.
Flyover
Flyoversakal
Summary

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला जोडणारा आणखी एक पूल सांगवी ते बोपोडी या दरम्यान उभारणार आहे.

पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवडला जोडणारा आणखी एक पूल सांगवी ते बोपोडी या दरम्यान उभारणार आहे. या पुलाचे भूमिपूजन झाले, पण भूसंपादनातील अडचणी आणि पावसाळ्यामुळे सात महिन्यांत पाच टक्केच काम पूर्ण झाले आहे. आता दीड वर्षात या पुलाचे काम पूर्ण करण्याचे आव्हान पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमेवरून मुळा नदी वाहते. या दोन्ही शहरातील नागरिकांचे रोज नोकरी, व्यवसाय, शिक्षणामुळे येणे-जाणे असते. पूर्वी या शहराला जोडणारे पूल कमी असल्याने नागरिकांना लांबचा वळसा घालून जावे लागत होते. पण संयुक्त प्रकल्प राबवून नवे पूल उभारले जात आहेत.

सध्या पुणे व पिंपरी-चिंचवडला जोडणारे सहा पूल अस्तित्वात आहेत. एका पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असून, बालेवाडी येथे जागा ताब्‍यात न आल्याने हा पूल अजून सुरू झालेला नाही. तर आता सांगवी ते जयकर पथ हा आठवा पूल बांधला जाणार आहे.

असा आहे पूल

सध्या सांगवीला जाण्यासाठी स्पायसर महाविद्यालय येथून एक पूल आहे. तसेच औंध येथील राजीव गांधी पूल व डीपी रस्त्यावरील पूल आहे. आता आणखी एक पूल जयकर रस्त्यावरून तयार केला जाईल. बोटॅनिकल गार्डन येथील १८ मीटरचा रस्ता करून सांगवीला जोडणारा ७५० मीटर लांबीचा पूल पिंपरी-चिंचवड महापालिका बांधणार आहे. त्यासाठी ३६.२५ कोटी रुपये खर्च येणार असून, यातील ५० टक्के म्हणजे १८.१३ कोटी रुपये पुणे महापालिका पिंपरी-चिंचवड महापालिकेला देणार आहे. २४ महिन्यांत या पुलाचे काम पूर्ण होणे आवश्‍यक आहे.

पुणे-पिंपरीला जोडणारे पूल

  • डीपी रस्ता पूल (औंध)

  • राजीव गांधी पूल (औंध)

  • स्पायसर महाविद्यालय (सांगवी पूल)

  • वि. भा. पाटील पूल (बोपोडी-दापोडी)

  • हॅरिस पूल

  • बालेवाडी-वाकड पूल (अपूर्ण आहे)

काय आहे अडचण ?

सांगवी ते बोपोडी हा नवा पूल बांधताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मागील बाजूच्या जयकर रस्त्याला हा पूल जोडला जाणार आहे. त्यासाठी बोटॅनिकल गार्डनची जागा ताब्यात घेऊन तेथे १८ मीटरचा रस्ता केला जाणार आहे. सांगवीच्या बाजूने काही काम झाले आहे, पण बोपोडीच्या बाजूने काहीच काम झाले नाही. बोटॅनिकल गार्डनची प्राथमिक ताबेयादी पुणे महापालिकेला मिळाल्याने तेथे काम करता येणार आहे. पावसामुळे नदीपात्रात काम करता आले नाही, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

काय होणार फायदा?

हा पूल पूर्ण झाल्यानंतर बोपोडी, खडकी या भागातील नागरिकांना त्याचा उपयोग होणार आहे. शिवाय, स्पायसर महाविद्यालय येथील पुलावरील ताण कमी होऊन या भागातील वाहतूक कोंडी कमी होईल.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांचा हा संयुक्त प्रकल्प आहे. हा पूल पिंपरी-चिंचवड बांधत असून, पुणे महापालिका अर्धा खर्च देणार आहे. भू-संपादनातील अडचण दूर झाल्याने पावसाळ्यानंतर या प्रकल्पास वेग येईल.

- अजय वायसे, कार्यकारी अभियंता, पुणे महापालिका

तुम्हाला काय वाटते?

पुणे आणि पिंपरीला जोडणारा आणखी एक पूल सांगवी ते बोपोडी दरम्यान उभारला जाणार आहे. दीड वर्षात या पुलाचे काम पूर्ण करण्याचे आव्हान पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर आहे. याबाबत आपल्या प्रतिक्रिया नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com