

सांगली जिल्ह्यात चार महिने
पुरेल इतकाच चारासाठा
टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन सतर्क; शेतकऱ्यांना चारा बियाणे वाटप
ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली ः जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात सध्या चार महिने पुरेल इतकाच चारा उपलब्ध आहे. त्यामुळे चारा टंचाईवर मात करण्यासाठी कृषी व पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे.
केंद्र सरकारच्या ‘ट्रिगर एक’च्या निकषांनुसार राज्य शासनाने जिल्ह्यातील मिरज, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत या चार तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर केली आहे. उर्वरित तालुक्यांतही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी, तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जुलैमध्ये दमदार पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिने कोरडेच गेले आहेत. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून शेतीसह पिण्याच्या पाण्याचा, तसेच पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात लहान व मोठी अशी एकूण ८ लाख १८ हजार ७०० जनावरे आहेत. त्यांना प्रतिमहिना सुमारे ६ लाख ३ हजार टनाहून अधिक चाऱ्याची आवश्यकता असते. सध्या जिल्ह्यात १८ लाख टन चारा शिल्लक आहे. उपलब्ध चारा आणि एकूण पशुधनाचा विचार करता भविष्यात चाऱ्याचा प्रश्न निर्माण होईल, या अंदाजाने कृषी व पशुसंवर्धन विभागाने चाऱ्याबाबत नियोजन केले आहे.
जिल्ह्यात ९० हजार किलो बियाणांचे वाटप जास्त पावसाच्या भागातील शेतकऱ्यांना चाऱ्याबाबत सुमारे ९० हजार किलो बियाणांचे वाटप केले आहे. मका, ज्वारी, बाजरी अशा कमी पाण्यात येणाऱ्या बियाणांचा यात समावेश आहे. जास्त पावसाच्या भागात चाऱ्याची उपलब्धता आहे. त्यामुळे या ठिकाणच्या सुमारे ६५० शेतकऱ्यांनी दुष्काळी भागाला चारा देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र मशीनच्या साहाय्याने ऊसतोडणी केली तर उसासोबतच जनावरांचा चारा वाया जातो. ऊसतोड अथवा उसाची कापणी माणसांकडून करावी, जेणेकरून उसासह चाराही उपलब्ध होतो, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
कोट -------
जिल्हा नियोजन समितीकडून वैरण विकास योजनेसाठी निधी उपलब्ध झाला आहे. ९० हजार किलो वैरण पिकांच्या बियाणांचे वाटप करण्यात आले आहे. त्यातून चार लाख टन चारा निर्मिती होणे अपेक्षित आहे. संभाव्य चाराटंचाईला तोंड देण्यासाठी नियोजन सुरू आहे.
- डॉ. अजयनाथ थोरे,
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.