

सांगली जिल्ह्याच्या अनेक भागांत पाऊस
रब्बी पिकांना जीवदान; द्राक्षांच्या फळछाटणीचा मार्ग सुकर
सांगली, ता. १७ : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आज अखेर काहीसा दिलासा मिळाला. मिरज पूर्व, तासगाव, कवठेमहांकाळ आणि शिराळ्या तालुक्यांच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. पाण्याअभावी रखडलेल्या रब्बी हंगामातील पिकांना या पावसाने आधार मिळाला असून, शाळू, ज्वारीच्या पेरणीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. द्राक्ष बागांमधील रखडलेल्या फळछाटणीचाही मार्ग सुकर होण्याची आशा निर्माण झाली आहे. सोमवारपासून पुढील चार दिवस पावसाची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मिरज तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. करोली (एम), सलगरे, एरंडोली, रसूलवाडी आणि कांचनपूर परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. तासगाव शहरासह मणेराजुरी, सावळज, योगेवाडी, हातनूर, उपळावी, कुमठे, डुबल, धुळगाव, कवठेएकंद आणि बस्तवडे येथेही पावसाने हजेरी लावली. कवठेमहांकाळ शहरासह शिंदेवाडी, कुकटोळी आणि ढालगाव परिसरात हलक्या सरी बरसल्या. शिराळा परिसर, मांगले येथेही विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. खानापूर तालुक्यातील पेड, तर जत तालुक्यातील डफळापूर येथेही हलका पाऊस झाला.
पाचल, साखरप्यात पाऊस
राजापूर/संगमेश्वर (जि.रत्नागिरी) : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा, कोंडगाव आणि राजापूर तालुक्यातील पाचल पंचक्रोशीत पडलेल्या मुसळधार पावसाने गेल्या काही दिवसांपासून ऑक्टोबर हिटच्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा दिला; मात्र, दुसरीकडे तयार झालेल्या भातशेतीचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. पाचल परिसरात शनिवारी दुपारी पावसाच्या सरी कोसळल्या, तर संगमेश्वर तालुक्यातील कोंडगावसह परिसरात सायंकाळी सहाच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून दिवसभरातील उकाडा आणि रात्रीची गर्मी यामुळे नागरिक त्रस्त झाले होते.
मुंबईकर होणार घामाघूम
मुंबई : राज्यातील हवामानात मोठे बदल होत असून, पुढील काही दिवसांत मुंबई परिसरात कमाल तापमान ४० अंशांवर जाण्याची शक्यता आहे. त्यातच आर्द्रतेमुळे प्रचंड उकाडा जाणवणार असल्याने मुंबईकरांचा घामटा निघणार आहे. त्याचबरोबर पुढील पाच दिवसांत कोकण किनारपट्टी आणि लगतच्या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.