सांगोला नगरपालिकेच्या पहिल्याच सभेत विकास कामांचा धडाका; ८७ कोटींच्या रस्त्यांसह उद्यानांना मंजुरी

सांगोला नगरपालिकेच्या पहिल्याच सभेत विकास कामांचा धडाका; ८७ कोटींच्या रस्त्यांसह उद्यानांना मंजुरी

Published on

SGW26B09359
सांगोला : येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहात पहिल्या सर्वसाधारण सभेतील विकासकामांबाबत माहिती देताना नगराध्यक्ष आनंदा माने यावेळी उपस्थित उपनगराध्यक्ष नितीन इंगवले, प्रवक्ते नगरसेवक अरुण पाटील.
..........
सांगोला नगरपालिकेच्या विकास कामांचा धडाका
......
पहिल्याच सभेत ८७ कोटींच्या रस्त्यांसह उद्यानांना मंजुरी
.........
सांगोला, ता. २५ : शहराच्या विकासाला वेग देत नगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत विविध महत्त्वाच्या कामांना मंजुरी देण्यात आली. नगराध्यक्ष आनंदा माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत शहरातील पायाभूत सुविधांवर भर देत तब्बल ८७ कोटी ४८ लाख ८८ हजार रुपयांच्या १९ रस्त्यांच्या विकास कामांना हिरवा कंदील दाखविण्यात आला.‌
निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली. यासंदर्भात शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष आनंदा माने, उपनगराध्यक्ष नितीन इंगोले, प्रवक्ते नगरसेवक अरुण पाटील, नगरसेवक माऊली तेली, नगरसेवक काशिलिंग गावडे आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना प्रवक्ते नगरसेवक अरुण पाटील म्हणाले की, नगरपालिका निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शब्दाप्रमाणे तहसील कार्यालयाजवळ स्व. भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मारकासाठी ३ कोटी रुपयांच्या कामास मंजुरी देण्यात आली. तसेच विविध समाजाच्या सभागृह बांधकामासाठी पूर्वी मंजूर केलेल्या २० कोटी रुपयांच्या निधीअंतर्गत जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आला. शहरातील सार्वजनिक सुविधा आणि आरोग्यदायी वातावरणावर लक्ष केंद्रित करत वासुद रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ कराटे-योगा केंद्र विकसित करण्याचा विषय मंजूर झाला. ‘वैशिष्ट्यपूर्ण योजना’ अंतर्गत ‘नमो उद्यान’ उभारण्यासाठी १ कोटींचा निधी उपलब्ध झाला असून प्रभाग ८ मधील आरक्षित जागेवर बगीचा विकसित होणार आहे.

‘शिवसृष्टी’साठी २ कोटींचा निधी
वंदे मातरम् चौक येथील आरक्षण क्रमांक ६३ येथील बगीचाला राजे उमाजी नाईक उद्यान व भाजी मंडईला राजे उमाजी नाईक भाजी मंडई असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीला अधोरेखित करत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सर्व्हे नंबर १६०८ येथे ‘शिवसृष्टी’ उभारण्यासाठी २ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. राजे उमाजी नाईक यांच्या नावाने वंदे मातरम् चौकातील उद्यान व भाजी मंडई नामकरणाचा निर्णय घेण्यात आला. ग्रामदैवत अंबिका मंदिर परिसरात बगीचा व धर्मशाळा उभारण्याचा विषयही मंजूर झाला. नागरिकांना शास्तीचा कर कमी करण्यासाठी कर अभय योजनेअंतर्गत ठराव करून प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय येथे पाठविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. शहरातील मोकाट जनावरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गोशाळेत सोडण्यास मंजुरी देण्यात आली.


चौकट
‘विरोधी पक्षाच्या सदस्यांना
विश्वासात घेऊन काम करणार’
नगराध्यक्ष आनंदा माने म्हणाले, निधीचा योग्य विनियोग करत नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणारा विकास साधला जाईल. बहुमत असले तरी विरोधी पक्ष सदस्यांना विश्वासात घेऊन शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सर्वात महत्त्वाचे स्व. भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मारकासाठी ३ कोटी रुपयांच्या कामास मंजुरी देण्यात आली. लवकरच स्मारकाचे काम सुरू होईल ‌ विकासाचा स्पष्ट रोडमॅप मांडत हरित, स्वच्छ आणि सुविधायुक्त सांगोला घडविण्याची भूमिका व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com