

TVS26A00206
अनकढाळ (ता. सांगोला) : येथे जप्त करण्यात आलेल्या बनावट दारूसाठ्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी.
---
सांगोला तालुक्यात बनावट दारूसाठा जप्त
कंटेनरसह ८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; दोघांना अटक
सकाळ वृत्तसेवा
तावशी, ता. १० : पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर विभागाने मोठी कारवाई केली आहे. अनकढाळ (ता. सांगोला) येथील सोलापूर महामार्गावरील टोलनाक्याजवळ कंटेनरवर छापा टाकून बनावट देशी दारू व परराज्यातील विदेशी मद्याचा साठा जप्त केला. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली असून, कंटेनरसह सुमारे ८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पथकाने तपासणी केली असता, बनावट देशी मद्याच्या १० हजार ७०९ बाटल्या आणि रॉयल स्टॅग व्हिस्कीचे १२ बॉक्स आढळले. मद्यसाठ्यासह सहाचाकी कंटेनर आणि मोबाईलही जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, उपायुक्त सागर धोमकर, अधीक्षक भाग्यश्री पाटील आणि उपअधीक्षक सोरम अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले यांनी ही कारवाई केली. मद्यसाठा कुठून आणला आणि त्याचा पुरवठा कुठे होणार होता, याचा तपास सुरू आहे.