कचऱ्याचे वर्गीकरण आवश्यकच

कचऱ्याचे वर्गीकरण आवश्यकच
Published on: 

पिंपरी, ता. १५ : घरगुती ओला आणि सुका कचरा, वापरलेले सॅनिटरी पॅड, डायपर संकलित करण्यासाठी घंटागाड्यांना स्वतंत्र कप्प्याची (बॉक्स) व्यवस्था आहे. मात्र, असा कचरा घरातूनच नियमित सुक्या कचऱ्यात मिसळून दिला आहे. त्यामुळे वर्गीकरणावेळी कचरावेचकांना तो हाताळावा लागत असल्याची स्थिती आहे.

महापालिकेच्या ‘सिटी क्लायमेट ॲक्शन प्लॅन २०२६’ नुसार, शहरातील एकूण कचऱ्यात सॅनिटरी कचऱ्याचा वाटा सरासरी दहा टक्के आहे. आरोग्य विभागाच्या २०२५ च्या अंदाजानुसार शहरात दररोज एक हजार ३८९ टन कचरा निर्माण होतो. त्यावरून सॅनिटरी कचऱ्याचे प्रमाण सुमारे १३९ टन असण्याचा अंदाज आहे. हे लक्षात घेता, त्याचे आपोआप वर्गीकरण व्हावे, यासाठी घंटागाडीवरील स्वतंत्र कप्प्यामध्ये सॅनिटरी कचरा ठेवण्याची सोय आहे. मात्र, पॅड आणि डायपर कागद अथवा इतर सुक्या कचऱ्यात मिसळून दिल्यास पुढील टप्प्यावर अडचणी निर्माण होतात. पुनर्वापरासाठी कागद वेगळे करतानाचे अनुभव कचरावेचकांनी यापूर्वी मांडले आहेत.
त्यावर महापालिकेने यापूर्वी अनेकदा ओला, सुका, घरगुती, घातक आणि सॅनिटरी अशा प्रकारांत कचरा वेगळा देण्याचे आवाहन केले आहे. सॅनिटरी पॅड आणि डायपर टाकण्यासाठी लाल रंगाचा डबा वापरण्याची सूचना आहे. घराघरांत संपर्क, पत्रके आणि सोसायट्यांमधील जागृतीद्वारे वर्गीकरणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची मोहीमही प्रशासनाने हाती घेतली आहे.

स्वतंत्र प्रक्रिया आवश्यक
शहरात निर्माण होणाऱ्या सॅनिटरी कचऱ्यापैकी किती स्वतंत्र मिळतो आणि किती मिश्र कचऱ्यात येतो, याच्या अद्ययावत नोंदी महत्त्वाच्या आहेत. महापालिकेच्या पर्यावरण अहवालात सॅनिटरी कचरा लैंडफिलमध्ये टाकला जात असल्याची नोंद आहे. त्यामुळे सध्या स्वतंत्र संकलित कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याची स्थिती आहे.

घंटागाडीला स्वतंत्र कप्पा आहे. मात्र, पॅड आणि डायपर कसे गुंडाळून द्यावेत, याची माहिती सर्वांना नाही. सोसायटीत सूचना लावून संकलन कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन केले, तर कचरा वेगळा देण्याची सवय लागेल.
- संगीता जगताप, रहिवासी, आकुर्डी

नागरिकांनी ओला- सुका कचरा एकत्र न देता चार विविध प्रकारांत विलगीकरण करून तो महापालिकेच्या घंटागाडीला देत प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करावे.
- डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, महापालिका

PIM26B21474

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com