esakal | पुणे शहर व जिल्ह्यात स्वच्छता सप्ताहाला सुरवात
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे शहर व जिल्ह्यात स्वच्छ

पुणे शहर व जिल्ह्यात स्वच्छता सप्ताहाला सुरवात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : जागतिक हात धुवा दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषदेने गुरुवारपासून (ता.१४) जिल्ह्यात स्वच्छता सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहात चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील गावा-गावांत आणि वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. यामुळे गावांमधील स्वच्छता वाढेल आणि ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती होईल, असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्यावतीने १४ ते २२ ऑक्टोबर या कालावधीत जिल्हाभरात चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. कोरोनाने ग्रामस्थांना वेळोवेळी हात धुण्याचे महत्त्व कळले आहे. हात धुण्याची ही सवय समाजातील प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली पाहिजे. यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा, अधिकारी आणि कर्मचारी हे शहरात आणि गावोगावी जाऊन ग्रामस्थांना हात धुण्याचे महत्त्व पटवून देणार आहेत.

दरम्यान, या मोहिमेची सुरवात पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते आज (ता. १४) करण्यात आली. यावेळी यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, महसूल उपायुक्त संतोष पाटील, पुणे महापालिकेचे उपायुक्त अजित देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे, सुलभ इंटरनॅशनलच्या प्रमुख नीरजा, रामनरेश झा आदी उपस्थित होते.

केवळ अस्वच्छतेमुळे सुमारे ८० ते ९० टक्के आजार होतात. कारण अस्वच्छतेमुळे जिवाणू-विषाणूंची वाढ होते. हेच विषाणू-जिवाणू नाका-तोंडाद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतात. त्यांना रोखण्यासाठी आपले हात स्वच्छ असणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामस्थांना वेळोवेळी हात धुण्याचे महत्त्व या जनजागृतीद्वारे सर्वांना पटवून दिले पाहिजे,अशी सूचना डॉ. देशमुख यांनी यावेळी सर्व सरकारी यंत्रणांना केली.

डॉ. कलशेट्टी म्हणाले, ‘‘नागरिकांना हात धुण्याचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी जागतिक स्तरावर १५ ऑक्टोबर हा दिवस हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. कोरोनाला रोखण्यासाठी मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखण्याबरोबरच वेळोवेळी हात धुणे, या आरोग्यदायी सवयीचे महत्त्व सर्व जगात बिंबवले जात आहे. यानुसार पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका, सर्व नगरपालिका आणि जिल्हा परिषदेमार्फत हा स्वच्छता सप्ताह साजरा केला जाणार आहे.’’

यावेळी शास्त्रशुद्धरीत्या हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. शिवाय स्वच्छता जनजागृती फलक, हात धुवा दिन आणि कोरोना लसीकरण जनजागृती हस्तपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.

loading image
go to top