
पुणे : पुणे जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेच्या सुमारे १२ हजार १६६ लाभार्थ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले नसल्याने त्यांना मासिक अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे. राज्य सरकारकडून ६५ वर्षांखालील निराधार व्यक्ती, घटस्फोटित महिला आणि अपंगांना या योजनेंतर्गत दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. गरजू व्यक्तींना आर्थिक मदत देणे हा या योजनेचा उद्देश आहे. जिल्ह्यात एक लाख ९ हजार १८९ पात्र लाभार्थी आहेत. मात्र, त्यापैकी १२ हजारांहून अधिक जणांनी आधार कार्ड लिंक न केल्यामुळे त्यांना या मदतीचा लाभ मिळू शकलेला नाही. जिल्हा प्रशासनाने या सर्व लाभार्थ्यांना त्यांचे आधार कार्ड त्वरित लिंक करण्याचे आवाहन केले आहे.