जागतिक मोटरस्पोर्टस स्पर्धेत संजय टकले यांची उल्लेखनीय कामगिरी

पुण्याचे आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले यांनी जागतिक मोटरस्पोर्टस स्पर्धेत पदार्पणातच रॅली पूर्ण करून आठव्या क्रमांकासह उल्लेखनीय कामगिरी बजावली.
Sanjay Takale
Sanjay TakaleSakal
Updated on
Summary

पुण्याचे आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले यांनी जागतिक मोटरस्पोर्टस स्पर्धेत पदार्पणातच रॅली पूर्ण करून आठव्या क्रमांकासह उल्लेखनीय कामगिरी बजावली.

पुणे - पुण्याचे आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले यांनी जागतिक मोटरस्पोर्टस स्पर्धेत पदार्पणातच रॅली पूर्ण करून आठव्या क्रमांकासह उल्लेखनीय कामगिरी बजावली. डावीकडे स्टिअरिंग असलेली कार बऱ्याच कालावधीनंतर चालविणे तसेच टारमॅक मार्गावरील रॅली पूर्ण केल्यामुळे त्यांना ‘एफआयए’ आंतरराष्ट्रीय शिखर संघटनेतर्फे खास पुरस्कार देण्यात आला.

फ्रान्समधील पोल रिका या जगप्रसिद्ध सर्कीटवर रविवारी ही रॅली पार पडली. ऑस्ट्रेलियाचा माईक यंग त्यांचा नॅव्हिगेटर होता. एअरपेस संघातर्फे त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करीत फ्रेंच बनावटीची प्युजो कार चालविली.

संजय टकले म्हणाले, ‘पारितोषिक वितरण समारंभ सुरु असताना माझ्या नावाची घोषणा झाली, तेव्हा मला आश्चर्य वाटले. त्यानंतर मला फिनीशर्स करंडक देण्यात आला, जो सर्वसाधारणपणे विजेत्यांना दिला जातो. जागतिक रॅली मालिकेच्या (डब्लूआरसी) सुरक्षा समितीचे उपप्रमुख निकोलस क्लिंजर यांच्या हस्ते करंडक देण्यात आला. रॅलीत बहुतांश स्पर्धक तरुण होते.

विशी-तिशीतील तरुणांच्या तुलनेत मी वयाच्या ५४ व्या वर्षी ज्या धाडसाने रॅली पूर्ण केली, त्याचाही करंडक देताना विचार झाला. युरोपमधील माझी ही पहिलीच रॅली होती. त्यातही लेफ्ट हँड ड्राईव्ह कार तसेच टारमॅकचा मार्ग ही वेगळीच आव्हाने होती. देशाचे प्रतिनिधित्व करीत असल्यामुळे मला धोका पत्करायचा नव्हता. त्यासाठी रॅली पूर्ण करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट होते. याशिवाय मी फ्रान्समधील वाहतुकीचे नियमही मोडले नाहीत. मर्यादित प्रवेश असलेल्या क्षेत्रात असे नियम मोडले जाण्याचे प्रकार सर्रास घडतात.

रॅली विभागात ३८ स्पर्धकांनी भाग घेतला होता. पात्रता फेरीत संजय यांनी आठवा क्रमांक मिळविला. त्यांच्या कारची पिरेल्ली टायर्सही कामगिरी उंचावण्यास उपयुक्त ठरली. ही रॅली अनुभव वाढविण्यासाठी आणि नवे तंत्र शिकण्याच्या दृष्टीने बहुमोल ठरल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. माईक यंग म्हणाले, ‘संजय हा चांगला मित्र असून, पूर्वी जपानच्या कुस्को सुबारू संघात सहकारी असल्यामुळे एकत्र रॅली चालविणे आनंददायक ठरले. दोन दिवसांत १४ स्टेज पूर्ण करून संजयने क्षमतेमध्ये सुधारणा झाल्याचे दाखविले.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com