समलैंगिक संकेतच्या खडतर प्रवासात आईची साथ...

माधुरी सरवणकर 
सोमवार, 4 जून 2018

एका पुरुषाच्या मनात बायकी भावना निर्माण होऊ शकतात किंवा एक पुरुष दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होऊ शकतो, ही बाब मुळात शैलजा यांच्यासाठी नवीन होती....

पुणे - तो देखील सर्वसामान्यांसारखाच.. घरची सर्व जबाबदारी सांभाळणारा.. नोकरी करणारा.. फक्त त्याची शारीरिक गरज वेगळी.. म्हणून समाजाकडून त्याचा स्वीकार झाला नाही. अनेकांनी त्याला हीन वागणूक दिली. त्याची चेष्टा केली. पण त्याला मानसिक आणि भावनिक आधार दिला तो त्याच्या आईने. आता तो समाजात सन्मानाने जगण्यासाठी लढतोय. 'कॉस्मेटोलॉजिस्ट'ची पदवी घेऊन तो स्वत:च्या पायावर उभा तर राहिलाच पण त्याच्या सारखी भावनिक आंदोलने झेलणाऱ्या तरुणांसाठीही तो प्रेरणास्त्रोत बनला आहे. ही काहाणी आहे 22 वर्षीय संकेतची. 

संकेत स्वेरोनिक मुळचा पुण्याचा. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी त्याने मुंबई गाठली. लहानपणी संकेतच्या वडीलांचे निधन झाले. त्याला एक मोठी बहिण आहे. वडिलांच्या निधनानंतर त्याची आई शैलजा यांनी घरोघरी जेवण बनविण्याची कामे करून दोन मुलांचा सांभाळ केला. लहानपणापासूनच संकेतला मुलींसारखे राहण्याची आवड होती. हळूहळू त्याला स्वतःमधील बदल जाणवू लागले. 17 वर्षांचा असताना त्याने त्याच्या आईला स्वतःमध्ये झालेले बदल समजावून सांगितले.

एका पुरुषाच्या मनात बायकी भावना निर्माण होऊ शकतात किंवा एक पुरुष दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होऊ शकतो, ही बाब मुळात शैलजा यांच्यासाठी नवीन होती. सुरवातीला त्यांना संकेतवर विश्‍वास बसला नाही. कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या एकुलत्या एक मुलाच्या आयुष्यात अचानक झालेले बदल पाहून त्यांची झोपच उडाली. मात्र काही झाले तरी पोटचा गोळा असलेल्या मायेच्या भावनेने त्यांनी त्याला पदरात घेतले. संकेतच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना शैलजा यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पदोपदी समाजाकडून त्यांना हिणवले गेले. इतकेच नाही तर शेजारच्यांनी त्यांच्याबरोबर बोलणे बंद केले होते. अनेक अडचणींतून मार्ग काढत त्यांनी संकेतसोबत राहण्याचा निर्धार केला.

संकेतच्या वागणुकीमुळे महाविद्यालयात त्याची टिंगल केली जात. त्याच्यासोबत मैत्री करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नव्हते. त्यामुळे एकट्या पडलेल्या संकेतने आपले 12 वी पर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले. त्यानंतर त्याने कॉस्मेटोलॉजिस्टची पदवी घेतली. सध्या तो 'मिस्टर गे वर्ल्ड इंडिया' या स्पर्धेचे आयोजन करतो. त्याच्यासारख्या इतर समलैंगिकांवर अन्याय होऊ नये, यासाठी तो प्रयत्न करीत आहे. तसेच आईच्या मिळालेल्या पाठिंब्यामुळे संकेत अभिमानाने मी 'गे' असल्याचे सांगतो. त्याच्या आईला देखील मुलगा समलिंगी असल्याची खंत वाटत नाही. 

'संकेत 17 वर्षांचा असताना तो समलैंगिक असल्याचे समजले. त्यावेळी मला धक्का बसला होता. मला 'गे' हा शब्ददेखील माहीत नव्हता. मात्र आईच्या भावनेने मी त्याचा स्वीकार केला. मुलाचे राहणीमान, हावभाव व बोलण्याच्या पद्धतीमुळे नातेवाईक, शेजारच्यांकडून खूप त्रास झाला. पण कोणाकडेही लक्ष न देता मी माझ्या मुलाला पाठिंबा दिला. इतरांनी देखील आपल्या मुलांना सांभाळून घेतले पाहिजे. त्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे.' - शैलजा (संकेतची आई) 

Web Title: Sankets Explain His Life Struggle in LGBT Community Rally Pune