गट नं.२ ते महाळुंग चौकी रस्त्याची दुरवस्था
MLG26B03214
माळीनगर (ता. माळशिरस) : गट नं. २ ते महाळुंग चौकी पालखीमार्गाची खड्ड्यांमुळे झालेली दुरवस्था.
---
संत चौरंगीनाथ महाराज
पालखी मार्गाची दुरवस्था
रस्त्याची त्वरित डांबरीकरणाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
माळीनगर, ता. २१ : माळशिरस तालुक्यातील गट नं. २ ते महाळुंग चौकी दरम्यानच्या संत चौरंगीनाथ महाराज पालखी मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
गट नं. २ ते चिंतामणी वस्ती आणि तेथून पुढे महाळुंग चौकीपर्यंत नीरा कालव्याच्या कॅनॉल पट्टीवरील हा रस्ता आहे. केडगाव (ता. दौंड) येथील संत चौरंगीनाथ महाराज पालखी सोहळा या मार्गाने श्रीपूरकडे मार्गस्थ होतो. सध्या गट नं. २ ते चिंतामणी वस्तीपर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहने नीरा कालव्याच्या उपफाट्यात उलटण्याची भीती वाहनचालकांना वाटत आहे. चिंतामणी वस्तीपासून महाळुंग चौकीपर्यंतच्या रस्त्यावर डांबर पूर्णपणे उखडून गेले असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत.
हा रस्ता पालखी मार्गासह केळी, ऊस, दूध व भाजीपाला यांसारख्या शेती उत्पादनांच्या वाहतुकीसाठीही महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिक व भाविकांकडून करण्यात येत आहे.

