आळंदी - माउलींच्या पादुकांना चंद्रभागा स्नान...गोपालकाला प्रसाद...श्री विठ्ठल-रुक्मिणी भेट...अशा मंत्रमुग्ध आणि धार्मिक वातावरणात पंढरपुरातील प्रथा-परंपरा पाळत वारकऱ्यांच्या दिंडीसह माउलींच्या पालखी सोहळ्याने गुरुवारी (ता. १०) सायंकाळी चारच्या सुमारास आळंदीच्या दिशेने परतीची वाट धरली. दरम्यान, पंढरपूरवासीयांनी माउलींच्या वाटेवर जागोजागी रांगोळ्यांच्या पायघड्या आणि पुष्पवृष्टी केली. पंढरपूरकर माउलींना निरोप देण्यासाठी इसबावी पादुकांजवळ आले होते.