‘नीरेच्या लाटांत भक्तीचा साज’

‘नीरेच्या लाटांत भक्तीचा साज’
Published on

वाल्हे, ता. १५ : ‘नीरेच्या लाटांत भक्तीचा साज,
ज्ञानरायांच्या चरणांनी पावन झाला घाट’ अशा भक्तिमय वातावरणात नीरा नदीवरील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पुलावरून फुलांनी सजलेला माउलींचा रथ, भगव्या पताका, मानाचे अश्व आणि टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी सोहळा मार्गस्थ होताच हजारो भाविकांच्या नजरा पादुका स्नानाच्या दिव्य क्षणावर खिळल्या. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील नीरा स्नान सोहळा बुधवारी (ता. १५) हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.
पहाटे सहा वाजता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा वाल्ह्यातून लोणंदच्या मुक्कामाच्या दिशेने मार्गस्थ झाला. सकाळी आठच्या सुमारास पिंपरे (खुर्द) येथील अहिल्याबाई होळकर विहिरीसमोर सोहळ्याने न्याहरीसाठी अल्प विश्रांती घेतली. या वेळी पिंपरे (खुर्द) व पिसुर्टी ग्रामस्थांनी टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात पालखीचे उत्स्फूर्त स्वागत केले.
वारकऱ्यांच्या सेवेसाठी ग्रामस्थांनी घरून आणलेली बेसन-भाकरी, खरडा, विविध चटण्या, ताज्या रानभाज्या आणि अन्य पारंपरिक पदार्थांची शिदोरी प्रेमाने वाढली.
सकाळी साडेदहाच्या सुमारास संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा नीरानगरीत दाखल होताच ‘माउली-माउली’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला. ग्रामपंचायत कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, ग्रामसेवक रमेश राऊत, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर सकाळी अकरा वाजता पालखी सोहळा नीरा नदीच्या तीरावरील विसावास्थळी पोहोचला. फुलांनी सजविलेल्या पालखीतळावर माउलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी रांगा लावल्या होत्या. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने मंडप व्यवस्था करण्यात आली होती, तसेच पालखीतळ परिसरात पिण्याच्या पाण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
दुपारच्या विसाव्यानंतर एक वाजता पालखी सोहळा नीरा नदीवरील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पुलावरून दत्तघाटाकडे मार्गस्थ झाला. सर्वांत पुढे तुतारीचा निनाद, त्यामागे मानाचे अश्व, भगव्या पताका, टाळकरी, विणेकरी आणि फुलांनी सजलेला पालखी रथ अशी वैभवशाली मिरवणूक पाहण्यासाठी नदीकाठावर भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.
पालखी सोहळ्याचे राजाभाऊ आरफळकर, आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त राजेंद्र उमाप, भावार्थ देखणे यांच्या हस्ते माउलींच्या पादुका दत्तघाटावर आणण्यात आल्या. ‘माउली... माउली...’च्या जयघोषात दुपारी दीड वाजता पादुकांचे नीरास्नान पार पडले.
अप्पर पोलिस महासंचालक निखिल गुप्ता, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदीपसिंह गिल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, प्रांताधिकारी वर्षा लांडगे, पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराज काकडे, माज सभापती दत्ता चव्हाण यांच्यासह नीरा व परिसरातील ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याला निरोप दिला. स्नानानंतर पुणे जिल्हा प्रशासनाने पालखीला निरोप दिला, तर सातारा जिल्हा प्रशासनाने उत्साहात स्वागत केले.

डोळ्यांचे पारणे फेडणारा क्षण...
नीरा नदीवरील माउलींच्या पादुकांच्या पारंपरिक शाही स्नान सोहळ्याने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. माउलींच्या रथातून पादुका नदीकडे नेण्यात येत असताना तसेच शाही स्नानानंतर परत आणताना दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली, तसेच हा ऐतिहासिक क्षण टिपण्यासाठी छायाचित्रकार व भाविकांची झुंबड उडाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com